गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

मनाच्याही मनातले.......

असावी एक मांडी ...

हो....

हवी आहे एक मांडी .....

जिच्यावर हक्काने डोळे मिटून शांत पहुडावे ...

तिने समजून घेऊन थोपटावे ...

तिची मांडी  ...

तीच ती अनादी काळापासून बाळाची हक्काची स्थावर मालमत्ता ..

जी मिळताच लाभते जगावर राज्य केल्याचे समाधान ...

... 

थकल्या भागल्या जीवाला थरथरत्या हाताने शांतवणारी ती ...... तिची मांडी ...

उपेक्षेलेल्या  मनाला शांतपणे समजावणारी . आणि  समजणारीहि ती ... तिचीच मांडी 

 कळवणाऱ्या शरीराच्या वेदनेला  खरबरीत हाताने आणि सहज शांत  शब्दाने लिंपणारी ती ... तिची मांडी 

अपमानित मनाला हळुवार फुंकर घालून रिझवणारी... ती .. तिची मांडी ..

उद्वेगाने जळणाऱ्या बाळाच्या केसातून हळुवार बोटे फिरवत तो दाह शमवणारी तिची मांडी ...हवी आहे..

खूप हवी आहे ....तिची मांडी ...तापलेल्या कपाळावर आपल्या हाताने थंडावा देणारी ती ...

जीवन संघर्षात  उन्मळू पाहणाऱ्या जीवाला कंपित हाताचा भक्कम आधार देणारी ती ...

श्रांत क्लान्त मन ....शिणलेले डोके ...जळजळणारे डोळे ...उशीवर ठेवताच अश्रूंचा बांध फुटतो ....तड्फड्णारे मन  आक्रोशून  उठते ...,कळवळून मागते ,...आई तुझी मांडी ...

पुराच्या संकटात खचलेल्या शिष्याला ...हवा होता केवळ गुरूचा हात पाठीवर ....लढ असे म्हणणारा गुरु .....तो नशीबवान ....त्याला मिळाला तो गुरु ... पाठीवर  हात ठेऊन लढ म्हणणारा ..

मी नाही तितकी नशीबवान ....

मला नाही लाभली तिची मांडी दीर्घकाळ .....

मनाच्या आतल्या गर्भात ....कालवते ...कलकलते ... 

म्हणते आई ....कोठे आहेस तू .....तुझे बाळ ....मागते आर्त हाक....

उत्तर येत नाही .......उत्तर येतच नाही ......

मग मी तिरमिरिने उठते .. टीव्हीच्या वेडसर मालिकांच्या नशेत धुंद  होते ...त्यालाच निद्रा म्हणते ...

आई ....तुलासुद्धा असे झाले होते का गं ???

किती सोसलेस ...किती  भोगलेस ....अंगावर आलेली जीवघेणी संकटे सहज पेललीस ...कधीतरी रात्री ...तुलाही हवी होती का ग तुझ्या आईची मांडी ??

तू ही मारली असशील अशीच आर्त हाक ......क्षणभर झाली असशील अगतिक माझ्या समान ???

तुझ्या सोबत कोणीच नव्हते दीर्घ काळ .....

मी व्हायला पाहिजे होते तुझी आई .....नाही झाले ..

श्रमलेल्या तुझ्या जीवाला द्यायला हवे होते मायेच्या स्पर्शाचे संजीवन .....नाही दिले ......

आजारपणात आई झालेल्या मुलीचा मायेचा सहवास हवा होता का तुला ???....नाही दिला मी......

तू मागितला नाहीस ....तू जपला तुझा स्वाभिमान...

मी मागते तळमळून ....मी वेडी ...मी मागते केवळ मांडी  ...मला मिळत नाहीं ......

मग मीच मला चुचकारते  ...माझाच हात .....माझ्या तळमळणाऱ्या डोक्यावर ठेवते ...थोपटते .....समजावू पाहते ....डोळे मिटते ...

आणि ...त्या जगात ...तिच्या जवळ पोहचण्याचे स्वप्न पाहते ......

© नेहा देव













मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

मनाच्याही मनातले -१६) कडेलोट

 कडेलोट

आता वाटते हा वादळ पाऊस कधी संपणारच नाही….

निसर्गाची लागलेली हाय वाटते कधी शमणारच नाही…..

