गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

मनाच्याही मनातले -१४) नाही हे भावत मना....

मनाच्याही मनातले- नाही हे भावत मना.....

स्वातीने ग्रुपवर साड्यांचा  व्हिडियो टाकला,  आणि मी  तो  पूर्ण बघितला ........एकदा नव्हे दोनदा!!!!!........सगळेच मेसेजेस मी वाचतेच असे नाही. पण हा मात्र काळजीपूर्वक बघितला.......कारण???.....साडी.!!!!!!!....... 

साडी!!!!!!! ......माझ्या वयाच्या कोणत्याही स्त्रीचा विक पॉइंट....... माझाही ........

केंव्हाही नवीन साडी खरेदी करायची म्हटले की जीव भुरळतो.....डोळे लकाकतात.....मनात काही तरी रेशमी सळसळते .........

घरात आधीच्या साड्या कितीही असल्या तरीही नवीन साड्यांची हौस काही फिटत नाही.....अजूनही......

पण lockdownच्या वर्षभरात कित्येक दिवस साड्यांच्या घड्यांना हातच लावला गेला नाही.

त्या केविलवाण्या पडून राहिल्या कपाटात .......तशाच........ कित्येक दिवसात उलगडल्या गेल्याच नाहीत.

मग प्रश्न पडला ........ का करतो आपण इतका साड्यांचा हव्यास???

किती कपडे घ्यायचे?...........किती भरून ठेवायचे?........किती हा सोस??.......न संपणारा........

असे किती कपडे लागतात माणसाला जगायला?.......एक दांडीवर एक अंगावर इतक्या अत्यल्प वस्त्रावर पण जन्म काढतात अनेक लोक........मग आपल्याला का ही अति हाव???

मुळात माणूस कपडे का वापरतो?

कपडे!!!! ......बुद्धिमान माणसाने स्वत:ला आवरण म्हणून निर्माण केले ........वस्त्र प्रावरण....

वल्कले...... ते...... जीन्स!!!!! असा मोठ्ठा प्रवास या वस्त्राचा.........मध्ये टप्पा साड्यांचा......शालू, पैठणी आणि इतर अगणित प्रकारच्या......

पूर्वीच्या शालू, पैठणीची जागा आता कित्येक नवनवीन विलोभनीय रेशमी, डिझायनर साड्यांनी घेतली आहे. झालरीच्या सुद्धा साड्या असतात हल्ली  ......तरीसुद्धा अजूनही पैठणीत जीव अडकतो माझा.....  पण गंमत अशी कि तितकाच जीव अडकतो शांता शेळके बाईंच्या "पैठणी" कवितेमध्ये सुद्धा............

शांता बाईंच्या पैठणी कवितेचा उल्लेख केला तरी मंद अत्तराच्या सुगंधाने मन गंधित होते.......

शालू, पैठणी म्हटले कि मला अजून एक अबोली आठवण येतेच येते!!!

आईने सुटकेसमध्ये पांढऱ्या कापडात बांधून, जपून ठेवलेला तो फिक्या अबोली रंगाचा शालू नजरेसमोर येतो........ त्यावर सुंदर सोनेरी पिंपळपानाचे बुट्टे होते.

जेंव्हा जेंव्हा ती तो बाहेर काढायची तेंव्हा जवळ बसून मी तो डोळा भरून निरखून बघायची. ........शिवाय त्यात आई आपले शिकवणीचे पैसे जपून ठेवायची...... अडी-अडचणीला तेच उपयोगी पडायचे.

दोन्ही भावांच्या मुंजीच्या वेळी घेतला होता तो शालू........शालूच्या पारंपारिक रंगांपेक्षा अगदीच वेगळ्या अशा अगदी फिक्कट ... फिक्का......अबोली रंगाचा......फिक्या अबोली रंगात फिका गुलाबी मिसळल्यावर जी छटा होईल तोच त्याचा रंग होता....  आईच्या शांत अबोल स्वभावाप्रमाणेच अबोली रंगाचा .......मला खूप आवडायचा!!!. आईकडे तेवढीच एक भारी ठेवणीतली साडी होती. अनेक विशेष महत्त्वाच्या कार्यामध्ये तोच शालू ती नेसायची.........एकच साडी पुन्हा पुन्हा.... तीच  तीच...... जपून सांभाळून ठेवलेली ........ वापरलेलीच .........निरुपाय असला तरी फारशी खंत न बाळगता ......

आणि आत्ता????

आता प्रत्येक इव्हेटला एक नवीन...... शक्य असेल तेवढे अधिक किमतीचे........भारी .......महाग ......भरमसाठ किमतिचे वस्त्र घेतले जाते ..........वस्त्र अशासाठी म्हटले कारण आपल्याकडचे अनेक सण-वार रूढी- परंपरा आता केवळ इव्हेट म्हणून घडतात......घडवले जातात ....तशी फॅशनच आहे.... आणि त्यासाठी प्रचलित फॅशनची वस्त्रे घातली जातात.........  फोटो सेशनच्या फ़ैरी घडतात. आणि मग लगेच ते वस्त्र बाजूला पडते.......... कुचकामी होते......कारण काही दिवसांनी त्याची फॅशन जाते.....

मग तो वरील प्रश्न पुन्हा पडतो........... माणूस कपडे का घालतो?

लज्जा रक्षणासाठी?  ...शरीर संरक्षणासाठी?....सुंदर,ऐटबाज दिसण्यासाठी?.....आपण समाजातीलच एक आहोत..... वेगळे नाही....  हे दर्शवण्यासाठी?......श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी ?.....कपड्याच्या व्यापाऱ्यांचा धंदा चालावा म्हणून ?? कि केवळ  फॅशन साठी???

या प्रश्नाला माझ्या पुढील पिढीचे अनिवार्य उत्तर हेच की कपडे घालावे केवळ आणि केवळ फॅशनसाठीच!!!!!

ही फॅशन म्हणजे .....एक गम्मतच आहे.....जादू आहे......भूलभुलय्या आहे ......

तमाम बॉलीवूडची ती जान आहे.......मॉडेल विश्वाचा ती श्वास आहे.....

भयंकर पॉवरफुल आहे हे प्रकरण!!!!.

ही फॅशन  काय करू शकत नाही?

हिने पाहता पाहता हिंदू पोरींच्या कपाळावरील कुंकू पार पुसून टाकले....... हातातल्या बांगड्या काढून घेतल्या ........पायातले पैंजण ओढून घेतले........ केसातले गजरे काढून घेतले..........

