दु:ख दुखवट्याचे
आज ६ मार्च २०२२....... बरोबर
आज एक महिना झाला...... महिन्यापूर्वी म्हणजे
६फेब्रुवारी २०२२ रोजी एक अतीव दु:खद घटना घडून गेली.......
जगभरातील स्वर विश्वात अजरामर झालेल्या एका स्वराने या
दिवशीच आपल्या शरीराचा त्याग केला. ....
जगातले सर्व संवेदनशील लोक हळहळले.
ती
एक नेहेमीची रविवरची निवांत सकाळ होती.....
त्या रविवारची ती सकाळ एक अनमिक हुरहूर लावूनच
उजाडली.......
लताजींचे
निधन झाले............
मृत्यू
हे अटळ, अंतिम सत्य आहे..... कधिना कधी हे घडणारच होते....ते
त्या दिवशी घडले...........नव्वदहून अधिक वर्षांचे समृध्द,कर्तृत्वान,कृतकृत्य आयुष्य त्या दिवशी पंच-तत्वात विसावले.........
डोक्यात
हेच विचार घोळत असताना दुपारी जरा वामकुक्षीसाठी आडवी झाले.
आणि माझ्याही नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले..........
लताजींशी लहानपणापासून एक अनामिक शुद्ध नाते जुळले होते.... ते आज
निखळले..... त्यातून आपसूकच ओघळलेले ते मोती. …. शुद्ध... पवित्र....निखळ..... नितळ .......आणि तितकेच अनमोल.
खर
तर प्रत्यक्ष आमने- सामने कधीच न बघितलेल्या व्यक्ती बरोबर
कसे
काय जुळले सुरांचे हे घट्ट नाते?….माझ्याही
नकळत?.............
मधुबालाच्या
दिसण्यासारखा मधाळ गोड, खट्याळ, अवखळ असा
तो सूर......... ज्ञानेश्वर ,तुकाराम आणि मीराबाईच्या
भक्तिचा भक्तिरंग, उत्कटतेने उलगडणारा तो सूर..............
.....तोच सूर जो सावरकरांच्या अतीव देशभक्तीत रंगणारा....... तोच सूर जो बालकवी,आरती प्रभू, भा.रा. तांबे, शांता
बाईच्या कवितेत अलवार होणारा........
सर्व
हिंदी आणि मराठी सिने तारकांना सुंदर करणारा ...........
क्षितिजा
सारखा ज्याचा अंत सापडणार नाही ....असा तो सूर ....असा तो आवाज......त्यानीच
म्हट्ल्याप्रमाणे....... "मेरी आवाज ही पेहचान है........." त्यांचा
आवाज हीच त्यांची ओळख.......
जगातील
सुरांबद्दलची यच्चयावत सर्व विशेषणे जोडून सुद्धा जो आवाज त्याच्या दोन अंगुळे अंमळ वरच राहतो, त्या
लता मंगेशकर या स्वर्गीय आवाजाने आपल्या खऱ्या स्थानी जाण्यासाठी आपले मूर्त शरीर या दिवशी त्यागले. मूर्त शरीरात सिमटलेला
तो एक अमूर्त-दैवी आवाज अखेर मानवी जगापासून मोकळा झाला.
अलौकिक
दैवी सुरांची देणगी परमेश्वराने त्यांना बहाल
केली. त्या देणगीचे त्यानी अक्षरश: सोने केले...... ते सुरांचे बावनकशी सोने आम्हासारख्या पामरावर अक्षरश: उधळून आम्हाला श्रीमंत
केले.
ज्यांनी गायलेल्या गीताच्या ,कवितेच्या अभंगाच्या चरणाशी आमचा आवाज स्पर्शही करू
शकत नाही (असे पु.ल. नी म्हटले होते म्हणे) त्या लताजींचा एकदा चरण स्पर्श व्हावा
अशी एक तीव्र इच्छा होती. अलौकिकाला स्पर्श करण्याची माझी ती इच्छा अपूर्णच
राहिली......
खरतर ज्यांच्या
आवाजाच्या नखाचीही सर माझ्या आवाजात नाही, त्या मला एकदा दुर्बुद्धी सुचली ...त्यांचे "वंदे मातरम" हे गीत....जे ऐकायला अतिशय सुमुधुर परंतु तितकेच अवघड ....
२६ जानेवारीला सर्वांसमोर म्हणण्याचे मी धाडस केले... धाडस नव्हे
महापातक.......आणि जे व्हायचे तेच झाले.... फ...जि....ती……महाफजिती......
