मनाच्याही मनातले -
ते सात दिवस ........
खरंतर लेखाचे शीर्षक "वो सात दिन" हे ठेवावे असे वाटत होते. पण "त्या" सिनेमासारखे खूप काही सनसनाटी, अतर्क्य, उलटे -- पुलटे असे काही घडले नव्हते. सरळ साधे वास्तव पुढे मांडायचे होते .म्हणून आपले मराठमोळे शीर्षकच दिले..
दिवस होता गुरुवार १६ जुलै २०२०. सकाळी सकाळीच माझे पती. श्री नितीन याना ताप भरला..(कदाचित रात्रीपासूनच चढला असावा.) ताप १०० च्या आसपास होता. नेहेमीप्रमाणे फ्लू असेल म्हणून फारसे लक्ष दिले नाही. गुरुवार दि.१६जुलै गेला ,शुक्रवार दि. १७ जुलै गेला, शनिवार दि. १८ जुलै सुद्धा गेला .......पण ताप उतरण्याचे चिन्ह दिसेना .....ताप मी सातत्याने मोजत होते. पारा १०० ते १०१ च्या rangeमध्येच खालीवर खेळत होता. या तिन्ही दिवस त्यांनी तापाची गोळी घेतली नाही.केवळ गरम पाणी पिऊन अंगावरच ताप कमी करण्याचा प्रयत्न करत होते.पण तीन दिवस उलटले तरी ताप कमी होण्याचे नाव घेई ना. मग मात्र मनात शंकेची पाल चुकचुकली.
शनिवारी रात्री ठरवले कि उद्या कोविड ची टेस्ट करून घ्यावी. .... रविवार १९जुलैला उठल्यावर सर्वप्रथम दोन तीन ठिकाणी जाऊन कोविड टेस्ट ची चौकशी करून आले. पण खाजगी रुग्णालयात रविवार म्हणून टेस्ट होऊ शकत नव्हती.मनपाच्या टेस्ट केंद्रात खूप गर्दी असल्याने तेथे जाणे सुरक्षित वाटले नाही.. न जाणो तेथील कोणाचा संसर्ग व्हायचा आणि नको ती ब्याद लागायची..... म्हणून सोमवारी २० जुलैला करूयात असे ठरवले. रविवारी ताप होताच...... पण पॅरासिटेमॉल सुरु केली . गोळी घेतली कि दोन तासात दरदरून घाम येऊन अंग चिंब भिजायचे पण नंतर परत ताप भरायचाच. आता ताप १०२ पर्यंत जात होता. ......काळजी वाढू लागली. रविवारची रात्र भीतीच्या छायेखालीच घालवली...... त्यांना तर अजिबात झोप लागली नाही. आता कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे सुरु केले. मानसिक तणाव वाढतच होता. सोमवारी सकाळी मुलीने भारती विद्यापीठाची सगळी माहिती काढली. पुढे जाऊन कार्ड काढले. अंगात १०२ ताप असलेल्या माणसाला न्यायचे कसे ? याना न्यायचे कसे? प्रश्न पडला. ड्रायव्हरला बोलावले. पण लॉक डाऊन मुळे येता येत नाही असे सांगून त्याने टाळले. ....वाईट वाटले........पण मग वाटले त्याचेही बरोबर आहे. त्याने का आपला जीव धोक्यात घालायचा?..... जो तो आपला जीव सांभाळणारच..... ज्याला त्याला आपला जीव प्यारा........अंजू ( बहीण ) म्हणत होती...मुलाला पाठवू का?.... मी नको म्हणाले.पिंपरीवरून धनकवडीत तेवढ्यासाठी त्याने येणे बरोबर वाटले नाही. आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको.आपल्यामुळे कोणाला लागण व्हायला नको....... ओंकार (भाच्याला )मुद्दामहून विचारलेच नाही. त्याच्या घरात लहान मुलगी ...तिला लागण व्हायला नको. त्यांना आमच्यापासून लांबच राहा असे सुचवले.........मीच टूव्हिलर काढून त्यांना डबलसीट घेऊन गेले. नंबर लावून टेस्ट केली. टेस्ट करताना मनात आत कुठेतरी वाटत होते कि.... इतर काहीही लक्षणे नाहीत.सर्दी नाही..... खोकला नाही....श्वासाला त्रास नाही.... वास आणि चव यांच्या संवेदना शाबूत आहेत.......... फक्त ताप आहे. म्हणजे हा करोना नसणारच आहे. बहुतेक डेंग्यू,मलेरिया, नाहीतर इतर viral इन्फेकशनचा हा ताप असणार आहे. नाही म्हणायला डोके जड होणे आणि अंगदुखी ही लक्षणे मात्र होती. घरी आलो. आता रिपोर्टची प्रतीक्षा....... .....सोमवारी २० जुलै संध्याकाळ पासून ताप जरा कमी होतो आहे असे माझ्या लक्षात आले. मंगळवारी दि. २१ जुलै सकाळपासून तापाचा जोर कमी होऊ लागला. मुलीने परत एक- दोन हेलपाटे घालून रिपोर्ट आणला....... आणि ......आणि ... जे नसेल असे वाटत होते तसेच घडले....... कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आणि .......माझ्या पायाखालची जमीनच सरकली.......