पृथ्वीच्या गाभ्यात.. आत... खोल सगळच बिनसलं आहे

निसर्गाच्या आत्म्याचा तोल कुठेतरी खूप हलला आहे!

पूर्वी कसे नेमके असायचे

एकामागून एक ऋतु शिस्तीत यायचे.

निसर्गाच्या शहाणपणाला आपण किती धरावे गृहीत ?

प्रगतीच्या खोट्या नशेत किती राहावे धुंदीत ?

सहा ऋतूंचे अद्भुत सोहळे त्यांचा वेगळाच दिमाख!

त्यांच्या चांगुलपणा वर माणसाचा फुकटचा रुबाब !!

ते ऋतु, ते संणवार, आता काही तसे राहिलेच  नाही

शरदात केशरी चांदणे, दिवाळीत गुलाबी थंडी आता असत नाही

काळ्या आईच्या सोशिकतेची कदर माणसा तू कधी केलीच नाही

निसर्गाच्या चांगुलपणाची किंमत करण्याची माणसा तुझी कुवतच नाही

घेतला वसा टाकून दिला.... माणुस पार मातून गेला... 

सृष्टीच्या दुः खाचा  कढ़ हमसुन हमसुन उतु गेला 

वसुंधरा माझी आई , तिच्यात मी... आणि माझ्यात ती.....

मला कळते तिचे सोसणे, तिच्या सारखेच माझेही जगणे.

सहनशीलतेचा कडेलोट होऊन......

ऐन दिवाळीत कडकडून विजा तिचे दु:ख कोसळते .....

तिचे सोसणे तेंव्हा माझ्याही डोळ्यातून आपसूकच पाझरते.....

© नेहा देव


रविवार, ६ मार्च, २०२२

मनाच्याही मनातले--15 ) दु:ख दुखवट्याचे

दु:ख दुखवट्याचे

 

आज ६ मार्च २०२२....... बरोबर आज एक महिना झाला...... महिन्यापूर्वी म्हणजे  ६फेब्रुवारी २०२२ रोजी एक अतीव दु:खद घटना घडून गेली....... जगभरातील स्वर विश्वात अजरामर झालेल्या एका स्वराने या दिवशीच आपल्या शरीराचा त्याग केला. ....

जगातले सर्व संवेदनशील लोक हळहळले. 

ती एक नेहेमीची रविवरची निवांत सकाळ होती.....

 त्या रविवारची ती सकाळ एक  अनमिक हुरहूर लावूनच उजाडली.......

लताजींचे निधन झाले............

मृत्यू हे अटळ, अंतिम सत्य आहे..... कधिना कधी हे घडणारच होते....ते त्या दिवशी घडले...........नव्वदहून अधिक वर्षांचे समृध्द,कर्तृत्वान,कृतकृत्य आयुष्य त्या दिवशी पंच-तत्वात विसावले.........

डोक्यात हेच विचार घोळत असताना दुपारी जरा वामकुक्षीसाठी आडवी झाले. आणि माझ्याही नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले.......... 

लताजींशी लहानपणापासून एक अनामिक शुद्ध नाते जुळले होते.... ते आज निखळले..... त्यातून आपसूकच ओघळलेले ते मोती. …. शुद्ध... पवित्र....निखळ..... नितळ .......आणि तितकेच अनमोल.

खर तर प्रत्यक्ष आमनेसामने कधीच न बघितलेल्या व्यक्ती बरोबर 

कसे काय जुळले सुरांचे हे घट्ट नाते?….माझ्याही नकळत?............. 

मधुबालाच्या दिसण्यासारखा मधाळ गोड, खट्याळ, अवखळ असा तो सूर......... ज्ञानेश्वर ,तुकाराम आणि मीराबाईच्या भक्तिचा भक्तिरंग, उत्कटतेने उलगडणारा तो सूर..............

 .....तोच सूर जो सावरकरांच्या अतीव देशभक्तीत रंगणारा....... तोच सूर जो बालकवी,आरती प्रभू, भा.रा. तांबे, शांता बाईच्या कवितेत अलवार होणारा........

सर्व हिंदी आणि मराठी सिने तारकांना सुंदर करणारा ...........

क्षितिजा सारखा ज्याचा अंत सापडणार नाही ....असा तो सूर ....असा तो आवाज......त्यानीच म्हट्ल्याप्रमाणे....... "मेरी आवाज ही पेहचान है........." त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख.......