लताजींची
असंख्य गाणी अगदी साधी –सोपी- सरळ वाटतात. पण आपण गायला
लागल्यावर ती किती अवघड आहेत याचा साक्षात्कार होतो. त्यांचा तो आवाज म्हणजे चंचल
पारा....आपल्या गळ्यात बसवू म्हणता बसतच नाही..........गळ्यातून निसटूनचं
जातो....त्यांचा तो आवाज ........ ती गाणी...... डोळे मिटून
ऐकण्यातच आपण धन्य व्हावे!!!!
आपण
असा स्वर्गीय आवाज ऐकण्याचा लाभ घेऊ शकतो हीच परमेश्वराने आपल्यावर केलेली कृपा
समजून त्याचे कायम ऋणी रहावे.........
रविवारच्या त्या दिवशी संध्याकाळी आझाद मैदानात या स्वर-लतेला अखेरचा निरोप देण्यासाठी अखंड उद्योगात
बुडालेले पंतप्रधानसुद्धा अंत्य -दर्शनासाठी मुंबईत
अवतरले.
अन्त्यविधीचा
प्रसंग काही वेळ दूरदर्शनवर बघून आम्ही काही कामासाठी
बाहेर पडलो.
एका
ठिकाणी एका सुखवस्तू कुटुंबातील आई- वडील आणि साधारण एक नऊ-दहा
वर्षाचा मुलगा बसलेले होते. त्या दिशेने माझ्या कानावर शब्द पडले.......
“I am very happy,
tomorrow we got holiday.”
ते
दहा वर्षाचे अर्ध- इंग्लिश पोरगे बोलत होते..... मी चमकले.... त्याहूनही अधिक खंतावले..... कारण त्यावर त्या पोराच्या आई -बापाची
काहीही प्रतिक्रिया नव्हती!!!!!!!!!
लता
मंगेशकरांच्या निधना बद्दल सरकारने सोमवारी सुट्टी जाहीर केली
होती ....त्यावर दहा वर्षाच्या मुलाची ही प्रतिक्रिया होती. …… मी बैचेन झाले............
असे
काही आजू बाजूला घडले की अनेक प्रश्न नेहेमीच माझ्या मनात उभे राहतात........ तसेच
आत्ताही घडले.
मनात
प्रश्न उमटले. ....
का
दिली जाते अशा दु:खद प्रसंगी सुट्टी?
काय
साध्य होते त्यामुळे?
सुट्टी
म्हटल्यावर कितीही कार्यतत्पर माणूस असो.. तो आनंदितच होतो ....
मग
दु:खद प्रसंगी अशी सुट्टी का जाहीर केली जाते?
आठवडाभर
काम केल्यावर प्रत्येकालाच हवी असते एक सुट्टी...... यात गैर काहीच नाही.
पण
अशी अचानक सुट्टी सगळ्यांनाच का हवी असते?.....मजा करायला?
आमच्या
लहानपणापासून शाळेची सुट्टी आम्हाला नेहेमीच हविहविशी
वाटायची, तशीच आत्ताच्या मुलानाही वाटते.
पण दु:खद प्रसंगी सुट्टी
जाहीर करून आपण काय साध्य करतो?
घरी आपण त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहतो का ?
त्यांचे
गुण आठवतो का ? त्यांच्या पासून काही शिकवण घेऊन आपल्या मुलांपर्यंत
पोहोचवतो का?
त्या
माणसाची महानता समजावून सांगण्याचे कष्ट घेतो का ?
काय
करतो आपण त्या सुट्टीचे? मुले सुट्टी मिळाली म्हणून आनंद साजरा करतात,
आपण
काय करतो ?
या
प्रश्नामध्येच मिसळलेला दुसरा प्रश्न (....उपप्रश्न!!!!).........शाळेला
सुट्टी मिळाल्यावर मुलांना होणारा आनंद कधी तरी दु:खात बदलेल का?
कशाला आज दिली शाळेला सुट्टी? मला सुट्टी नको.......मला रोज जायचे आहे शाळेत ....मला शाळा इतकी आवडते की
सुट्टी नकोच वाटते....असे मुलांना कधी तरी वाटेल का? .....शाळा इतक्या आनंददायी होतील का ? की त्यांना दुखवट्याचे दु:ख
दर्शवण्यासाठी सुटी देण्याची गरजच भासणार नाही..........
अशी आनंददायी शाळा असावी असे माझे स्वप्न आहे ... दु:ख समतोलपणे सहन करणारी आणि कायम आनंद आणि आनंदच वाटणारी...आनंददायी...आनंदघनासारखी .......आनंदाच्या वर्षावात भिजवून चिंब
करणारी....अशी एक शाळा हवीच ........
© नेहा देव