शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

मनाच्याही मनातले ...10)गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या

 मनाच्याही मनातले......................................

10)गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या............

गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या .....

का ग गंगा यमुनाही या  मिळाल्या...

उभय पितरांच्या चित्त चोरटीला .............

कोण माझ्या बोलले गोरटीला.........

 

 

शाळेत असताना अभ्यासलेली ही कविता!.....याच कवितेमध्ये पुढे  छबेलीला असाही शब्द होता असे आठवते. 

यातला छबेली हा शब्द फारच गमतीचा वाटला होता तेंव्हा.

आता हे गायी पाण्यावर येणे हे काय प्रकरण आहे हे आत्ताच्या पिढीतल्या कोणत्याही मुलाला सांगता  येणार नाही हे मी पैजेवर सांगू शकते.

गायी पाण्यावर येणे म्हणजे डोळे भरून येणे.....लहान मुलांना झोपवताना आपण "हम्मा गायी….' अंगाई म्हणतो... त्याचा संबन्ध डोळ्यांशी.. म्हणून कवीने ही शब्द रचना केलेली असावी .....हा माझा तर्क........ त्या डोळ्यात पाणी का भरले??? 

गंगायमुनाही मिळणे म्हणजे अश्रू दोन्ही डोळ्यांमधून गालावर ओघळणे.........

एका दरिद्री पित्याची गोड, गोंडस, गोबरी लेक ...तिचा तिच्या गरिबीवरून कोणीतरी  अपमान करते…….मानी मुलीला ते फारच झोंबते आणि डोळे काठोकाठ  भरून येतात… अश्रू बांध फोडून वाहू लागतात…….

पैशाने गरीब पण शब्दाने श्रीमंत पिता तिची समजूत काढतो, तिला हसवण्याचा प्रयत्न करतो .....ती ही कविता.

हं……..लहानपणी डोळे भरून यायलाही अर्थ असतो....... त्याची कदर करणारेही कोणी असते..... ही केवढी मोठी दौलत असते.....

आता मला त्या मुलीचा फारच हेवा वाटत राहातो......

अलीकडे माझेही डोळे असेच  वरचेवर भरून येतात….. पण आता असे  मायेने विचारपूस करणारे, समजूत काढणारे कोणीच उरले नाही.....बाबाही  नाहीत  आणि आईही नाही....

आता या डोळ्यात अश्रू भरून यायला काही  अर्थच उरला नाही......

कोणी म्हणेल हा वयाचा परिणाम… या वयात बायकांना असे काहीतरी होत राहाते......hormonal changes ...

असेल…. कदाचित तसेही असेल.... पण मला जसे होते तंतोतंत तसेच संदीप खरेलाही का बरे झाले असेल?.....तो तर माझ्या पेक्षाही लहान आणि एक पुरुष ....त्याला का बरे असे होतें?.

आताशा मला हे असे काय होतें....

कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते...

आताशा मला हे असे काय होतें...........

या कवींचे एक बरे असते आपल्याला  काय होतें हे ते अगदी अचूक मार्मिक पणे शब्दात मांडतात. मग आपण आपल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात शोधतो.

थोडक्यात संदीप खरेला जे जाणवते तसेच मलाही आता आत... मनात... काही आर्त जाणवत राहाते…….....आणि गायी पाण्यावर येतात...... कधी कधी गंगा यमुनाही त्यात मिळून जातात. पण समजूत काढणारे कोणीच नसते.....

 या ओघळणाऱ्या अश्रूत ……..

एक मोठा अश्रू….. आई बाबांची कोणतीही सेवा न  करू शकल्याचा... ...

आईच्या भेगाळलेल्या  पायांना कधी तेल लावले नाही…. तिचे दुखणारे पाय कधी चेपले नाहीत.......तिला कोणा कडून सेवा करून घेणे माहीतच नव्हते.... आवडतही नव्हते....

एक  टपोरा  अश्रू…..मुलीना   मनापासून वाढवू न शकल्याचा....त्यांच्या वाढीच्या  वयात शिक्षण आणि नोकरी यांच्या मागे दमछाक होईपर्यंत पळत राहिल्याचा.... 

एक अश्रू पन्नाशी उलटूनही हातून म्हणावे तसे काही substantial , ठोस असे काही काम न घडल्याचा .....

एक अश्रू .......कामाच्या ठिकाणी विनाकारण होणाऱ्या अवहेलनेचा....