माझी पिढी सोडली तर पुढील पिढीमधील कोणतीही तरुण मुलगी कुंकू किंवा टिकली नेमाने लावत नाही...... गजरा घालायची त्यांना लाज वाटते.......बांगड्या घालणे हे काकुबाईचे लक्षण वाटते. .....

खर तर कुंकू, टिळा ही आपल्या धर्माची निशाणी......पण आपला धर्म आपण इतका हलक्यात घेतो की अनेक गोष्टी आपण सहज हवेत उडवून दिल्या......... इतर धर्म आपली कोणतीच गोष्ट इतक्या सहजपणे सोडत नाही. आणि आपण आपली कोणतीच गोष्ट जीवापाड धरून ठेवत नाही.

.................काही जण सोडतच नाहीत................आपण धरून ठेवतच नाही.

 खरे तर माणसाच्या सर्व राहणीमानाचा पाया तेथील स्थानिक- भौगोलिक परिस्थिती असते.....त्यावरच कालांतराने संस्कृतीची बांधणी होते आणि मग ती आपली ओळख बनते........पण आज अशी स्थानिक ओळख पुसली जात आहे आणि एक जागतिक ग्लोबल- संस्कृती उदयाला आलेली आहे ...... आणि या ग्लोबल संस्कृतीचा परवलीचा शब्द आहे फॅशन......या फॅशनच्या पायात साडी गेली....... पंजाबी सुट पण गेला आणि आता आल्या जीन्स आणि शर्ट.....मुलामुलींचा एकच पेहेराव.....भेदभाव नाही...... पुढारलेपणाचे लक्षण.. स्त्री पुरुष समानतेचे लक्षण म्हणजे स्त्रीने मुलाप्रमाणे कपडे घालायचे... शिवराळ भाषा बोलायची आणि राजरोस व्यसने करायची.......... ही फॅशन आहे.

 या फॅशनचे मुख्य केंद्र आहे हॉलीवुड!!! ....हॉलीवुड...बॉलीवुड....स्थानिकवुड.... अशी पाझरत पाझरत थेट शहरी मग ग्रामीण भागातील घराघरात ही फॅशन  घुसते.

फॅशन कसलीही असते ......केशभूषा, वेशभूषा, राहणीमान, भाषा ...कसलीही........

पण जास्त करून फॅशन हा शब्द आपण कपड्यासाठीच वापरतो. 

खरतर वस्त्र प्रावरणातील फॅशन म्हणजे सौंदर्य, कलात्मकता, सृजनशीलता यांचा सुरेख संगम असावा अशीच आपली अपेक्षा असते.

पण सध्या फॅशनच्या नावाखाली जे काही माथी मारले जात आहे आणि फॅशन च्या नावाखाली जे काही घातले जात आहे, त्यातील काही गोष्टी कोणत्याही अंगाने सुंदर, भारी, ऐटबाज वाटतच नाही......पुढून खाली, मागून वर किंवा पुढून वर आणि मागून खाली गेलेला कुर्ताडावीबाजू वर आणि उजवी खाली किंवा उजवी बाजू वर आणि डावी बाजू खाली असलेला कुर्ता..........कुर्त्याची पुढची बाजू वेगळी.. मागची वेगळी ....डावी बाजू आणि उजवी बाजू वेगवेगळ्या रंगाची किंवा डिझाईनची सुद्धा. मुलींच्या कुर्त्याला खांद्यावर रुपयाच्या आकारापासून ते खूप मोठे भोकसांड वाटेल इतके मोठे भोक......आणि सर्वात वाईट म्हणजे फाटक्या आणि फेडेड जीन्स...........

जीन्स हे सध्याच्या ग्लोबल संस्कृतीचे - तरुण पिढीचे लोकप्रिय वस्त्र आहे.

या जीन्स मध्ये गेली सहा सात वर्षे एक फॅशन  सध्या फारच जोरात आहे.. ती म्हणजे........फाटक्या आणि फेडेड जीन्स.

बीभत्स, ओंगाळवाण्या.......सौंदर्याचे नव्हे तर कल्पनादारिद्र्याचे प्रदर्शन घडवणाऱ्या........कितीही पटवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न  केला तरी ही  फॅशन काही मनास येतच नाही......

परत तोच प्रश्न पडतो माणूस कपडे कां घालतो?

"रेशमी सलवार कुर्ता जालिका ....रूप कहा नही जाए नखरेवालिका" ...या गीतामधील जाळीदार कुर्ता सुंदर ललनेवर निश्चितच खुलतो पण मुद्दामहून गुडघ्यावर फाडलेल्या किंवा फेडेड पॅन्टस मला कधीच सुंदर दिसत नाहीत..... याआधी मधल्या काळात low-waist नावाची अशीच एक अत्यंत ओंगळवाणी फॅशन आली होती. त्या मधून अंतर्वस्त्र दिसतील अशी सोय व्हायची ...कदाचित तोच त्यांचा हेतू होता..

थोडक्यात सध्याच्या या काही फॅशन्स मध्ये दिसते ती केवळ विसंगती, असमतोल, विचित्रपणा, कल्पना दारिद्र्य, बिभत्सता,कुरूपता,ओंगळवाणेपणा...आणि......आपल्या कल्पना दारिद्र्यातून केलेल्या विद्रूप कृतीला कलाकृती म्हणण्याचा केविलवाणा खटाटोप!!!!! 

विसंगतीमध्ये सुद्धा सौंदर्य असू शकते......  free hand drawing नही का सुंदर दिसते !!! ...... पण कुर्त्याला एकच बाही असणे आणि एक हात उघडा असणे यात खूप सौंदर्य आहे किंवा सृजन आहे असे मला तरी वाटत नाही. यापुढे कदाचित एका पायातच पॅन्ट आणि दुसरा पाय उघडा अशी पण फॅशन येईल.......... किंवा पुढचा भाग झाकलेला  आणि मागचा पूर्ण उघडा....अशी सुद्धा!!!!!!

नाविन्य  आणि कुरूपता या दोन भिन्न गोष्टी आहेत.....नाविन्याच्या हव्यासासाठी बिभत्सता, कुरूपता मिरवायची का?

अर्थातच हा ज्याचा त्याचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे.

शेवटी आपण काय घालायचे, कसे राहायचे हा प्रत्येकाचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे. मी कशाला त्यावर इतका विचार करायचा???

तरीही लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते. ......