जगातील सुरांबद्दलची यच्चयावत सर्व विशेषणे जोडून सुद्धा जो आवाज त्याच्या दोन अंगुळे अंमळ वरच राहतो, त्या लता मंगेशकर या स्वर्गीय आवाजाने आपल्या खऱ्या स्थानी जाण्यासाठी आपले मूर्त शरीर या दिवशी त्यागले. मूर्त शरीरात सिमटलेला तो  एक अमूर्त-दैवी आवाज अखेर मानवी जगापासून मोकळा झाला.  

अलौकिक दैवी सुरांची देणगी परमेश्वराने त्यांना बहाल केली. त्या  देणगीचे त्यानी अक्षरश: सोने केले......  ते सुरांचे बावनकशी सोने आम्हासारख्या पामरावर अक्षरश: उधळून आम्हाला श्रीमंत केले.

ज्यांनी गायलेल्या गीताच्या ,कवितेच्या अभंगाच्या चरणाशी आमचा आवाज स्पर्शही करू शकत नाही (असे पु.ल. नी म्हटले होते म्हणे) त्या लताजींचा एकदा चरण स्पर्श व्हावा अशी एक तीव्र इच्छा होती. अलौकिकाला स्पर्श करण्याची माझी ती इच्छा अपूर्णच राहिली......

खरतर ज्यांच्या आवाजाच्या नखाचीही सर माझ्या आवाजात नाही, त्या मला एकदा दुर्बुद्धी सुचली ...त्यांचे "वंदे मातरम" हे गीत....जे ऐकायला अतिशय सुमुधुर परंतु तितकेच अवघड .... २६ जानेवारीला सर्वांसमोर म्हणण्याचे मी धाडस केले... धाडस नव्हे महापातक.......आणि जे व्हायचे तेच झाले....        फ...जि....ती……महाफजिती......

लताजींची असंख्य गाणी अगदी साधी –सोपी- सरळ वाटतात. पण आपण गायला लागल्यावर ती किती अवघड आहेत याचा साक्षात्कार होतो. त्यांचा तो आवाज म्हणजे चंचल पारा....आपल्या गळ्यात बसवू म्हणता बसतच नाही..........गळ्यातून निसटूनचं जातो....त्यांचा तो आवाज ........ ती गाणी...... डोळे मिटून ऐकण्यातच आपण धन्य व्हावे!!!! 

आपण असा स्वर्गीय आवाज ऐकण्याचा लाभ घेऊ शकतो हीच परमेश्वराने आपल्यावर केलेली कृपा समजून त्याचे कायम  ऋणी रहावे.........

रविवारच्या त्या दिवशी संध्याकाळी आझाद मैदानात या स्वर-लतेला अखेरचा निरोप देण्यासाठी अखंड उद्योगात बुडालेले पंतप्रधानसुद्धा अंत्य -दर्शनासाठी मुंबईत अवतरले.

अन्त्यविधीचा प्रसंग काही वेळ दूरदर्शनवर बघून आम्ही काही कामासाठी बाहेर पडलो

एका ठिकाणी एका सुखवस्तू कुटुंबातील आईवडील आणि साधारण एक नऊ-दहा  वर्षाचा मुलगा बसलेले होते. त्या दिशेने माझ्या कानावर शब्द पडले.......

 “I am very happy, tomorrow we got holiday.”

ते दहा वर्षाचे अर्ध- इंग्लिश पोरगे बोलत होते..... मी चमकले.... त्याहूनही अधिक खंतावले..... कारण त्यावर त्या पोराच्या  आई -बापाची काहीही प्रतिक्रिया नव्हती!!!!!!!!!

लता मंगेशकरांच्या निधना बद्दल सरकारने सोमवारी सुट्टी जाहीर केली होती ....त्यावर दहा वर्षाच्या मुलाची ही प्रतिक्रिया होती. …… मी बैचेन झाले............

असे काही आजू बाजूला घडले की अनेक प्रश्न नेहेमीच माझ्या मनात उभे राहतात........ तसेच आत्ताही घडले. 

मनात प्रश्न उमटले.   .... 

का दिली जाते अशा दु:खद प्रसंगी सुट्टी?

काय साध्य होते त्यामुळे

सुट्टी म्हटल्यावर कितीही कार्यतत्पर माणूस असो.. तो आनंदितच होतो ....