एक अश्रू ……. भावंडांच्या हुशारीचे चीज न झाल्याचा.........प्रामाणिक पणा, बुद्धिमत्ता असूनही त्यांना नशिबाने साथ न दिल्याचा......

एक अश्रू लाडक्या चिनूसाठीचा ......त्याच्या म्हातारपणात, आजारपणात फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा ...

एक  अश्रू ..काही जवळचे गैरसमज करून दूर निघून गेल्याचा...

एक अश्रू ……आजू बाजूला वावरणाऱ्या अनेकांच्या मनातल्या जाती भेदाच्या  विषासाठीचा ...

एक अश्रू….. नतद्रष्ट समाजकंटकांच्या कृत्यांना आपण कोणताच विरोध करू शकत नसल्याच्या असहायतेचा…

अनेक अश्रू …..दुःखी पीडितांसाठी खूप  काही करावेसे वाटते पण हातून काहीच घडत नाही... यासाठीचे

आणि असेच....... बरेच  काही....... थेम्ब थेम्ब .....काही पश्चात्तापाचे....काही असहायतेचे............ काही रागाचे............. काही विषादाचे......... काही खेदाचे........... अश्रूंचीही विविध नावं...... पण रूप मात्र  एकच.............. सगळेच अश्रू एकमेकात मिसळलेले......... अश्रू.......मनातील निखळ भावनांची प्रतीकं........ की  फलितं? 

अश्रू येतात आणि वाहून जातात….. अनेकदा…. वरचेवर….. 

त्या अश्रुनी मग चष्म्यापुढे धुके धुके जमा होऊ लागते...मग पुढचे काहीच दिसेनासे होतें………

......आणि मागेही  कोणीच नसते.........

 

पण आशा वाटते …..आता उलटे काही घडेल ….....

लेकीची समजूत काढणारा पिता त्या कवितेमध्ये होता तर माझे अश्रू लडिवाळपणे पुसणारा एक बाळकृष्ण (का कृष्णा?) मागून गळ्याला मिठी घालेल........ आपल्या गोड बोलांनी  मला हसवेल...

नक्कीच….... कोणी येईल ... मी वाट बघतेय......

माणूस आशेवरच तर जगतो .......आणि मी ही..... ...

 ©नेहा देव 

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

मनाच्याही मनातले ...9) दृष्टी तुझे कोन हजार........