..........एका राजाला अतिशय उत्तम नाविन्यपूर्ण, अतितलम, वजनाला हलके पण भारी वस्त्र हवे असते......एक लबाड शिंपी त्याच्याकडून भरपूर बिदागी घेऊन खरेखुरे कपडे शिवतच नाही... तर खोटेच सांगतो की मी तुमच्या अंगवर अती तलम कपडे घातले आहेत ते तुम्हाला आरशात दिसणार नाहीत पण  आम्हाला दिसते आहे. .......आणि ते तुमच्यावर अगदी खुलून दिसत आहे!......... तो मूर्ख राजा  नग्नपणेच मिरवणुकीला निघतो ..... आपण खूप सुंदर वस्त्र घातले आहे अशा भ्रमात  मिरवत जात असतो....... सर्व प्रजा मनातल्या मनात हसत असते पण राजाच्या दंडुकेशाहीला घाबरून वरवर त्याची वाहवा  करत असते.

एक लहान मुलगा मात्र बाल- सुलभ निडरपणे, निर्भयपणे सहज बोलून जातो....”अरे ... बघा ..बघा ......राजा उघडाच आहे!!!”.............

आज ग्राहक-राजाला फॅशनच्या नावाखाली लबाड कंपन्या अशाच लुबाडत आहे. फॅशनला शरणागत लोक भ्रमामध्ये राहून एखादी ओंगळवाणी फॅशन सुद्धा मोठ्या शेखीने मिरवत आहेत...पण माझ्या मनामध्ये मात्र तो निरागस, स्पष्ट बोलणारा छोटा मुलगा डोकावतो आहे. 

पूर्वी एका शालूमध्ये..... पैठणीमध्ये आयुष्याचा अख्खा पट सुबक, नीटस बांधलेला असायचा...त्याच्या पदरात व्यक्तिमत्व, नातेबंध आणि हो.. संस्कृतीसुद्धा घट्ट बांधलेली असायची....... आज ढीगभर कपडे असून सुद्धा आयुष्य आणि नाते बंध बांधले जातच नाहीयेत..........फाटके झाले आहेत!!! विसविशीत झाले आहेत....का जाणून बुजून केले आहेत???? ....फाटक्या जीन्स सारखे????

©नेहा देव


रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

मनाच्याही मनातले १३) ती मी नव्हेच!!!!

 ती मी नव्हेच!!!!

नुकताच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा, जी सूत्रसंचालक, नर्तकी सुद्धा आहे ..असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या तरुण अशा कलाकार स्त्रीचा पहिला- वहिला कवितांसंग्रह प्रसिध्द झाला. 

त्यातील कवितांचे वाचन करताना एका कवितेत ती स्वत:च म्हणते, "मी कवयित्री नाही."..........

ही स्वत:बद्दलची खात्री असतानासुद्धा काहीजणाचे लेखन मोठ्या गाजावाज्यात प्रकाशित होते. त्यामागे त्यांचे समाज माध्यमातील प्रसिद्धी वलय कारणीभूत असते. त्यांच्या प्रमाणेच अनेक लाखो लोकं असेच काही लिखाण किंवा कविता करीत असतात... पण ते प्रकाशित होऊन त्याला प्रसिद्धी मिळतेच असे नाही.

वरील अभिनेत्रीचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे मी ही हे असे थातुर -मातुर लिखाण करते. जे अतिशय तुटपुंजे आहे. त्याला तितकेसे साहित्यिक मूल्य नाही. साहित्याच्या अथांग सागरातील माझे लिखाण म्हणजे एक य:कश्चित तुच्छ कण.........पण काही माझे हितचिंतक मला प्रेमाने आग्रह करतात कि तुम्ही हे प्रकाशित करा.............

तेंव्हा मला त्या अभिनेत्रीप्रमाणेच म्हणावेसे वाटते..... ......मी ती नाहीच......मी लेखिका नव्हेच......

पण तरीही......मी काहीतरी लिहित राहते..........पांढऱ्यावर काळे करीत राहते.....हे साहित्य नाही ....खरेच ...पण त्या आहेत निखळ.... प्रामाणिक भावना!!!!!!

मला नेहेमीच वास्तवाचेच, जे खरेखुरे आहे त्याचेच आकर्षण वाटत आले आहे.

सगळ्या जगात प्रसिद्ध असलेल्या हॅरी पॉटरचे किंवा सुपरमॅनचे मला किंचितही आकर्षण कधीच वाटले नाही. त्यांच्या लेखकांची प्रतिभा असामान्य आहे हे खरे...... ..त्यांना सलाम.!!!!...कधी कधी तर कल्पनेत भविष्यातील वास्तव दडलेले असते. सृजनशीलतेचा तो एक उत्तम आविष्कार असतो.......

पण तरीही........ काल्पनिक ...भासमान...सत्यात नसलेले मला कधीच भावले नाही...मला सत्य घटनेवरच्या ...वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या कालाकृतीचेच अधिक आकर्षण वाटत आले आहे.

"सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे

जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे....."

बा. भ. बोरकरसाहेबांना असाध्य गोष्टीची आस आहे.....असामान्य माणसाची असामान्य प्रतिभा..........

 माझ्या सारख्या सामान्य स्त्रीला मात्र सत्याचीच तीव्र आवड आहे.....का??..... कोणास ठाऊक.?........ज्याची त्याची आवड......

माझ्या मनात असंख्य विचार सातत्याने घिरट्या घालत असतात.......अगदी घोंगावत असतात ....भूत... अन वर्तमान.. ...........अनेक गोष्टींचे तरंग ...त्याची आवर्तने..... घटना-प्रसंग........ भावना आणि विचार ..... त्यांची बिंब- प्रतिबिंब .....

काही विचार आणि भावना तर दीर्घ काळ कोंडून राहिलेल्या................माझे लिखाण हे त्यांचेच outlet........

...... सर्व अगदी खरे खरे...

 लहानशी वैदेही आणि मैत्रेयी स्टेजवर निरागसपणे नाचताना,गाणे म्हणताना, नाटकात काम करताना, बक्षीस घेताना बघताना मन भरून आलेले आनंदाश्रू......जितके खरे ...........माझी आई गेल्यावर तिच्या आठवणीने डोळाभरून आलेले दु;खाश्रू .जितके खरे........प्रसववेदना जितकी खरी.....पहिलेवहिले अपत्य हातावर घेताना मनात जाणवलेली थरथर जेवढी खरी ....स्वच्छ सूर्यप्रकाशात जाणवलेली प्रसन्नता जेवढी खरी......निखळ........तितक्याच या सर्व भावना ....संवेदना अगदी सत्य....या भावनाचे अनेकविध पदर ...अनेक छटा.....अनेक स्तर ......मनात आल्या तेंव्हा जाणवले होते ते स्तर, ते पदर...... पण अनेकवेळा व्यक्त होताना  निसटून गेले ते .... ...पण ज्या राहिल्या त्या सर्वच भावना मात्र अगदी खऱ्याखऱ्या .......... अगदी स्फटिका सारख्या निर्मळ...निखळ आणि स्वच्छ.........