मग दु:खद प्रसंगी अशी सुट्टी का जाहीर केली जाते?

आठवडाभर काम केल्यावर प्रत्येकालाच हवी असते एक सुट्टी......  यात गैर काहीच नाही. 

पण अशी अचानक सुट्टी सगळ्यांनाच का हवी असते?.....मजा करायला?

आमच्या लहानपणापासून शाळेची सुट्टी आम्हाला नेहेमीच हविहविशी वाटायची, तशीच आत्ताच्या मुलानाही वाटते. 

पण दु:खद प्रसंगी सुट्टी जाहीर करून आपण काय साध्य करतो?

घरी आपण त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहतो का ?

त्यांचे  गुण आठवतो का ? त्यांच्या पासून काही शिकवण घेऊन आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतो का?

त्या माणसाची महानता समजावून सांगण्याचे कष्ट घेतो का ?

काय करतो आपण त्या सुट्टीचे? मुले सुट्टी मिळाली म्हणून आनंद साजरा करतात

आपण काय करतो ?

या प्रश्नामध्येच  मिसळलेला दुसरा प्रश्न  (....उपप्रश्न!!!!).........शाळेला सुट्टी मिळाल्यावर मुलांना होणारा आनंद कधी तरी दु:खात बदलेल का?   

कशाला आज दिली शाळेला सुट्टीमला सुट्टी नको.......मला रोज जायचे आहे शाळेत ....मला शाळा इतकी आवडते की  सुट्टी नकोच वाटते....असे मुलांना कधी तरी वाटेल का? .....शाळा इतक्या आनंददायी होतील का ? की त्यांना दुखवट्याचे दु:ख दर्शवण्यासाठी सुटी देण्याची गरजच भासणार नाही.......... 

अशी आनंददायी शाळा असावी असे  माझे स्वप्न आहे ... दु:ख समतोलपणे सहन करणारी आणि कायम आनंद आणि आनंदच वाटणारी...आनंददायी...आनंदघनासारखी .......आनंदाच्या वर्षावात भिजवून चिंब करणारी....अशी एक शाळा हवीच ........

© नेहा देव

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

मनाच्याही मनातले -१४) नाही हे भावत मना....

मनाच्याही मनातले- नाही हे भावत मना.....

स्वातीने ग्रुपवर साड्यांचा  व्हिडियो टाकला,  आणि मी  तो  पूर्ण बघितला ........एकदा नव्हे दोनदा!!!!!........सगळेच मेसेजेस मी वाचतेच असे नाही. पण हा मात्र काळजीपूर्वक बघितला.......कारण???.....साडी.!!!!!!!....... 

साडी!!!!!!! ......माझ्या वयाच्या कोणत्याही स्त्रीचा विक पॉइंट....... माझाही ........

केंव्हाही नवीन साडी खरेदी करायची म्हटले की जीव भुरळतो.....डोळे लकाकतात.....मनात काही तरी रेशमी सळसळते .........

घरात आधीच्या साड्या कितीही असल्या तरीही नवीन साड्यांची हौस काही फिटत नाही.....अजूनही......

पण lockdownच्या वर्षभरात कित्येक दिवस साड्यांच्या घड्यांना हातच लावला गेला नाही.

त्या केविलवाण्या पडून राहिल्या कपाटात .......तशाच........ कित्येक दिवसात उलगडल्या गेल्याच नाहीत.

मग प्रश्न पडला ........ का करतो आपण इतका साड्यांचा हव्यास???

किती कपडे घ्यायचे?...........किती भरून ठेवायचे?........किती हा सोस??.......न संपणारा........

असे किती कपडे लागतात माणसाला जगायला?.......एक दांडीवर एक अंगावर इतक्या अत्यल्प वस्त्रावर पण जन्म काढतात अनेक लोक........मग आपल्याला का ही अति हाव???

मुळात माणूस कपडे का वापरतो?

कपडे!!!! ......बुद्धिमान माणसाने स्वत:ला आवरण म्हणून निर्माण केले ........वस्त्र प्रावरण....

वल्कले...... ते...... जीन्स!!!!! असा मोठ्ठा प्रवास या वस्त्राचा.........मध्ये टप्पा साड्यांचा......शालू, पैठणी आणि इतर अगणित प्रकारच्या......