मनाच्याही मनातले -9) दृष्टी तुझे कोन हजार.........
लॉकडाउनच्या काळातील संकष्टी चतुर्थी. गणपतीच्या अभिषेकासाठी सामानाची जुळवाजुळव करत होते. दुर्वा मिळेनात. फुलांची दुकाने बंद!!  घरच्या बागेत दुर्वा का कोण जाणे वाढत नव्हत्या.घराच्या कुंपणाला लागून पलीकडील  शेजाऱ्यांकडे  जाऊन विचारून पाहू म्हटले. या शेजारीणबाई येता-जाता दिसल्यातर कामापुरते  बोलणाऱ्या. पण आमचे फारसे सख्य नाही ....पण भांडण सुद्धा नाही. तरीही एकमेकांच्या घरी जाणे येणे तसे सहसा नाहीच. निरुपाय म्हणून त्यांना विचारले.... दुर्वा आहेत का? त्यांनी या आणि घ्या म्हटल्यावर मी लगेचच त्यांच्याकडे गेले. दुर्वा तोडता तोडता सहजच वर मान वळवली. आमच्या  घराकडे बघितले.........अरेच्या किती  वेगळे दिसत होते आमचे घर!!!....... ज्या घरात मी आयुष्यातील ३१ वर्ष घालवली  ( हो प्रदीर्घ ३१ वर्ष ......) , ज्यातील प्रत्येक कानाकोपरा माझ्या ओळखीचा आहे , तेच आमचे  घर मला त्यांच्याकडून बघताना किती वेगळे दिसत होते !!!
खरच हे आमचेच घर ना?
मग मला ते वेगळेच  का दिसते आहे?..........
हं.........माझ्या लक्षात आले. 
मी या कोनातून कधीच बघितले नव्हते !!!......कोन बदलला होता 
अँगल ...कोन......दृष्टी ....नजरिया ......
माझा पाहण्याचा कोन बदलला आणि काही वेगळेच लक्षात आले.
हा तर केवळ बाह्यांगी कोन झाला. 
आपल्या अंतरंगातही असतात .....असेच कोन .....हजार .... 
कोणीतरी म्हटले आहे.........
आम्हास आम्ही पुन्हा पाहावे ....काढून चष्मा डोळ्यावरचा.....
अहं ........ नुसता चष्मा काढून नाही. .....
कोन सुद्धा बदलून बघावेच ......
वेगळेच काही लक्षात येते.
एकतीस वर्ष ... किती प्रदीर्घ काळ......
आठवले ते सुरुवातीचे दिवस.....
२२ वर्षांची होते मी तेंव्हा ......जेंव्हा लग्न होऊन या घरात आले....जीवनाबद्दल, जोडीदाराबद्दल कधी काही विचारच केला नव्हता....अज्ञानी , अर्धवट, ना कळते वय.....हे घर "आपले" हे पचवून घ्यायला खूप काळ लोटावा लागला. 
अगदी काल परवा पर्यंत स्वप्न पडले की  घर म्हणून  लोकमान्यनगरमधील अडीच खोल्यांचेच  घर उभे राहायचे ......स्वप्नात सुद्धा...... ...
subconscious mind मध्ये घराची कल्पना फिक्स होती ......... लोकमान्यनगरमधले अडीच खोल्यांचे घर हे माझे घर ........
हे आताचे घर तर त्यांचे होते.......सासू - सासऱ्यांचे....त्यांनी काटकसर करून खूप मेहेनतीने बांधलेले....माझे  कुठे.होते ते?.....
अनेक जण म्हणायचे... अजूनही म्हणतात ...काही न करता आयते घर मिळाले हिला .....आमच्यासारखे झगडावे नाही लागले!!!.....म्हणोत  बापडे !!!!..
ज्याचा त्याच्या दृष्टीचा कोन......... हे घर आपले म्हणून घेताना तेवीस वर्षे जो मानसिक झगडा पेलला  तो कोणाला कसा कळणार? लग्न होऊन सासरी आलेल्या प्रत्येक स्त्रीला हा झगडा सोसावाच  लागतो.
ज्याचा त्याचा दृष्टीचा कोन........
असेच आठवले...
वैदेही लहान होती ...कौतुकाची लाडाकोडाची  पहिली मुलगी.... नीटस देखणी ...
तिचा प्रत्येक वाढदिवस आजूबाजूच्या मुलांना बोलवून मी थाटात  करायचे. 
आपल्या वाढदिवसाची खूप अपूर्वाई असते मुलांना . 
चार मुलांमध्ये कौतुक झालेले त्यांना खूप आवडते. 
तो दिवस त्यांचा आणि फक्त त्यांचा असतो.  आपल्या  मित्र मंडळींनी दिलेल्या  पाच- दहा रुपयाच्या  छोट्या छोट्या प्रेझेन्टचे पण त्यांना खूप  अप्रूप असते.... 
तिच्या वाढदिवसाच्या  दिवशी सहजच मनात लहानपणी शिकलेल्या गीताच्या ओळी उमटायच्या....  
"दीपका  मांडिले तुला सोनियाचे ताट, घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ, दारी आलेल्याची करू सोपी पायवाट." 
असाच एक वाढदिवस -.....श्रीखंड पुरी,छोले,कैरीची डाळ आणि केक.....आणि पन्हे केले होते कि रसना आता आठवत नाही.पण  मस्त  बेत केला होता.  घर सजवले,वैदेहीला नवा फ्रॉक, मॅचिंग दागिने घालून तयार केले., मोगऱ्याचे गजरे तर मी आणायचेच ..........
तेंव्हा भरमसाट खर्च  करायला पगार कुठे भरपूर  होता?