त्यात खोटेपणाचा, अप्रामाणिकपणाचा, किंवा काल्पनिकतेचा लवलेशही नाही............त्यात कोणाला दुखवण्याचा किंचितही हेतू नाही.....कोणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही नाही.......

त्या लिखाणात मला लेखिका म्हणा असा अभिनिवेशही नाही........त्यात कोणतीही छुपी महत्वाकांक्षासुद्धा नाही....स्वत;ला सिद्ध करून दाखवण्याची तडफड नाही........कोणावर दोषारोप नाही.......कोणताही blame-game नाही...

तरीही मी लिहिणार...

कोणाला ते आवडते,....कोणाला ते भावते....कोणाला त्यात आपले प्रतिबिंब दिसते ........कोणाला माझ्या नकळत ते दुखावते ...........कोणी नाकेही मुरडतात.........कोणी गैरसमज करून घेऊन संतापतात.........माझा तसा हेतू नसतानाही............कोणी माझ्या लिखाणाच्या क्षुद्रतेची कीव करतात ....कोणी माझ्या लिहिण्याच्या धाडसावर हसतात.......

 तरीही मी असे काही-बाही लिहिणारच........

मी लेखिका नाहीच........ तरीही............

या लिखाणाला नाही प्रसिद्धीची आस.......

या लिखाणाला नाही कौतुकाच्या वर्षावाची तहान.........

कोणी वाचले तर आनंदच आहे.....

नाही वाचले तरी राग नाही.............


जे आहे ते......जे घडले ते...... जे मनाला वाटले ते.....जे पटले ते....जे रुचले ते...जे टोचले तेही ....कोणापुढे कधी जे बोलले नाही ते ......हे असेच कागदावर लिहित राहणार.........जरी मी ती नाही....मी लेखिका नाही....तरीही.....

मी आहे एक संवेदनशील माणूस......कोठे ठेऊ मी माझे  विचार?  ...कोणाला सांगू या माझ्या भावना? .....कोठे आणि कशा व्यक्त करू या संवेदना???.......काही खुपलेले......काही जाणवलेले ....काही उमटलेले......काही जपलेले.....काही लपवलेले....कोठे ठेऊ??? ..........मग ते आपसूकच उतरते कागदावर ...........माझ्या जिवंतपणाचे ते लक्षण ...माझ्या जिवंत मनाचे ते द्योतक ......माझे लिखाण......

म्हणून मी लिहिते......मी ती नव्हेच.....मी लेखिका नव्हेच..... तरीही..............

 ©नेहा देव 

रविवार, १६ मे, २०२१

मनाच्याही मनातले १२) नशा

१२)  नशा

सकाळची आवराआवर झाली कि दुपारी नियमित online lectures. त्यानंतर हौसेने अंगावर ओढवून घेतलेले काहीतरी नवीन शिकण्यासाठीचे online classes किंवा seminars- conferences इ.चे  पुन्हा  online काहीतरी....मग रात्रीचे जेवणखाण, पुन्हा आवराआवर.......... त्यात कोरोनाच्या वातावरणाचा सतत एक अदृश्य ताण ......हे सध्याचे दैनंदिन जीवनचक्र.

पूर्वी (म्हणजे lock down पूर्वी ... जवळ जवळ सव्वा वर्षापूर्वी ) प्रत्यक्ष महविद्यालयात जाणे -येणे  असायचे. तेव्हा जाण्या- येण्याची दगदग व्हायची..........आता ती दगदग नसली तरीही इतर  शारीरिक- मानसिक ताण आहेतच. .... मग त्यावर उतारा अत्यावश्यकच असतो. ......मग हवी असते ती नशा. .......

हल्ली रात्री आठच्या नंतर मी कधीच शुद्धीवर नसते..... नशेतच असते....माझ्या शिणलेल्या मेंदूला आता काहीही करून  नशा हवी असते.......हो!!! नशाच!! ........कोणती?.......दूरदर्शनवरील कार्यक्रमांची .............

रात्रीचे जेवण झाल्यावर मी माझ्या विवक्षित जागेवर दूरदर्शन समोर पहुडते आणि शरीर आणि मन पूर्णपणे सैलावलेल्या अवस्थेत  मराठी मालिका, बातम्या, आततायी चर्चा यांच्या नशेत आकंठ बुडून जाते.

अट्टल दारूबाज जसे शुद्धीत असताना म्हणतो की दारू पिणे वाईट ...पण वेळ झाली कि बरोबर दारूच्या दुकानाकडे त्याचे पाय वळतात .....माझेही तसेच होते... रात्री आठ नंतर माझी पावले आणि डोळे ..दूरदर्शन कडे वळतात.

गेले वर्षभर  मी दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील  विविध मालिका अव्याहतपणे बघत आहे .(त्या आधी हे प्रमाण जरा कमी होते.) वाहिन्या वेगवेगळ्या, मालिका वेगवेगळ्या, कलाकार वेगवेगळे पण कथा सर्वसाधारण सगळ्या मालिकांमध्ये एकच. कोण्यातरी गरीब बिचाऱ्या व्यक्तीवर (बहुधा स्त्रीवर..कोणी गावंढळ, कोणी काळी, कोणी जाड, कोणी अगदी गरीब) घराबाहेरील किंवा घरातीलच काही लोक ...मग तो नवरा, सासू, नणंद, सवत यापैकी कोणीही किंवा त्यांचा एक कंपू सातत्याने  अन्याय करतच राहतात .......करतच राहतात......ती व्यक्ति कोणताही प्रतिकार न करता सहन करतच राहते..... करतच राहते....मी रिकाम्या डोक्याने अक्कल गहाण ठेऊन बघतच राहते........ बघतच.... राहते..... .कथेचा  जीव एवढासा, पण आपल्या पोटापाण्यासाठी, मालिकांचे लेखक ती कथा आडवी- तिडवी कशीही  मनसोक्त ताणतच राहतात आणि आमच्यासारखे नशेचे अधीन तो मूर्खपणा किंवा वेडाचार  बुद्धीवर पडदा घालून  जाणून बुजून उघड्या डोळ्यांनी बघतच राहतात.....

मात्र  हा आठवडा चांगलाच दणदणीत होता .......लेखकाला आपण अतीच ताणले आहे याची किंचित जाणीव झाली असावी......किती काळ या गरीब बिचाऱ्यानी (म्हणजे आमच्या सारख्या दर्शकांनी ) अन्याय सहन करायचा??? असे काहीतरी  guilty वाटले असावे. हा आठवडा सणसणीत थोबाडीत मारण्याने गाजला.