पूर्वीच्या शालू, पैठणीची जागा आता कित्येक नवनवीन विलोभनीय रेशमी, डिझायनर साड्यांनी घेतली आहे. झालरीच्या सुद्धा साड्या असतात हल्ली  ......तरीसुद्धा अजूनही पैठणीत जीव अडकतो माझा.....  पण गंमत अशी कि तितकाच जीव अडकतो शांता शेळके बाईंच्या "पैठणी" कवितेमध्ये सुद्धा............

शांता बाईंच्या पैठणी कवितेचा उल्लेख केला तरी मंद अत्तराच्या सुगंधाने मन गंधित होते.......

शालू, पैठणी म्हटले कि मला अजून एक अबोली आठवण येतेच येते!!!

आईने सुटकेसमध्ये पांढऱ्या कापडात बांधून, जपून ठेवलेला तो फिक्या अबोली रंगाचा शालू नजरेसमोर येतो........ त्यावर सुंदर सोनेरी पिंपळपानाचे बुट्टे होते.

जेंव्हा जेंव्हा ती तो बाहेर काढायची तेंव्हा जवळ बसून मी तो डोळा भरून निरखून बघायची. ........शिवाय त्यात आई आपले शिकवणीचे पैसे जपून ठेवायची...... अडी-अडचणीला तेच उपयोगी पडायचे.

दोन्ही भावांच्या मुंजीच्या वेळी घेतला होता तो शालू........शालूच्या पारंपारिक रंगांपेक्षा अगदीच वेगळ्या अशा अगदी फिक्कट ... फिक्का......अबोली रंगाचा......फिक्या अबोली रंगात फिका गुलाबी मिसळल्यावर जी छटा होईल तोच त्याचा रंग होता....  आईच्या शांत अबोल स्वभावाप्रमाणेच अबोली रंगाचा .......मला खूप आवडायचा!!!. आईकडे तेवढीच एक भारी ठेवणीतली साडी होती. अनेक विशेष महत्त्वाच्या कार्यामध्ये तोच शालू ती नेसायची.........एकच साडी पुन्हा पुन्हा.... तीच  तीच...... जपून सांभाळून ठेवलेली ........ वापरलेलीच .........निरुपाय असला तरी फारशी खंत न बाळगता ......

आणि आत्ता????

आता प्रत्येक इव्हेटला एक नवीन...... शक्य असेल तेवढे अधिक किमतीचे........भारी .......महाग ......भरमसाठ किमतिचे वस्त्र घेतले जाते ..........वस्त्र अशासाठी म्हटले कारण आपल्याकडचे अनेक सण-वार रूढी- परंपरा आता केवळ इव्हेट म्हणून घडतात......घडवले जातात ....तशी फॅशनच आहे.... आणि त्यासाठी प्रचलित फॅशनची वस्त्रे घातली जातात.........  फोटो सेशनच्या फ़ैरी घडतात. आणि मग लगेच ते वस्त्र बाजूला पडते.......... कुचकामी होते......कारण काही दिवसांनी त्याची फॅशन जाते.....

मग तो वरील प्रश्न पुन्हा पडतो........... माणूस कपडे का घालतो?

लज्जा रक्षणासाठी?  ...शरीर संरक्षणासाठी?....सुंदर,ऐटबाज दिसण्यासाठी?.....आपण समाजातीलच एक आहोत..... वेगळे नाही....  हे दर्शवण्यासाठी?......श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी ?.....कपड्याच्या व्यापाऱ्यांचा धंदा चालावा म्हणून ?? कि केवळ  फॅशन साठी???

या प्रश्नाला माझ्या पुढील पिढीचे अनिवार्य उत्तर हेच की कपडे घालावे केवळ आणि केवळ फॅशनसाठीच!!!!!

ही फॅशन म्हणजे .....एक गम्मतच आहे.....जादू आहे......भूलभुलय्या आहे ......

तमाम बॉलीवूडची ती जान आहे.......मॉडेल विश्वाचा ती श्वास आहे.....

भयंकर पॉवरफुल आहे हे प्रकरण!!!!.

ही फॅशन  काय करू शकत नाही?

हिने पाहता पाहता हिंदू पोरींच्या कपाळावरील कुंकू पार पुसून टाकले....... हातातल्या बांगड्या काढून घेतल्या ........पायातले पैंजण ओढून घेतले........ केसातले गजरे काढून घेतले..........