पण या दिवसासाठी मात्र मी तडजोड करायचे नाही.... जे असेल त्यातून जास्तीत जास्त नेटके ,साजरे करायचा प्रयत्न असायचा माझा..... सासू -सासरे तर त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी असायचे आणि एरवी त्यांच्याकडे असणारी वैदेही, मे महिन्यात  मात्र माझ्या जवळच असायची....आई पण न चुकता यायचीच वैदेहीच्या वाढदिवसाला. 
वाढदिवस झाला. मुले खुश होऊन पोटभर खाऊन गेली. वैदेही मजेत होती....दिवसाचे सार्थक झाले असे वाटले. 
शेजारीच एक भाडेकरू त्यांच्या दोन मोठ्या मुलांसह राहत होत्या. त्यांच्याकडेही खाऊ दिला.. .
दुसऱ्या दिवशी सकाळी या शेजारीण बाई मोलकरणीशी बोलताना मी ऐकले...........
"काल मुलीचा वाढदिवस केला.... हं ..आहेत  पैसेम्हणून उडवतात.........."
मी अवाक!!!!!....पैसे उडवतात?
अरेच्या !!!  हा अँगल माझ्या लक्षातच आला नव्हता. ........हं .........हा त्यांचा दृष्टिकोन ....
खरे तर मुलांचा वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक अभिनव पद्धती असतातच.... पण त्या वयात पहिल्यांदाच  आई झालेल्या मला तो मार्गच योग्य वाटला होता. पण इतरांच्या दृष्टिकोनातून तो तितकासा काही  बरा नव्हताच.......
आपल्या गाढवाला बाजारात घेऊन जाणारा एक म्हातारा आणि त्याचा नातू यांची कशी फरफट झाली होती..... इतरांच्या दृष्टीचा विचार करता करता.... हे आठवले............
मग आपण का करायचा इतका विचार ? 
पण तरीही ......
नंतरच्या तिच्या वाढदिवसाच्या वेळी माझ्या  मानसिकतेवर परिणाम झाला हे मात्र नक्की.
ज्याचा त्याचा दृष्टिकोन..........या दृष्टीचा  कोन ओठात शब्द होऊन येतो . शब्दाचे बाण  होतात आणि एकदा फेकलेले बाण कधीच परत घेता येत नाहीत...ते  बाण जिव्हारी कायमची  जखम मात्र करून ठेवतात..
अशा असंख्य जखमा हृदयात लपवता लपवता कधीतरी उघड्या होतातच माझ्याकडून ......
तर... हा दृष्टीचा कोन... कोन जेवढा लहान करू तेवढा लहान होतो..... जेवढा मोठा करू तेवढा मोठा होतो.
जर सगळ्याच गोष्टीकडे लघुकोनातूनच पाहायचे म्हटले तर सगळे खुजे खुजेच दिसते. ......म्हणतात ना.. ज्याचे त्याचे विश्व् किती मोठे? ज्याच्या त्याच्या मेंदूइतकेच.
अर्धा  भरलेला पेला........   कोणाला तो "अर्धा भरलेला" दिसतो, कोणाला तो "अर्धा रिकामाच" दिसतो.....पण सरळ वरतून जर बघितले तर?......... कदाचित पूर्ण भरलेला दिसेल............
"'कोन"'  बरं... हा "कोन" ...हा कोनचं आपल्याला भ्रमित करतो.......... .....
माझ्या आईचा या बद्दल एक आवडता शब्द होता. "दोष-ऐक" दृष्टी ...आपण प्रत्येक गोष्टीकडे  "दोष-ऐक" दृष्टीने  बघितले तर दोषच दोष नजरेला पडतात. म्हणून नितळ ,निखळ, शुद्ध नजरेनेच पाहावे जगाकडे.
हा  कोन  प्रकाशाच्या सगळयाच खेळांना कारणीभूत असतो. त्यांना आपण परावर्तन , अपवर्तन ,अपसरण आणि कितीतरी वेगवेगळी शास्त्रीय नावे  देऊन अभ्यासण्याचा प्रयत्न  करतो. पण ते खेळ प्रत्यक्ष अनुभवण्यात  खरंच गम्मत असते. 
साऱ्या  सृष्टीमधील  असंख्य रंगांच्या मागे या प्रकशाच्याच कोनांचा- शोषण आणि  परावर्तनाचा खेळ असतो. आरशात दिसणारे आपले प्रतिबिंब,वक्र पृष्ठावरून दिसणारे विनोदी रूप, भिंगातून दिसणारे... वेगळेच बारकावे ...वेगळेच जग..... ,अवकाशातून निळसर दिसणारी पृथ्वी .......पांढऱ्या रंगातून उलगडणारे सप्तरंगाचे इंद्रधनु  हा प्रकाशाच्या विविध माध्यमातून प्रवासाचाच  एक खेळ ......मृगजळ हा सुद्धा असाच  खेळ....  आणि कितीतरी ........
अगदी तसेच  आपल्या अंतरंगातील दृष्टीचे हजारो  कोन  आपल्या  मनामध्ये खूप  काही खळबळ माजवतात ....असंख्य  भावनांचे रंग आणि तरंग उमटवतात....समज- गैरसमजांची आवर्तने घडवतात .......आणि भावनांच्या अनेक पदरांचा होऊन बसतो एक निरर्थक गुंता !!!!
 अंत:करणात पडलेल्या गाठी- निरगाठी यांचा हा गुंता सोडवायचा  असेल तर एकच उपाय आहे ...........दृष्टीचा कोन शून्य करा....... कोणतेही  भिंग किंवा चष्मा वापरू नका ......
आणि 
मग सहजपणे  ओठात येईल ............
"रुठे ख्वाबोन्को मनावेंगे......कटी पतंगको थामेगे.....हा हा है  जज्बा.. .हो.हो.. है  ...जज्बा 
सुलझा लेंगे उलझे रिश्तोन्का मांझा .... हो  मांझा ...  .....हो मांझा ...  हा हा हो.. मांझा !!!!. " 
©नेहा देव 



रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

मनाच्याही मनातले ...8) ते सात दिवस ....

मनाच्याही मनातले  -
ते सात दिवस ........

खरंतर लेखाचे शीर्षक "वो सात दिन" हे ठेवावे असे वाटत होते. पण "त्या" सिनेमासारखे खूप काही सनसनाटी, अतर्क्य, उलटे -- पुलटे असे काही घडले नव्हते. सरळ साधे वास्तव पुढे मांडायचे होते .म्हणून आपले  मराठमोळे शीर्षकच दिले..

दिवस होता गुरुवार १६  जुलै २०२०.  सकाळी सकाळीच माझे पती. श्री नितीन याना ताप भरला..(कदाचित रात्रीपासूनच चढला असावा.)  ताप १०० च्या आसपास होता. नेहेमीप्रमाणे फ्लू असेल  म्हणून फारसे लक्ष दिले नाही. गुरुवार  दि.१६जुलै  गेला ,शुक्रवार  दि.  १७ जुलै गेला, शनिवार दि. १८ जुलै सुद्धा गेला .......पण ताप उतरण्याचे चिन्ह दिसेना  .....ताप मी सातत्याने मोजत होते. पारा १०० ते १०१ च्या rangeमध्येच  खालीवर खेळत होता. या तिन्ही दिवस त्यांनी तापाची गोळी घेतली नाही.केवळ गरम पाणी पिऊन  अंगावरच ताप कमी करण्याचा प्रयत्न करत होते.पण तीन दिवस उलटले तरी  ताप कमी होण्याचे नाव घेई ना. मग मात्र मनात शंकेची पाल  चुकचुकली.
शनिवारी रात्री ठरवले कि उद्या कोविड ची टेस्ट करून घ्यावी. .... रविवार १९जुलैला उठल्यावर सर्वप्रथम दोन तीन ठिकाणी जाऊन कोविड टेस्ट ची चौकशी करून आले. पण खाजगी रुग्णालयात रविवार म्हणून टेस्ट होऊ शकत नव्हती.मनपाच्या  टेस्ट केंद्रात खूप गर्दी असल्याने तेथे  जाणे सुरक्षित वाटले नाही..  न जाणो तेथील कोणाचा संसर्ग व्हायचा आणि नको ती ब्याद लागायची..... म्हणून सोमवारी २० जुलैला करूयात असे ठरवले. रविवारी ताप होताच...... पण पॅरासिटेमॉल सुरु केली  . गोळी घेतली कि दोन तासात दरदरून घाम येऊन अंग चिंब भिजायचे पण नंतर परत ताप भरायचाच. आता ताप १०२ पर्यंत जात होता. ......काळजी वाढू लागली. रविवारची रात्र भीतीच्या छायेखालीच घालवली...... त्यांना तर अजिबात झोप लागली नाही. आता कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे सुरु केले. मानसिक तणाव वाढतच होता. सोमवारी सकाळी मुलीने भारती  विद्यापीठाची सगळी माहिती काढली. पुढे जाऊन कार्ड काढले. अंगात १०२  ताप असलेल्या माणसाला न्यायचे कसे ? याना न्यायचे कसे?  प्रश्न पडला. ड्रायव्हरला बोलावले. पण लॉक डाऊन मुळे येता येत नाही असे सांगून त्याने टाळले. ....वाईट वाटले........पण मग वाटले त्याचेही बरोबर आहे. त्याने का आपला जीव धोक्यात घालायचा?..... जो तो  आपला  जीव सांभाळणारच..... ज्याला त्याला आपला जीव  प्यारा........अंजू ( बहीण ) म्हणत होती...मुलाला पाठवू का?.... मी नको म्हणाले.पिंपरीवरून धनकवडीत तेवढ्यासाठी त्याने येणे बरोबर वाटले नाही. आपल्यामुळे कोणाला त्रास  व्हायला नको.आपल्यामुळे  कोणाला लागण व्हायला नको....... ओंकार (भाच्याला )मुद्दामहून विचारलेच नाही. त्याच्या घरात लहान मुलगी ...तिला लागण व्हायला नको. त्यांना आमच्यापासून लांबच राहा असे सुचवले.........मीच टूव्हिलर  काढून त्यांना डबलसीट घेऊन गेले. नंबर लावून टेस्ट केली.  टेस्ट करताना मनात आत कुठेतरी वाटत होते कि.... इतर काहीही  लक्षणे नाहीत.सर्दी नाही..... खोकला नाही....श्वासाला त्रास नाही.... वास आणि चव यांच्या संवेदना शाबूत आहेत.......... फक्त ताप आहे. म्हणजे हा करोना नसणारच आहे. बहुतेक डेंग्यू,मलेरिया, नाहीतर इतर viral इन्फेकशनचा हा ताप असणार आहे. नाही म्हणायला डोके जड होणे आणि अंगदुखी ही लक्षणे मात्र होती. घरी आलो. आता रिपोर्टची प्रतीक्षा....... .....सोमवारी २० जुलै  संध्याकाळ पासून ताप जरा कमी होतो आहे असे माझ्या लक्षात आले. मंगळवारी दि. २१ जुलै  सकाळपासून तापाचा जोर कमी होऊ लागला. मुलीने परत एक- दोन  हेलपाटे   घालून रिपोर्ट आणला....... आणि ......आणि ... जे नसेल असे वाटत होते तसेच घडले....... कोविड  टेस्ट पॉझिटीव्ह आली  आणि .......माझ्या पायाखालची जमीनच सरकली....... 