मन शंका कुशंकांनी व्यापून गेले. फक्त ताप आहे. तोही आता कमी झाला आहे. सर्दी नाही .....खोकला नाही.... पण पुढे श्वासाचा त्रास होईल का ?पुढे काही serious होईल का?.. ..भीती आणि दडपण.... दुसऱ्यादिवशी लगेचच आम्हा दोघीची आणि वर राहणाऱ्या तिघांचीही टेस्ट करायचे ठरले. दुसऱ्या दिवशीची सगळी पळापळ
मैत्रेयीनेच केली. मुलगा नसल्याची मी कधी खंत बाळगली नव्हती .आता तर मैत्रेयीने ती पारच पुसून टाकली.
आमच्या पाचही जणांची टेस्ट आणि श्री. नितीन यांचे कॉऊन्सेलिंग झाले आणि त्यांना काही व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि खोकल्याचे एक औषध एवढेच लिहून दिले......बस्स एवढेच....... बाकी काहीही नाही ........... होमआयसोलेशन सांगितले. घरी राहूनच फोनवर कंसल्टेशन आणि कॉऊन्सेलिंग........
घरी आलो..........
सर्व आवरून ..जेवण करून जराशी विश्रांती घ्यायला आडवी झाले. डोक्यात विचारांचे काहूर. यातून पुढे काय?...... .......
............. आणि .......पुढे काहीही झाले नाही...... यांचा ताप विना औषधाचा आपोआप कमी होऊ
लागला ....ते हळू हळू फ्रेश होऊ लागले.
दुसऱ्या दिवशी आमच्या दोघींचा रिपोर्ट आला. ती पॉझिटीव्ह आणि मी निगेटिव्ह. वर राहणारे भाच्याचे कुटुंब तिघेही निगेटिव्ह ( हे खूप चांगले झाले.देवाची कृपा कोरोनाने आपले हातपाय फार लांब पसरवले नव्हते.) ..... पण आमच्या दोघींच्या बाबतीत रिपोर्ट अनपेक्षित होता. मी त्यांच्या सान्निध्यात सतंत उशा -पायथ्याला वावरत होते. मी निगेटिव्ह आणि मुलगी लांब असून पॉझिटिव्ह........ कसे काय?
असे कसे झाले? कशामुळे झाले? कोणामुळे झाले? यावर चर्चा करून,वितंडवाद घालून काहीही फायदा नव्हता......शंका न घेता मी कंबर बांधून कामाला उभी राहिले. नशीब बलवत्तर म्हणायचे. मी ठणठणीत आहे असे तो कागद सांगत होता. आणि कोणतेही लक्षण नसलेल्या मुलीला लागण झाली आहे असेही तो कागद सांगत होता........ या कोविडचा आता सर्व शक्ती एकवटून सामना करायचा असे ठरविले.तरीही त्या दिवशी मनाची खूप ओढाताण झाली. उलघाल झाली. अज्ञाताची, अकल्पाची भीती मनात दाटून आली......