माझी पिढी सोडली तर पुढील पिढीमधील कोणतीही तरुण मुलगी कुंकू किंवा टिकली नेमाने लावत नाही...... गजरा घालायची त्यांना लाज वाटते.......बांगड्या घालणे हे काकुबाईचे लक्षण वाटते. .....

खर तर कुंकू, टिळा ही आपल्या धर्माची निशाणी......पण आपला धर्म आपण इतका हलक्यात घेतो की अनेक गोष्टी आपण सहज हवेत उडवून दिल्या......... इतर धर्म आपली कोणतीच गोष्ट इतक्या सहजपणे सोडत नाही. आणि आपण आपली कोणतीच गोष्ट जीवापाड धरून ठेवत नाही.

.................काही जण सोडतच नाहीत................आपण धरून ठेवतच नाही.

 खरे तर माणसाच्या सर्व राहणीमानाचा पाया तेथील स्थानिक- भौगोलिक परिस्थिती असते.....त्यावरच कालांतराने संस्कृतीची बांधणी होते आणि मग ती आपली ओळख बनते........पण आज अशी स्थानिक ओळख पुसली जात आहे आणि एक जागतिक ग्लोबल- संस्कृती उदयाला आलेली आहे ...... आणि या ग्लोबल संस्कृतीचा परवलीचा शब्द आहे फॅशन......या फॅशनच्या पायात साडी गेली....... पंजाबी सुट पण गेला आणि आता आल्या जीन्स आणि शर्ट.....मुलामुलींचा एकच पेहेराव.....भेदभाव नाही...... पुढारलेपणाचे लक्षण.. स्त्री पुरुष समानतेचे लक्षण म्हणजे स्त्रीने मुलाप्रमाणे कपडे घालायचे... शिवराळ भाषा बोलायची आणि राजरोस व्यसने करायची.......... ही फॅशन आहे.

 या फॅशनचे मुख्य केंद्र आहे हॉलीवुड!!! ....हॉलीवुड...बॉलीवुड....स्थानिकवुड.... अशी पाझरत पाझरत थेट शहरी मग ग्रामीण भागातील घराघरात ही फॅशन  घुसते.

फॅशन कसलीही असते ......केशभूषा, वेशभूषा, राहणीमान, भाषा ...कसलीही........

पण जास्त करून फॅशन हा शब्द आपण कपड्यासाठीच वापरतो. 

खरतर वस्त्र प्रावरणातील फॅशन म्हणजे सौंदर्य, कलात्मकता, सृजनशीलता यांचा सुरेख संगम असावा अशीच आपली अपेक्षा असते.

पण सध्या फॅशनच्या नावाखाली जे काही माथी मारले जात आहे आणि फॅशन च्या नावाखाली जे काही घातले जात आहे, त्यातील काही गोष्टी कोणत्याही अंगाने सुंदर, भारी, ऐटबाज वाटतच नाही......पुढून खाली, मागून वर किंवा पुढून वर आणि मागून खाली गेलेला कुर्ताडावीबाजू वर आणि उजवी खाली किंवा उजवी बाजू वर आणि डावी बाजू खाली असलेला कुर्ता..........कुर्त्याची पुढची बाजू वेगळी.. मागची वेगळी ....डावी बाजू आणि उजवी बाजू वेगवेगळ्या रंगाची किंवा डिझाईनची सुद्धा. मुलींच्या कुर्त्याला खांद्यावर रुपयाच्या आकारापासून ते खूप मोठे भोकसांड वाटेल इतके मोठे भोक......आणि सर्वात वाईट म्हणजे फाटक्या आणि फेडेड जीन्स...........

जीन्स हे सध्याच्या ग्लोबल संस्कृतीचे - तरुण पिढीचे लोकप्रिय वस्त्र आहे.

या जीन्स मध्ये गेली सहा सात वर्षे एक फॅशन  सध्या फारच जोरात आहे.. ती म्हणजे........फाटक्या आणि फेडेड जीन्स.

बीभत्स, ओंगाळवाण्या.......सौंदर्याचे नव्हे तर कल्पनादारिद्र्याचे प्रदर्शन घडवणाऱ्या........कितीही पटवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न  केला तरी ही  फॅशन काही मनास येतच नाही......

परत तोच प्रश्न पडतो माणूस कपडे कां घालतो?