अरुंधतीने संजनाला, माईनी सोनालीला , शंतनुने आयुष रणदिवेला,शर्वरीच्या आईने ऐश्वर्याला सणसणीत थोबाडीत  लगावल्या. दीपा कार्तिकला पुढच्या आठवड्यात मारणार आहे. बायाबापड्या नक्कीच खुश झाल्या असाव्यात...... 

मला वाटते  सगळ्या मालिकांचे लेखन एकाच लेखकाकडून केले जात असावे....कारण बहुतेक मालिकांमध्ये समांतर प्रसंग घडत राहतात.......मालिकेतील पात्र प्रेग्नंट राहणे, लग्न/साखरपुडा, ,मंगळागौर साजरी करणेआणि आता सांगितले त्याप्रमाणे थोबाडीत मारणे असे समांतर प्रसंग विविध मालिकांमध्ये एकाचवेळी घडतात. 

सुरुवातीला काही नवीन विषय म्हणून काही मालिका बऱ्या वाटतात पण हळू हळू त्या इतरांच्याच प्रमाणे तर्कहीन कृत्रिम, अवास्तव होत  जातात. कोणतेही लॉजिक, वास्तवतेचा स्पर्श नसलेल्या, अतिरंजित, कल्पनाशक्तीचे दारिद्र्य दर्शवणाऱ्या या बाळबोध  मालिकांचा हा  बाजार ....त्यामधील जाहिरातींच्या अत्याचारासकट आम्ही का बघतो?.... माणसे दारू का पितात?  दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकच...

मी  एकाच वेळी वेगवेगळ्या वाहिन्या  आलटून पालटून लावत  त्यातही काही वैविध्य मिळते का हे शोधण्याचा  केविलवाणा प्रयत्न करत राहते. अधून मधून तोंडी लावायला तार सप्तकात किंचाळून किंचाळून केलेल्या चर्चा रुपी गोंधळ  किंवा  एकमेकांवरील चिखलफेकी मधून  काही बरा बौद्धिक युक्तिवाद ऐकायला मिळतो का हे शोधण्याचा प्रयत्न करते. पण बहुसंख्य वेळेला पदरी निराशाच पडते.

कधी  कधी मात्र एखादा उत्तम कथेचा अथवा चित्रपटाचा खजिना आकस्मिक.... अनपेक्षितपणे हाताला लागतो. 

माझी नशा खाडकन उतरते आणि मी सावध होऊन बघू लागते.

त्यादिवशी असेच घडले, या वाहिनी वरून त्या वाहिनीवर उड्या  मारता मारता अचानकच चित्रपटाचे शीर्षक दिसले...." निळकंठ मास्तर"...... नशेतल्या बेहोष मेंदूला जाणीव झाली .......हे काहीतरी वेगळे आहे.....

मी सरसावून बघू लागले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वसामान्य व्यक्तींनी स्वातंत्र्य संग्रामात आपल्या  सर्वस्वाच्या दिलेल्या आहुतीची ही असामान्य, अलौकिक कथा. सर्व तरुण टवटवीत कलाकारानी साकार केलेली . मला फार कौतुक वाटले त्या सर्वच पोरांच्या धाडसाचे. स्वातंत्र्य समर हा विषय? आताच्या काळात ??.... मोठेच धाडस.........

नायकाचे नाव माहित नव्हते , पण नायिका ओळखीची होती.... पूजा सावंत ,जोडीला नेहा महाजन .किशोर कदम, विक्रम गोखले आणि आदिनाथ कोठारे असे नवे आणि जुने दिग्गज कलाकार. मी  पूर्ण शुद्धीत, मंत्रमुग्ध होऊन पूर्ण चित्रपट बघितला.

कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शन सर्वच  उत्तम. त्यातून स्वातंत्र्यपूर्व काळ हुबे हूब डोळ्यापुढे उभा केला होता. निळकंठ मास्तर नावाची मुख्य व्यक्तिरेखा .......पेशाने शिक्षक असलेला हा माणूस स्वत:ला स्वातंत्र्य लढ्यात  झोकून देतो........त्याच्या आयुष्याची  तर होळी होतेच पण त्याच्या घरच्या सर्व माणसांचीपण पूर्ण वाताहत होते.

त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या बाल मैत्रिणीला तो राष्ट्रकार्य करायचे म्हणून स्वीकारत नाही. तिचा स्वार्थी मामा वेड्या इनामदाराबरोबर तिचे लग्न लावून देतो. तिचे सासरे पण क्रांतिकारीच असतात. पुढे योगायोगाने तिच्याच वाड्यात  तो नाव बदलून पुढचे कार्य करण्यासाठी येतो. तिच्या आशा पुन्हा पल्लवित होतात. पण तो निग्रहाने तिला आवरतो.

इंग्रजांना त्याचा पत्ता लागताच ते वाड्यावर धाड घालतात. त्यांना पुरावा मिळू नये म्हणून त्याची ही पूर्वाश्रमीची  प्रेमिका ...वाड्याची मालकीण... इनामदारांची सून ..... वाड्याला  आग लावते आणि  त्याच्या प्रेमाचा दाह उराशी बाळगत  खऱ्या आगीत जळून भस्म होते.

 निळकंठ मास्तर लढ्यात मारल्या गेलेल्या आपल्या  मित्राच्या पत्नीला  बरोबर घेऊन लपत् छपत क्रांतिकार्य करीत पुढे जातो. काही काळाने इंग्रजांच्या जाळ्यात सापडतो. तुरुंगवास भोगतो. तुरुंगातून बाहेर पडताना देशाला स्वातंत्र्य  मिळालेले असते. मित्राच्या विधवे बरोबर लग्न करायची त्याची इच्छा असते ....पण ती नाही म्हणते. तिचे कार्य हेच तिचे जीवन असते....

........निळकंठ मास्तरच्या हातात काय राहते ? ........एक मोठे शून्य..............देशासाठी मनमुरादपणे दोन्ही हातानी आयुष्य उधळून दिलेल्या या माणसाची ओंजळ रिकामीच राहते.......

 इंग्रजांच्या  पदरी काम करणारी एक व्यक्ती जमेल तेवढी मदत करत  निळकंठ मास्तरांना  वरचेवर  विचारत राहते ........."हे तू का करतोस? यातून तुला काय मिळणार आहे?" .........   निळकंठ मास्तर म्हणतात ...... "हे माझ्यासाठी मी करतच नाही. ......माझा देश स्वतंत्र व्हावा... केवळ आणि केवळ  यासाठीच मी हे कार्य करतो .... मला काही मिळावे म्हणून नाहीच"..........

