दीक्षित आणि दीक्षित
"तू दीक्षित डाएट करतेस का मामी ?"
सात वर्षाच्या स्वराने बेसावध क्षणी केलेल्या या अनपेक्षित प्रश्नाच्या माऱ्याने मी एकदम सटपटलेच......खुर्चीतून पडता पडता सावरले!
नेहेमीप्रमाणे मी कॉम्पुटरवर दैनंदिन काम करत बसले होते. जेवायची वेळ होती तेंव्हा जेवलीस का असे तिला विचारायचे असावे. अर्थातच जेवणाच्या संदर्भातील 'दीक्षित डाएट' हे ज्ञान घरातून आई बाबांकडूनच तिने मिळवले होते हे उघड आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा असेच घडले..
त्या दिवशी सकाळी मी आमच्या मावशींना म्हटले की आज मी नाश्ता करणार नाही. तेंव्हा त्यांनी विचारले
"तुमीबी करता काय दीक्षित?"
अशिक्षित मावशींना डाएट शब्द म्हणता आला नाही. पण दीक्षित हा शब्द मात्र त्यांनी बरोबर उच्चारला .
मला खूप कमाल वाटली या डॉ. जगन्नाथ दीक्षितांची .
आज हे दीक्षित देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झालेले आहेत..... घराघरात पोहोचले आहेत... अशिक्षित आणि लहान मुलांच्याही ते ओळखीचे झाले आहेत... ज्याच्या त्याच्या ओठावर त्याचे नाव येते आहे. स्त्री पुरुष, लहान मोठे, अल्प शिक्षित-उच्च शिक्षित आणि सर्व प्रकारच्या कामधंद्यातील लोकांमध्ये तसेच विविध आर्थिक स्तरातील लोकांमध्ये सगळ्यांना ते माहीत झाले आहेत.
हे खरे लोकप्रियतेचे शिखर.....
डॉ. जगन्नाथ दीक्षितांनी भारतामध्ये एक नवीन थेअरी मांडून डायबेटीस झालेल्यांसाठी आणि न झालेल्याना होऊ नये यासाठी एक आहारशैली सांगितली.
दिवसभरात केवळ दोन वेळाच जेवा......भरपूर जेवा..... पंचावन्न मिनिटे जेवत राहा..... जे हवे ते भरपूर खा... पण ...दिवसातून दोनदाच खा......रोज चाळीस मिनिटें चाला.....
जेंव्हा ही थेअरी नवीन नवीन होती तेंव्हा अनेकांपुढे दिवेकरांचे ऐकावे का दीक्षितांचे ऐकावे असे धर्म संकट उभे राहिले होते....कारण ऋजुता दिवेकरने दर दोन तासांनी खा असा संदेश दिला होता आणि तो लोकांना भलताच सुखावह वाटला होता.(खाण्यासाठीच जन्म आपुला !!!!)......पण यात दीक्षितांनी बाजी मारली आणि लाखो लोकांनी जगन्नाथ दीक्षितांना फॉलो करण्यास सुरुवात केली.
या दीक्षितांची थेअरी खरीच उपयुक्त आहे, लोकांना त्याचे चांगले results मिळत आहेत….पण या दीक्षिताबरोबरच एका दुसऱ्या दीक्षितांची मला राहून राहून तीव्रतेने आठवण होते.
ते दीक्षित म्हणजे स्वर्गीय राजीव दीक्षित ....
हे राजीव दीक्षित म्हणजे तेच…. ज्यांनी कोका कोला हे टॉयलेट-क्लिनर आहे हे सर्वप्रथम सांगून त्याविरुद्ध मोहीम उघडली.
हे तेच दीक्षित ज्यानी दुधी भोपळ्याचा रस हृदय रोगावर कसा उपयुक्त ठरतो हे सांगितले.
हे तेच दीक्षित ज्यांनी अल्युमिनियम आणि प्लास्टिक स्वयंपाक घरातून हद्दपार करा असे सांगितले.(हे मी त्वरित अमलात आणले. स्वयंपाक घरातील सर्व अल्युमिनियमची भांडी, तवे, ताटल्या काढून टाकल्या.)
कोण होते हे राजीव दीक्षित?
IIT मधून इंजिनियरची पदवी घेऊन बाहेर पडलेला हा माणूस..... अत्यंत बुद्धिमान.
राष्ट्र प्रेमाने अतोनात भारलेला. आपल्या इतिहासाचा ...सांस्कृतिक वारश्याचा त्याने अभ्यास केला.योग, आयुर्वेद, होमिओपॅथीचा अभ्यास केला.
भारताच्या जीवावर गब्बर झालेल्या MNC विरुद्ध त्यांनी स्वदेशीची चळवळ उभी केली
फेअर अँड लव्हली मुळे आजतागायत कोणीही गोरे झालेले नाही हे त्यांनीच ठणकावून सांगितले.