"रेशमी सलवार कुर्ता जालिका ....रूप कहा नही जाए नखरेवालिका" ...या गीतामधील जाळीदार कुर्ता सुंदर ललनेवर निश्चितच खुलतो पण मुद्दामहून गुडघ्यावर फाडलेल्या किंवा फेडेड पॅन्टस मला कधीच सुंदर दिसत नाहीत..... याआधी मधल्या काळात low-waist नावाची अशीच एक अत्यंत ओंगळवाणी फॅशन आली होती. त्या मधून अंतर्वस्त्र दिसतील अशी सोय व्हायची ...कदाचित तोच त्यांचा हेतू होता..

थोडक्यात सध्याच्या या काही फॅशन्स मध्ये दिसते ती केवळ विसंगती, असमतोल, विचित्रपणा, कल्पना दारिद्र्य, बिभत्सता,कुरूपता,ओंगळवाणेपणा...आणि......आपल्या कल्पना दारिद्र्यातून केलेल्या विद्रूप कृतीला कलाकृती म्हणण्याचा केविलवाणा खटाटोप!!!!! 

विसंगतीमध्ये सुद्धा सौंदर्य असू शकते......  free hand drawing नही का सुंदर दिसते !!! ...... पण कुर्त्याला एकच बाही असणे आणि एक हात उघडा असणे यात खूप सौंदर्य आहे किंवा सृजन आहे असे मला तरी वाटत नाही. यापुढे कदाचित एका पायातच पॅन्ट आणि दुसरा पाय उघडा अशी पण फॅशन येईल.......... किंवा पुढचा भाग झाकलेला  आणि मागचा पूर्ण उघडा....अशी सुद्धा!!!!!!

नाविन्य  आणि कुरूपता या दोन भिन्न गोष्टी आहेत.....नाविन्याच्या हव्यासासाठी बिभत्सता, कुरूपता मिरवायची का?

अर्थातच हा ज्याचा त्याचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे.

शेवटी आपण काय घालायचे, कसे राहायचे हा प्रत्येकाचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे. मी कशाला त्यावर इतका विचार करायचा???

तरीही लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते. ......

..........एका राजाला अतिशय उत्तम नाविन्यपूर्ण, अतितलम, वजनाला हलके पण भारी वस्त्र हवे असते......एक लबाड शिंपी त्याच्याकडून भरपूर बिदागी घेऊन खरेखुरे कपडे शिवतच नाही... तर खोटेच सांगतो की मी तुमच्या अंगवर अती तलम कपडे घातले आहेत ते तुम्हाला आरशात दिसणार नाहीत पण  आम्हाला दिसते आहे. .......आणि ते तुमच्यावर अगदी खुलून दिसत आहे!......... तो मूर्ख राजा  नग्नपणेच मिरवणुकीला निघतो ..... आपण खूप सुंदर वस्त्र घातले आहे अशा भ्रमात  मिरवत जात असतो....... सर्व प्रजा मनातल्या मनात हसत असते पण राजाच्या दंडुकेशाहीला घाबरून वरवर त्याची वाहवा  करत असते.

एक लहान मुलगा मात्र बाल- सुलभ निडरपणे, निर्भयपणे सहज बोलून जातो....”अरे ... बघा ..बघा ......राजा उघडाच आहे!!!”.............

आज ग्राहक-राजाला फॅशनच्या नावाखाली लबाड कंपन्या अशाच लुबाडत आहे. फॅशनला शरणागत लोक भ्रमामध्ये राहून एखादी ओंगळवाणी फॅशन सुद्धा मोठ्या शेखीने मिरवत आहेत...पण माझ्या मनामध्ये मात्र तो निरागस, स्पष्ट बोलणारा छोटा मुलगा डोकावतो आहे. 

पूर्वी एका शालूमध्ये..... पैठणीमध्ये आयुष्याचा अख्खा पट सुबक, नीटस बांधलेला असायचा...त्याच्या पदरात व्यक्तिमत्व, नातेबंध आणि हो.. संस्कृतीसुद्धा घट्ट बांधलेली असायची....... आज ढीगभर कपडे असून सुद्धा आयुष्य आणि नाते बंध बांधले जातच नाहीयेत..........फाटके झाले आहेत!!! विसविशीत झाले आहेत....का जाणून बुजून केले आहेत???? ....फाटक्या जीन्स सारखे????

©नेहा देव