मन शंका कुशंकांनी व्यापून गेले. फक्त ताप आहे. तोही आता कमी   झाला आहे. सर्दी नाही .....खोकला नाही.... पण पुढे श्वासाचा त्रास होईल का ?पुढे काही serious होईल का?.. ..भीती  आणि दडपण.... दुसऱ्यादिवशी लगेचच  आम्हा दोघीची  आणि वर राहणाऱ्या तिघांचीही टेस्ट करायचे ठरले. दुसऱ्या दिवशीची सगळी पळापळ 
मैत्रेयीनेच  केली. मुलगा नसल्याची मी कधी खंत बाळगली नव्हती .आता तर मैत्रेयीने ती  पारच पुसून टाकली.
 आमच्या पाचही जणांची  टेस्ट आणि श्री. नितीन यांचे कॉऊन्सेलिंग झाले  आणि त्यांना काही व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि खोकल्याचे एक औषध एवढेच लिहून दिले......बस्स एवढेच....... बाकी काहीही नाही ........... होमआयसोलेशन  सांगितले. घरी राहूनच फोनवर कंसल्टेशन  आणि कॉऊन्सेलिंग........
घरी  आलो.......... 
सर्व आवरून ..जेवण करून जराशी विश्रांती घ्यायला आडवी झाले. डोक्यात विचारांचे काहूर. यातून पुढे काय?...... .......
............. आणि .......पुढे काहीही झाले नाही...... यांचा ताप  विना औषधाचा आपोआप कमी होऊ
 लागला ....ते हळू हळू फ्रेश होऊ लागले. 
दुसऱ्या दिवशी आमच्या दोघींचा  रिपोर्ट आला. ती पॉझिटीव्ह आणि मी निगेटिव्ह.  वर राहणारे भाच्याचे कुटुंब तिघेही निगेटिव्ह ( हे खूप चांगले झाले.देवाची कृपा  कोरोनाने आपले हातपाय फार लांब पसरवले नव्हते.) ..... पण आमच्या दोघींच्या  बाबतीत रिपोर्ट अनपेक्षित होता. मी त्यांच्या सान्निध्यात सतंत उशा -पायथ्याला वावरत होते. मी निगेटिव्ह  आणि मुलगी लांब असून पॉझिटिव्ह........ कसे काय? 
असे कसे झाले? कशामुळे झाले? कोणामुळे झाले? यावर चर्चा करून,वितंडवाद घालून  काहीही फायदा नव्हता......शंका न घेता मी कंबर बांधून कामाला उभी राहिले. नशीब बलवत्तर म्हणायचे. मी ठणठणीत आहे असे तो कागद सांगत होता. आणि कोणतेही लक्षण नसलेल्या मुलीला  लागण झाली आहे असेही  तो कागद सांगत होता........ या कोविडचा आता सर्व शक्ती एकवटून सामना करायचा असे ठरविले.तरीही त्या दिवशी मनाची खूप ओढाताण झाली. उलघाल झाली. अज्ञाताची, अकल्पाची भीती मनात दाटून आली......
 सर्व कामवाल्या बायकांना मंगळवार पासूनच येऊ नका म्हणून सांगितले होते. आणि माझी अक्षरश: तारेवरची कसरत सुरु झाली. ही माझी  लढाई मलाच लढावी लागणार होती.   पाच खोल्या, पुढचा मागचा पॆसेज ,बंगल्याच्या चारही बाजूने मोकळी जागा... याची स्वच्छता, झाडणे ,पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे, फर्निचर पुसणे. स्वयंपाक, चहा, नाश्ता, कुत्र्याकडे बघणे .  ही नेहेमीची कामे. त्याच्या जोडीला तिघांनाही वाफ देणे, काढा देणे , व्हिटॅमिनच्या  गोळ्या देणे , गरम लिंबू सरबत देणे. शक्य झाल्यास दूध- हळद देणे, मध मिरपूड चाटवणे ...चौदा तासांच्या मिनिटांपेक्षा कामांची संख्या जास्त होती. पण नुसताच कामाचा ताण नव्हता....... पुढे काही गंभीर तर होणार नाही ना ... ही  सतत भीतीची छाया. नुसते तेवढेच नाही तर सतत हातात सॅनिटायझरचा फवारा घेऊन जंतू मारण्याचा आटा पिटा....... रात्री  टॉयलेटला जाताना सुद्धा हातात सॅनिटायझर घेऊन अदृश्य राक्षसाला मारत मारतच जायचे . 