सर्व कामवाल्या बायकांना मंगळवार पासूनच येऊ नका म्हणून सांगितले होते. आणि माझी अक्षरश: तारेवरची कसरत सुरु झाली. ही माझी लढाई मलाच लढावी लागणार होती. पाच खोल्या, पुढचा मागचा पॆसेज ,बंगल्याच्या चारही बाजूने मोकळी जागा... याची स्वच्छता, झाडणे ,पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे, फर्निचर पुसणे. स्वयंपाक, चहा, नाश्ता, कुत्र्याकडे बघणे . ही नेहेमीची कामे. त्याच्या जोडीला तिघांनाही वाफ देणे, काढा देणे , व्हिटॅमिनच्या गोळ्या देणे , गरम लिंबू सरबत देणे. शक्य झाल्यास दूध- हळद देणे, मध मिरपूड चाटवणे ...चौदा तासांच्या मिनिटांपेक्षा कामांची संख्या जास्त होती. पण नुसताच कामाचा ताण नव्हता....... पुढे काही गंभीर तर होणार नाही ना ... ही सतत भीतीची छाया. नुसते तेवढेच नाही तर सतत हातात सॅनिटायझरचा फवारा घेऊन जंतू मारण्याचा आटा पिटा....... रात्री टॉयलेटला जाताना सुद्धा हातात सॅनिटायझर घेऊन अदृश्य राक्षसाला मारत मारतच जायचे .
.........यात ज्यांना मुद्दामहून न सांगता सहजपणे कळले होते त्यांचे काळजीचे ,सूचना करणारे, धीर देणारे फोन attend करणे हे पण चालू होतेच..अमेरिकेतल्या मोठ्या मुलीला मुद्दामच लवकर सांगितले नाही.उगाच लांब राहून काळजी करत बसणार....नणंद ,बहीण, वहिनी यांनी आणि त्यांच्या पूर्ण परिवाराने धीर दिलाच पण काही लागले तर सांग असे वारंवार सांगून आश्वस्त पण केले. कॉलेजच्या प्रिन्सिपॉल मॅडम,कात्रज मध्ये राहणाऱ्या आहेर मॅडम ,भाग्यवंत मॅडम यांनीही मदत लागली तर सांगा असे मायेपोटी सांगितले . माझी नणंद ,कॉलेजच्या प्रिन्सिपॉल पाटील मॅडम, आहेर मॅडम तिघीनींही....... कोणतीही..... अगदी पैशाची मदत लागली तरी सांगा..... असे प्रेमाने बजावले. वहिनीने डबा देण्याची सुद्धा तयारी दर्शवली. पण ते व्यवहार्य नव्हते.विशेष म्हणजे माझी एकेकाळची विद्यार्थिनी आणि भोरचे सहकारी श्री. शिंदे यांची पत्नी सौ. चित्रलेखाने दररोज फोन करून सातत्याने follow up घेतला . काळजी पोटी अनेक सूचना केल्या. धीर दिला .खरेच तिचे खूप कौतुक वाटले .
आणि असे सात दिवस काढले.....
मुलीचे ठाम म्हणणे होते कि मला काहीच झाले नाही.. मी दुसरीकडून टेस्ट करून कन्फर्म करते. ती रुबीला जाऊन परत टेस्ट करून आली आणि ती निगेटिव्ह आहे असा रिपोर्ट मिळाला. .....जीव भांड्यात पडला. निम्मे टेन्शन दूर झाले. मग शंका येऊ लागली......यांची टेस्ट तरी बरोबर होती का???
सांगता येत नाही........ कागद जे सांगतो त्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो.
अशा प्रकारे सात दिवसात सनसनाटी असे काही घडले नाही . ....आपोआप ताप कमी झाला. सर्दी नाही, खोकला नाही ,श्वासाचा त्रास नाही. काहीच नाही. फक्त अंगावर चालून आलेला कामाचा डोगर आणि जोडीला प्रचंड ताण. २१ जुलै २०२० रोजी यांच्या कोविड चाचणीचा पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला तेंव्हापासून सुरु झालेला हा कोरोना बरोबरचा जबरदस्त घबराटीचा प्रवास हळू हळू सावट दूर करत २७ जुलै२०२० रोजी ...माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण झाला. त्रेपन्न वर्ष पूर्ण होता होता माझ्या आयुष्याच्या पोतडीत अनुभवाचे पुरेपूर माप टाकून तो गेला.जाता जाता माणसांची असंख्य रूपे दाखवून मला समृद्ध करून गेला...