अमोघ वक्तृत्वाचे देणे लाभलेल्या या राजीव भाईंनी सम्पूर्ण भारतभर आपल्या व्याख्यानाद्वारे जनजागृतीची चळवळ आरंभली.
मला आठवते पुण्यात २००४-६ च्या दरम्यान त्यांची व्याख्याने ऐकायला आमच्या घरची माणसे- सासू सासरे गेलेली होती.
२०११-१२ च्या सुमारास घरोघरी मोबाईलचे आगमन झाले आणि त्यावेळी You Tube वर त्यांची व्याख्याने मी ऐकू लागले तेंव्हा अचानकपणे कळले की ते या जगात नाहीत.
हे जेंव्हा समजले तेंव्हा मनाला आत्यंतिक वेदना झाल्या.
२०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. कोणत्याही चॅनेलने ही बातमी दाखवली नसावी. कारण मला ते समजलेच नव्हते. माझा जीव खूप हळहळला.
एक राष्ट्रप्रेमाने भारलेले तरुण, सळसळते व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले होते..
पण या बाबत कोणालाही खंत नाही …… दुःख नाही….. जाणीव नाही.
ते नाहीत पण त्यांच्या काही निष्ठावान अनुयायांनी त्यांचे बरेच विडिओ You Tubeवर टाकलेले आहेत.
टोकाच्या राष्ट्र भक्तीने प्रेरित झालेल्या या व्यक्तीचे बोलणे अनेकांना अतिशयोक्तीचे वाटेल..... पण त्या मागची तळमळ....देशप्रेम....भारतीय संस्कृतीचे आत्यंतिक प्रेम या भावना अतिशय सच्च्या आहेत .
त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर आता अनेक जण स्वतःची चॅनेल्स काढून त्यावर नाव आणि पैसापण कमवत आहेत.
त्यांनी सांगितलेल्या अनेक महत्त्वाच्या आणि जीवनोपयोगी टिप्स ज्या मी स्वतः: अमलात आणते आणि ज्यामुळे मला पुरेपूर समाधान आणि फायदा होतो आहे त्या पुढीलप्रमाणे.
स्वदेशी कंपन्यांच्याच वस्तू खरेदी करा.
ब्रेड, टोमॅटो सौस, मॅगी, खाऊ नका.
कोका कोला, पेप्सी अशी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका. ते विष आहे.
सकाळी उठल्याबरोबर दात न घासता तीन- चार ग्लास कोमट पाणी प्या. हा ऍसिडिटीवरचा रामबाण उपाय आहे. (पण इतके पाणी पिल्यावर सकाळी सकाळी दोन- तीन वेळा टॉयलेटला मात्र जावे लागते)
जेवल्यानंतर कधीही लगेच घटाघटा पाणी पिऊ नका. साधारण एक ते दीड तासानंतर पाणी प्या.
थंड पाणी कधीच पिऊ नका.....- कोमट पाणी प्या. फ्रिजमधले किंवा बर्फ घातलेले पाणी कधीही पिऊ नका . उन्हाळ्यात माठातले पाणी चालेल .
आपल्या मुखातील लाळ हा अत्यंत पाचक पदार्थ आहे तो पोटातच गेला पाहिजे यासाठी पाणी तोंडात चघळत… फिरवत प्या.
उभे राहून जेऊ किंवा पाणी पिऊ नका (बुफे आपली संस्कृती नाही आणि ते आपल्या प्रकृतीलाहि चांगले नाही )
कोणतेही गंभीर कारण नसेल तर पॅरासिटेमॉल , क्रोसिन, कॉम्बीफ्लाम अशा गोळ्या अजिबात घेऊ नका.
चाळीशी- पन्नाशीच्या आतील धडधाकट माणसाने दिवसातून तीन वेळा जेवावे. सकाळचा नाश्ता आठ- नऊ च्या सुमारास ….भरपूर... राजासारखा, दुपारचे जेवण एक च्या सुमारास नाश्त्यापेक्षा जरा कमी प्रमाणात आणि रात्रीचे जेवण सातच्या सुमारास…..हलके घ्यावे. सकाळी नाश्त्यामध्ये दही चालेल, दुपारी जेवणानंतर ताक किंवा लिंबू सरबत घ्या पण लगेच पाणी पिऊ नका. मुख्य म्हणजे भूक लागल्यावरच जेवा. संध्याकाळी सातच्या नंतर शक्यतो जेवू नये. रात्री झोपताना हळद दूध घ्या .
जर्सी गाईचे दूध पिऊ नका. देशी गाईचे प्या… नाहीतर... म्हशीचे चालेल.
स्वयंपाक घरात अल्युमिनियम- हिंडालियमची भांडी अजिबात वापरू नका. ती विषारी आहेत. त्या ऐवजी मातीची,लोखंडाची, तांब्याची, पितळेची, चिनी मातीची किंवा शेवटचा पर्याय म्हणजे स्टेनलेस स्टील वापरा -- निर्लेप सारखी कोटिंगची भांडी वापरू नका.