.........यात ज्यांना मुद्दामहून न सांगता सहजपणे कळले होते त्यांचे काळजीचे ,सूचना करणारे, धीर देणारे फोन attend करणे हे पण चालू होतेच..अमेरिकेतल्या मोठ्या मुलीला मुद्दामच लवकर सांगितले नाही.उगाच लांब राहून काळजी करत बसणार....नणंद ,बहीण, वहिनी यांनी आणि  त्यांच्या पूर्ण परिवाराने  धीर दिलाच पण काही लागले तर सांग असे वारंवार सांगून आश्वस्त पण केले.  कॉलेजच्या प्रिन्सिपॉल  मॅडम,कात्रज मध्ये राहणाऱ्या आहेर मॅडम ,भाग्यवंत मॅडम यांनीही मदत लागली तर सांगा असे मायेपोटी सांगितले . माझी नणंद ,कॉलेजच्या प्रिन्सिपॉल पाटील  मॅडम, आहेर मॅडम तिघीनींही....... कोणतीही..... अगदी पैशाची मदत लागली तरी सांगा..... असे प्रेमाने बजावले. वहिनीने डबा  देण्याची सुद्धा तयारी दर्शवली. पण ते व्यवहार्य नव्हते.विशेष म्हणजे  माझी एकेकाळची विद्यार्थिनी आणि भोरचे सहकारी श्री. शिंदे यांची पत्नी सौ. चित्रलेखाने दररोज फोन करून सातत्याने follow  up घेतला . काळजी पोटी अनेक सूचना केल्या. धीर दिला .खरेच तिचे खूप कौतुक वाटले . 
आणि असे  सात दिवस काढले..... 
मुलीचे ठाम म्हणणे होते कि मला काहीच झाले नाही.. मी दुसरीकडून टेस्ट करून कन्फर्म करते. ती रुबीला जाऊन परत टेस्ट करून आली आणि ती निगेटिव्ह आहे असा रिपोर्ट मिळाला. .....जीव भांड्यात पडला. निम्मे टेन्शन दूर झाले. मग शंका येऊ लागली......यांची टेस्ट तरी बरोबर होती का???
सांगता येत नाही........ कागद जे सांगतो त्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो. 
अशा प्रकारे सात दिवसात सनसनाटी असे काही घडले नाही . ....आपोआप ताप कमी झाला. सर्दी नाही, खोकला नाही ,श्वासाचा त्रास नाही. काहीच नाही. फक्त अंगावर चालून आलेला कामाचा डोगर आणि जोडीला प्रचंड ताण. २१ जुलै २०२० रोजी यांच्या कोविड चाचणीचा पॉझिटिव्ह  असल्याचा रिपोर्ट आला तेंव्हापासून सुरु झालेला हा कोरोना बरोबरचा जबरदस्त घबराटीचा प्रवास  हळू हळू सावट दूर करत  २७ जुलै२०२० रोजी    ...माझ्या वाढदिवसाच्या दिवशी  पूर्ण झाला. त्रेपन्न  वर्ष पूर्ण होता होता माझ्या आयुष्याच्या पोतडीत अनुभवाचे पुरेपूर माप टाकून तो गेला.जाता जाता माणसांची असंख्य रूपे  दाखवून मला समृद्ध करून  गेला...
पाच दिवस आलेला ताप, जोडीला अंगदुखी आणि डोके जड होणे. बस्स एवढेच....इतका हा कोरोना साधा सोपा  आहे का ?..... सर्व जग पाच- सहा महिने बंद पाडणाऱ्या या रोगाचे स्वरूप निश्चितच  भयावह असणार आहे. हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. हॉस्पिटल मध्ये कॉटस मिळत नाही.ऑक्सिजन  उपलब्ध होत नाही. असे सगळेच भयंकर,  भीतीदायक घडते आहे . म्हणजे हे गंभीरच  होते आणि असणारच आहे पण आम्हाला या चिनी ड्रॅगनने जरा सौम्य रूप दाखविले. आपल्या शेपटीचा हलकासा फटकारा त्याने मारला .शारीरिक हानी फारशी केली नाही. पण मानसिक ताण मात्र पुरेपूर दिला.....  