असे अनेक निस्वार्थ जीव आगीत होरपळले.......त्यांचे सोने झाले........

बिना खड्ग .. बिना ढाल मिळालेले नाही आपल्याला हे स्वातंत्र्य.........

आपले सर्वस्व ओवाळून टाकले अशा अनेक निळकंठ मास्तरांनी.... प्रसंगी शस्त्र उचलले आणि त्याची  फार फार मोठी किंमत सुद्धा मोजली.......... ......असंख्य आयुष्य अक्षरश: मातीत मिळाली....  झिजली.... कष्टली......गाडली गेली ......त्यांच्या बलिदानांवर हे स्वातंत्र्य उभे राहिले.. केवळ स्वत:च्याच  नव्हे  तर जोडीला आपल्या कुटुंबाच्या, जीवाभावाच्या अनेकांच्या  आयुष्याची अक्षरश: होळी केली  अशा अगणित लोकांनी ...... बदल्यात त्यांना काय मिळाले???? .....एक जीवघेणी उपेक्षा!!!!!!.........

अशा असंख्य  अनामवीरांसाठी न कोणी लावली पणती ......न कोणी उभारला स्तंभ............त्यांच्या साठी हळहळ व्यक्त करायालापण कोणी मागे उरलेच नाही.......  स्वातंत्र्याची जबर किमत मोजली अशा अनेक अनामिकांनी.

आणि ...आपण?????...........फुकटात मिळाले आपल्याला  हे स्वातंत्र्य !!!!!.....त्याची किती जाणीव ठेवतो आपण?????..........

जन्माला येताच श्वासासारखे आपसूक  मिळाले  आपल्याला हे स्वातंत्र्य........ त्याचे  किती मोल आपण जाणतो????? त्याची किती किम्मत ठेवतो????.

भ्रष्टाचार, कामचुकारपणा, नियमांचे जमेल....पचेल तेवढे उल्लंघन, अत्यंत स्वार्थी, सत्तेला हपापलेले  राजकारणी, ...त्यांनी केलेले राजकारणाचे गुन्हेगारीकरण..अधिकच घट्ट बनलेल्या जातिजातीमधील भिंती .........राष्ट्रप्रेम  नावाचे मूल्य हळूहळू विसरत जातोय आपण.....राष्ट्रप्रेम हळूहळू चेष्टेच विषय ठरू लागला आहे..........शिवी ठरू लागली आहे........

पाश्चात्य  संस्कृतीच्या आहारी गेलेली... व्यसंनाधीन,कणाहीन, प्रेरणाहीन होत चाललेली तरुणाई.....त्यांना वाटते जगायचे कशासाठी ? तर  फक्त चैनीसाठी........

हे सर्व पाहिले कि मन खंतावते......मला खूप वेळा आतून वाटत राहते...आपण खूप उशिरा जन्माला आलो......

त्या स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलो असतो तर असेच राष्ट्रप्रेमाने भारलेले .....अर्थपूर्ण आयुष्य जगलो असतो.......अजून एक देह  मातृभूमीसाठी, राष्ट्रकार्यासाठी कांमी आला असता....... 

"तुजसाठी मरण ते जनन ....  तुजवीण जनन ते मरण"..........

असेच देशासाठी मरण पत्करून मी जगले असते...... 

सावरकारांनी अनुभवलेल्या या ओळी मी पण प्रत्यक्ष अनुभवल्या असत्या ............

कशी होती ही माणसं!!!!!.....कसे त्यांचे राष्ट्र्पेम!!! ...मी नुसत्या विचारानेच स्तब्ध होते........अंतर्मुख  होते .......

तीही एक नशाच.........पण केवढी विधायक !!!!!......   नरदेहाचा नाश नव्हे तर सार्थक करणारी..........ती झिंग ......ती नशा......ती धुंदी.......हा चित्रपट साकारणाऱ्या त्या सर्व मुलांनी ती निश्चितच अनुभवली असणार........हा चित्रपट करताना त्यानाही काही जाणवलेच असणार ....राष्ट्रप्रेमाचे  एक त्स्फुल्लिंग आत तेवत असणार.....जे आपल्यापैकी अनेकांना जाणवत असणार ........जे मला जाणवले...... ..जाणवत राहते......आत आत खोल खोल अस्वस्थ करते.......अशा जाणिवांची मने पुन्हा एकदा एकत्र गुंफली जावीत . निळकंठ मास्तरांसारख्या अनेकानेक क्रांतिकारकांनी  दिलेल्या स्वराज्याच्या देणगीचा  त्यांनी आदर करावा ...स्वराज्याचे  सुराज्य करण्यासाठी पुन्हा एकदा अनुभवावी.......... तीच राष्ट्रप्रेमाची बेफाम नशा !!!!!!!

©नेहा देव 

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

मनाच्याही मनातले...11) दीक्षित आणि दीक्षित

 

दीक्षित आणि दीक्षित

 

"तू दीक्षित डाएट करतेस का मामी ?"

सात वर्षाच्या स्वराने बेसावध क्षणी केलेल्या  या अनपेक्षित प्रश्नाच्या माऱ्याने मी एकदम सटपटलेच......खुर्चीतून पडता पडता सावरले!

नेहेमीप्रमाणे मी कॉम्पुटरवर दैनंदिन काम करत बसले होते. जेवायची वेळ होती तेंव्हा जेवलीस का असे तिला विचारायचे असावे.   अर्थातच जेवणाच्या संदर्भातील 'दीक्षित डाएट'  हे  ज्ञान घरातून  आई बाबांकडूनच तिने मिळवले होते हे उघड आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा असेच घडले..

त्या दिवशी सकाळी मी आमच्या मावशींना म्हटले की आज मी नाश्ता करणार नाही. तेंव्हा त्यांनी विचारले

"तुमीबी करता काय दीक्षित?"

अशिक्षित मावशींना डाएट शब्द म्हणता  आला  नाही. पण दीक्षित हा शब्द मात्र त्यांनी बरोबर उच्चारला .

मला खूप कमाल वाटली या डॉ. जगन्नाथ  दीक्षितांची .

 आज हे दीक्षित  देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झालेले आहेत.....  घराघरात पोहोचले आहेत... अशिक्षित आणि  लहान मुलांच्याही ते  ओळखीचे  झाले आहेत... ज्याच्या त्याच्या ओठावर त्याचे नाव येते आहे. स्त्री पुरुष, लहान मोठे, अल्प शिक्षित-उच्च शिक्षित आणि सर्व प्रकारच्या कामधंद्यातील लोकांमध्ये तसेच विविध आर्थिक स्तरातील लोकांमध्ये सगळ्यांना ते माहीत झाले आहेत.