पाच दिवस आलेला ताप, जोडीला अंगदुखी आणि डोके जड होणे. बस्स एवढेच....इतका हा कोरोना साधा सोपा आहे का ?..... सर्व जग पाच- सहा महिने बंद पाडणाऱ्या या रोगाचे स्वरूप निश्चितच भयावह असणार आहे. हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. हॉस्पिटल मध्ये कॉटस मिळत नाही.ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. असे सगळेच भयंकर, भीतीदायक घडते आहे . म्हणजे हे गंभीरच होते आणि असणारच आहे पण आम्हाला या चिनी ड्रॅगनने जरा सौम्य रूप दाखविले. आपल्या शेपटीचा हलकासा फटकारा त्याने मारला .शारीरिक हानी फारशी केली नाही. पण मानसिक ताण मात्र पुरेपूर दिला.....
पण एक खंत मात्र तीव्रतेने जाणवली. घराच्या जवळपास राहणाऱ्या माणसांनी मात्र ढुंकूनही बघितले नाही. देवाच्या कृपेने मी सर्व करायला समर्थ होते .मला मदतीची अजिबातच गरज भासली नाही (पण कोणाला असू शकते.). ..... एक माणुसकी म्हणून चौकशी!!!!!........ तेही फोनवरून सुद्धा करण्याचे सौजन्य या वेळी आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दाखविले नाही. आधी असे घडले नव्हते. हा कोरोनाचा प्रताप !!!!! कोरोना रुग्णाच्या जवळ जाऊ नये हे ठीक आहे.... घराची दारे करून घ्या बंद ......पण मनाची कवाडे उघडायला मनाई नसते ....... घरी बसून फोनवरून विचारायला काहीच हरकत नसते . अशी कोरोना पीडित अनेक घरे आजूबाजूला असू शकतात. ते रुग्ण म्हणजे काही गुन्हेगार नव्हेत .... काय झाले ? बरे आहे का? काही लागले तर सांगा ..... आम्ही आहोत .......असे नुसते म्हटले तरी धीर येतो माणसाला...... अजून तरी फोनच्या लहरींमधून कोरोना पसरतो असे ऐकलेले नाही.......
...... यात माझीही चूक असणार. मीच आपण होऊन कधी कोणाशी संबन्ध वाढवलेच नाहीत.मीही माझ्या बेटावरच जगते आहे ...
आत्ताच्या या जगात प्रत्येक माणूस स्वतंत्र बेटावर राहतो आहे. जो तो आपल्याच कोशात गुरफटलेला, आपल्याच पाया पुरते बघणारा .(यात मीही आलेच ).अत्यंत - स्व केंद्रित. स्वार्थी, कातडी बचाऊ .त्यात या कोरोनाने आणिकच आपल्यापरीने भर घातली आहे. परंतु त्यातही लांब राहून चौकशी करायला, धीर द्यायला,लांबून लागेल ती मदत करायला काहीच हरकत नसते. पण काही माणसे सोयीस्कररित्या ते टाळतात......Social distancing पाळता पाळता मनानेपण दूर दूर पळतात. शब्दाचीही काटकसर करतात.शाब्दिक औदार्य दाखवायलाही कचरतात. मनाने कोसो दूर निघून गेलेल्या या माणसांना social animals का म्हणायचे?
खरं तर आता माणसाची social animal म्हणून पुढील व्याख्या करायला काहीच हरकत नाही.
"the animal who makes abundant use of social media in isolation... is a social animal." .............
नाही का?
तुम्हाला काय वाटते?
आपल्याला हे बदलले पाहिजे. काही माणुसकीची बेटे निश्चितच आहेत. ती वाचवली पाहिजेत. मला काही माणुसकीची बेटे भेटली. पण बेटावरचीं isolated माणसे पण भेटली. खरंच हे बदलले पाहिजे. Social distancing पाळूयात पण मनाचे distance कमी करूयात.चला खरोखरचे social होऊ यात....... . माझ्यापासूनच सुरुवात करायला हवी........
नेहा देव