प्रेशर कुकरचा वापर टाळा. त्यातून अन्न शिजत नाही तर केवळ फुटते. (आयुर्वेदात अन्न शिजवताना झाकू नका असेच सांगितले आहे.) म्हणून स्वयंपाक हा उघड्या भांड्यात करा, मायक्रोवेव्ह आणि फ्रिजमध्ये केलेले पदार्थ खाऊ नका.
साखरेच्या ऐवजी गूळ वापरा.
साध्या मिठाऐवजी सैन्धव मीठच वापरा. स्थानिक धान्य, भाज्या आणि फळेच खा. परदेशीं खाद्य पदार्थांचा अट्टाहास उगीच धरू नका.
घाण्याचे तेलच वापरा... रिफाईंड तेल नको.
योगाला आपली जीवनशैली बनवा. नित्य योग करा. शरीर त्यामुळे ठणठणीत राहील........
हे सर्व जे ते सांगत ते त्यांनी बाग् -भट्ट यांच्या आयुर्वेद सूत्रावर आणि आपल्या भारतीय संस्कृतीवरच संपूर्णपणे आधारलेले होते.
याबरोबरच MNC नि आपल्या देशाची चालवलेली लूट थांबवण्यासाठी आपण काय करावे या बाबतही त्यांनी झणझणीत अंजन घातले आहे.
इतिहास, आयुर्वेद, अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र, भारतीय संस्कृती….. कोणत्याही विषयावर ते तितक्याच सहजतेने, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी बोलत. अशा या सर्वगुणसंपन्न, बुद्धिमान व्यक्तीचे संशयास्पद निधन व्हावे आणि ज्यांच्यासाठी त्यांनी मोलाचे आपले आयुष्य पणाला लावले त्या सर्वसामान्य जनतेला त्याची खबर, खंत काहीच नसावी हे खरंच दुर्दैवी आहे.ते गेल्यावर अनेक अफवा उठलेल्या दिसतात .....जवळच्या माणसावर संशय घेतला गेलेला दिसतो.... हे घडतेच .... मृत्यूचे कारण मात्र न पटणारे होते एवढे खरे.
माझ्या नात्या गोत्याचा, ओळखीचा नव्हता हा माणूस...... तरीही आमच्यात काही समान धागा होताच.
माझ्या भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा मला अत्यंत अभिमान आहे....जसा त्यांना होता ....
काळाच्या कसोटीवर खणखणीत पणे उतरलेल्या हजारो वर्ष जुन्या अशा आपल्या आयुर्वेदावर माझा विश्वास आहे.......जसा त्यांना होता
माझी मातृभूमी मला प्राणाहून प्रिय आहे ......जशी त्यांना होती.
देशाच्या भल्यासाठी माझा जीवही कळवळतो ......जसा त्यांचा कळवळत होता.
फरक एकच (पण खूप मोठा ) इतकाच कि त्यांनी देशासाठी सर्वस्व झोकून देऊन काम केले...... जे संसारात अडकलेल्या सर्वसामान्य अशा मला शक्य झाले नाही.
आणिक विशेष सांगायचे म्हणजे आमचे जन्म वर्षही एकच...... माझ्या एवढेच वय असलेला हा माणूस दहावर्षापूर्वीच हे जग सोडून गेला. पण मिळालेल्या अल्प आयुष्याचे त्याने सोने केले.
इथे सहजपणे श्यामच्या आईची गोष्ट आठवते.
विहिरीवर स्नान केल्यांनतर घरात जाताना पायाला वाटेतली माती लागू नये म्हणून श्याम आईला म्हणतो "आई तुझा पदर खाली पसर. मी त्यावर पाय ठेऊन घरात जातो . म्हणजे माझे पाय खराब होणार नाहीत."
त्यावर आई म्हणते, "पायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस ...तसंच मनाला घाण लागू नये याची पण काळजी घेत जा श्याम ".....
आपल्या डाएटची अतोनात काळजी घेतात अलीकडे लोक.....त्याबाबत माणसे खूप जागरूक झाली आहेत. तितकीच काळजी त्यांनी आपले मन स्वच्छ, प्रसन्न, निरोगी आणि हो दिलखुलास ठेवण्याचीही करावी. ........ शरीराच्या आरोग्याबरोबर मनाचीही मशागत करावी.......(मनासाठी कोणते डाएट असावे?......संशोधनाचा विषय आहे..... )
आणि हो....एक धागा आपल्या मायभूमीशी - तिच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेला राहू द्यावा.....
प्रत्येकाने हे करावेच ……खूप काही बदलेल.
आणि राजीव भाई सारख्या नेक आत्म्याला नक्कीच शांती मिळेल. प्रसन्नपणे हसतील ते स्वर्गात ...... नक्कीच!!!
©नेहा देव