हे खरे लोकप्रियतेचे शिखर.....

डॉ. जगन्नाथ दीक्षितांनी  भारतामध्ये एक नवीन थेअरी मांडून डायबेटीस झालेल्यांसाठी  आणि न झालेल्याना  होऊ  नये यासाठी एक आहारशैली सांगितली.

दिवसभरात केवळ दोन वेळाच जेवा......भरपूर जेवा..... पंचावन्न मिनिटे जेवत राहा..... जे हवे ते भरपूर खा... पण ...दिवसातून दोनदाच खा......रोज चाळीस मिनिटें चाला.....

जेंव्हा  ही थेअरी नवीन नवीन होती तेंव्हा  अनेकांपुढे दिवेकरांचे ऐकावे का दीक्षितांचे  ऐकावे असे धर्म संकट उभे राहिले होते....कारण ऋजुता दिवेकरने दर दोन तासांनी खा असा संदेश दिला होता आणि तो लोकांना भलताच सुखावह वाटला होता.(खाण्यासाठीच जन्म आपुला !!!!)......पण यात दीक्षितांनी बाजी  मारली आणि लाखो लोकांनी जगन्नाथ  दीक्षितांना  फॉलो करण्यास सुरुवात केली.

या दीक्षितांची थेअरी खरीच उपयुक्त आहे, लोकांना त्याचे चांगले results  मिळत आहेत….पण या दीक्षिताबरोबरच एका  दुसऱ्या दीक्षितांची मला राहून राहून तीव्रतेने आठवण होते.

ते दीक्षित म्हणजे स्वर्गीय राजीव दीक्षित ....

हे राजीव दीक्षित म्हणजे तेच…. ज्यांनी कोका कोला हे टॉयलेट-क्लिनर आहे हे सर्वप्रथम सांगून त्याविरुद्ध मोहीम उघडली.

हे तेच दीक्षित  ज्यानी  दुधी भोपळ्याचा रस हृदय रोगावर  कसा उपयुक्त ठरतो हे सांगितले.

हे तेच दीक्षित  ज्यांनी अल्युमिनियम  आणि प्लास्टिक स्वयंपाक घरातून हद्दपार करा  असे सांगितले.(हे मी त्वरित अमलात आणले. स्वयंपाक घरातील सर्व अल्युमिनियमची भांडी, तवे, ताटल्या काढून टाकल्या.)

कोण होते हे राजीव दीक्षित?

IIT मधून इंजिनियरची   पदवी घेऊन बाहेर पडलेला हा माणूस..... अत्यंत बुद्धिमान.

 राष्ट्र प्रेमाने अतोनात भारलेला. आपल्या इतिहासाचा ...सांस्कृतिक वारश्याचा त्याने अभ्यास केला.योग, आयुर्वेद, होमिओपॅथीचा अभ्यास केला.

भारताच्या जीवावर गब्बर झालेल्या MNC विरुद्ध त्यांनी स्वदेशीची चळवळ उभी केली

फेअर अँड लव्हली मुळे आजतागायत कोणीही गोरे झालेले नाही हे त्यांनीच ठणकावून सांगितले.

अमोघ वक्तृत्वाचे देणे लाभलेल्या या राजीव भाईंनी सम्पूर्ण भारतभर आपल्या व्याख्यानाद्वारे जनजागृतीची चळवळ आरंभली.

मला  आठवते पुण्यात २००४-६ च्या दरम्यान त्यांची व्याख्याने ऐकायला आमच्या  घरची माणसे- सासू सासरे  गेलेली  होती.

२०११-१२  च्या सुमारास घरोघरी मोबाईलचे आगमन झाले आणि त्यावेळी You Tube वर त्यांची व्याख्याने मी ऐकू लागले तेंव्हा अचानकपणे कळले की  ते या जगात नाहीत.

हे  जेंव्हा  समजले तेंव्हा मनाला आत्यंतिक  वेदना झाल्या.

२०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. कोणत्याही चॅनेलने ही बातमी दाखवली  नसावी. कारण मला  ते समजलेच नव्हते. माझा जीव खूप हळहळला.

एक राष्ट्रप्रेमाने भारलेले तरुण, सळसळते व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले होते..

पण या बाबत कोणालाही खंत नाही …… दुःख नाही….. जाणीव नाही.

ते नाहीत पण त्यांच्या काही निष्ठावान अनुयायांनी त्यांचे बरेच विडिओ You Tubeवर टाकलेले आहेत.

टोकाच्या  राष्ट्र भक्तीने प्रेरित झालेल्या या व्यक्तीचे बोलणे अनेकांना अतिशयोक्तीचे वाटेल..... पण त्या मागची तळमळ....देशप्रेम....भारतीय संस्कृतीचे आत्यंतिक प्रेम या  भावना अतिशय सच्च्या आहेत .

त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर आता अनेक जण स्वतःची चॅनेल्स काढून त्यावर नाव आणि पैसापण कमवत आहेत.

त्यांनी सांगितलेल्या अनेक महत्त्वाच्या आणि जीवनोपयोगी  टिप्स ज्या मी स्वतः: अमलात आणते आणि ज्यामुळे मला पुरेपूर समाधान आणि फायदा होतो आहे त्या पुढीलप्रमाणे.

स्वदेशी कंपन्यांच्याच वस्तू खरेदी करा.

ब्रेड, टोमॅटो सौस, मॅगी,  खाऊ नका. 

कोका कोला, पेप्सी  अशी कोल्ड  ड्रिंक्स पिऊ नका. ते विष आहे.

सकाळी उठल्याबरोबर दात न घासता तीन- चार ग्लास  कोमट पाणी प्या. हा ऍसिडिटीवरचा रामबाण उपाय आहे. (पण  इतके पाणी पिल्यावर सकाळी सकाळी दोन- तीन वेळा टॉयलेटला मात्र जावे लागते)

जेवल्यानंतर कधीही लगेच घटाघटा पाणी पिऊ नका. साधारण एक ते  दीड तासानंतर पाणी  प्या.

थंड पाणी कधीच पिऊ नका.....- कोमट पाणी प्या. फ्रिजमधले किंवा बर्फ घातलेले  पाणी कधीही पिऊ नका . उन्हाळ्यात माठातले पाणी चालेल .

आपल्या मुखातील लाळ हा अत्यंत पाचक पदार्थ आहे तो पोटातच गेला पाहिजे यासाठी पाणी तोंडात चघळत फिरवत प्या.

उभे राहून  जेऊ किंवा  पाणी पिऊ नका (बुफे आपली संस्कृती नाही आणि ते आपल्या प्रकृतीलाहि  चांगले नाही )

कोणतेही गंभीर कारण नसेल तर पॅरासिटेमॉल , क्रोसिन, कॉम्बीफ्लाम अशा गोळ्या अजिबात घेऊ नका.

चाळीशी- पन्नाशीच्या आतील धडधाकट माणसाने दिवसातून तीन वेळा जेवावे. सकाळचा नाश्ता आठ- नऊ च्या सुमारास ….भरपूर... राजासारखा, दुपारचे जेवण एक च्या सुमारास नाश्त्यापेक्षा जरा कमी प्रमाणात आणि रात्रीचे जेवण सातच्या सुमारास…..हलके घ्यावे. सकाळी  नाश्त्यामध्ये  दही  चालेल, दुपारी जेवणानंतर ताक किंवा लिंबू सरबत घ्या पण लगेच पाणी पिऊ नका. मुख्य म्हणजे भूक लागल्यावरच जेवा. संध्याकाळी सातच्या नंतर शक्यतो जेवू नये. रात्री झोपताना हळद दूध घ्या .

जर्सी गाईचे दूध पिऊ नका. देशी गाईचे प्या नाहीतर... म्हशीचे चालेल.

स्वयंपाक  घरात अल्युमिनियम- हिंडालियमची भांडी अजिबात वापरू नका. ती विषारी आहेत. त्या ऐवजी मातीची,लोखंडाची, तांब्याची, पितळेची, चिनी मातीची किंवा शेवटचा पर्याय म्हणजे स्टेनलेस स्टील  वापरा -- निर्लेप सारखी कोटिंगची भांडी वापरू नका.

प्रेशर  कुकरचा वापर टाळा. त्यातून अन्न शिजत नाही तर केवळ फुटते. (आयुर्वेदात  अन्न शिजवताना  झाकू नका असेच सांगितले आहे.) म्हणून स्वयंपाक  हा उघड्या भांड्यात करा, मायक्रोवेव्ह  आणि फ्रिजमध्ये केलेले पदार्थ खाऊ नका.

साखरेच्या ऐवजी गूळ वापरा. 

साध्या  मिठाऐवजी सैन्धव मीठच वापरा. स्थानिक धान्य, भाज्या आणि फळेच खा. परदेशीं खाद्य पदार्थांचा अट्टाहास उगीच धरू नका.

घाण्याचे तेलच वापरा... रिफाईंड तेल नको. 

योगाला आपली जीवनशैली बनवा. नित्य योग करा. शरीर त्यामुळे ठणठणीत राहील........ 

हे सर्व जे ते  सांगत ते त्यांनी बाग् -भट्ट यांच्या आयुर्वेद सूत्रावर  आणि आपल्या भारतीय संस्कृतीवरच संपूर्णपणे आधारलेले होते.

याबरोबरच MNC नि आपल्या देशाची चालवलेली लूट  थांबवण्यासाठी आपण काय करावे या बाबतही त्यांनी झणझणीत अंजन घातले आहे.

इतिहास, आयुर्वेद, अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र, भारतीय संस्कृती….. कोणत्याही विषयावर ते तितक्याच सहजतेने, अभ्यासपूर्ण  आणि प्रभावी बोलत. अशा या सर्वगुणसंपन्न, बुद्धिमान व्यक्तीचे संशयास्पद निधन व्हावे आणि ज्यांच्यासाठी त्यांनी  मोलाचे आपले आयुष्य पणाला  लावले त्या सर्वसामान्य जनतेला त्याची खबर, खंत  काहीच नसावी हे खरंच दुर्दैवी आहे.ते गेल्यावर अनेक अफवा उठलेल्या दिसतात .....जवळच्या माणसावर संशय घेतला गेलेला दिसतो.... हे घडतेच .... मृत्यूचे कारण मात्र न पटणारे होते एवढे खरे.

माझ्या नात्या गोत्याचा, ओळखीचा नव्हता हा माणूस...... तरीही  आमच्यात काही समान धागा होताच.

माझ्या भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा मला अत्यंत अभिमान आहे....जसा त्यांना होता ....

काळाच्या कसोटीवर खणखणीत पणे  उतरलेल्या हजारो वर्ष जुन्या अशा आपल्या आयुर्वेदावर  माझा विश्वास आहे.......जसा त्यांना होता

माझी मातृभूमी मला  प्राणाहून प्रिय आहे ......जशी त्यांना होती.

देशाच्या भल्यासाठी माझा जीवही कळवळतो ......जसा त्यांचा कळवळत होता.

फरक एकच (पण खूप मोठा ) इतकाच कि त्यांनी देशासाठी सर्वस्व झोकून देऊन काम केले...... जे संसारात अडकलेल्या सर्वसामान्य अशा मला शक्य झाले नाही.

आणिक विशेष सांगायचे म्हणजे आमचे जन्म वर्षही एकच...... माझ्या एवढेच वय असलेला हा माणूस दहावर्षापूर्वीच हे जग सोडून गेला. पण मिळालेल्या  अल्प आयुष्याचे त्याने सोने केले.

इथे सहजपणे श्यामच्या आईची गोष्ट आठवते.

विहिरीवर स्नान केल्यांनतर घरात जाताना पायाला वाटेतली माती लागू नये म्हणून श्याम आईला म्हणतो "आई तुझा पदर खाली पसर. मी त्यावर पाय ठेऊन घरात जातो . म्हणजे माझे पाय खराब होणार नाहीत."

त्यावर आई म्हणते, "पायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस ...तसंच मनाला घाण लागू नये याची पण काळजी घेत जा श्याम ".....

आपल्या डाएटची अतोनात काळजी घेतात अलीकडे लोक.....त्याबाबत माणसे खूप जागरूक  झाली आहेत. तितकीच काळजी त्यांनी आपले मन स्वच्छ, प्रसन्न, निरोगी आणि हो दिलखुलास ठेवण्याचीही करावी. ........ शरीराच्या आरोग्याबरोबर  मनाचीही मशागत करावी.......(मनासाठी कोणते डाएट असावे?......संशोधनाचा विषय आहे..... )

आणि हो....एक धागा आपल्या मायभूमीशी - तिच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेला राहू द्यावा.....

प्रत्येकाने हे करावेच ……खूप काही बदलेल.

आणि राजीव भाई सारख्या नेक आत्म्याला नक्कीच शांती मिळेल. प्रसन्नपणे हसतील ते स्वर्गात ...... नक्कीच!!!

 ©नेहा देव