पण एक खंत मात्र तीव्रतेने जाणवली. घराच्या जवळपास  राहणाऱ्या माणसांनी मात्र ढुंकूनही बघितले नाही. देवाच्या कृपेने मी सर्व करायला समर्थ होते .मला मदतीची अजिबातच गरज भासली नाही (पण कोणाला असू शकते.). ..... एक माणुसकी म्हणून चौकशी!!!!!........ तेही   फोनवरून सुद्धा करण्याचे सौजन्य या वेळी आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी   दाखविले नाही. आधी असे घडले नव्हते. हा कोरोनाचा प्रताप !!!!! कोरोना रुग्णाच्या जवळ जाऊ नये हे ठीक आहे.... घराची दारे करून घ्या बंद ......पण मनाची कवाडे उघडायला मनाई नसते ....... घरी बसून फोनवरून विचारायला काहीच हरकत नसते . अशी कोरोना पीडित अनेक घरे आजूबाजूला असू शकतात. ते रुग्ण म्हणजे  काही गुन्हेगार नव्हेत .... काय झाले ? बरे आहे का? काही लागले तर सांगा ..... आम्ही आहोत .......असे नुसते म्हटले  तरी धीर येतो माणसाला...... अजून तरी फोनच्या लहरींमधून कोरोना पसरतो असे ऐकलेले नाही....... 
   ...... यात माझीही चूक असणार. मीच आपण होऊन कधी कोणाशी संबन्ध वाढवलेच नाहीत.मीही माझ्या बेटावरच जगते आहे ... 
आत्ताच्या या जगात प्रत्येक  माणूस स्वतंत्र बेटावर राहतो आहे. जो तो आपल्याच कोशात गुरफटलेला,  आपल्याच पाया पुरते बघणारा .(यात मीही आलेच ).अत्यंत - स्व केंद्रित. स्वार्थी, कातडी बचाऊ .त्यात या कोरोनाने आणिकच  आपल्यापरीने भर घातली आहे. परंतु त्यातही लांब राहून चौकशी करायला, धीर द्यायला,लांबून लागेल ती मदत करायला काहीच हरकत नसते. पण काही माणसे सोयीस्कररित्या ते टाळतात......Social distancing पाळता पाळता मनानेपण दूर दूर  पळतात. शब्दाचीही काटकसर करतात.शाब्दिक औदार्य दाखवायलाही कचरतात.  मनाने कोसो दूर निघून  गेलेल्या या माणसांना  social animals का म्हणायचे? 
 खरं तर आता माणसाची social animal  म्हणून पुढील व्याख्या करायला काहीच हरकत नाही.
"the animal who makes abundant use of social media in isolation... is a social animal."  .............      
नाही का?
तुम्हाला काय वाटते?
आपल्याला हे बदलले पाहिजे. काही माणुसकीची बेटे निश्चितच आहेत. ती वाचवली पाहिजेत. मला काही माणुसकीची बेटे भेटली. पण बेटावरचीं isolated माणसे पण भेटली. खरंच हे बदलले पाहिजे. Social distancing पाळूयात पण मनाचे distance कमी करूयात.चला खरोखरचे social  होऊ यात....... . माझ्यापासूनच सुरुवात करायला हवी........

नेहा देव  

शनिवार, २० जून, २०२०

मनाच्याही मनातले ...7)अधुरी एक कहाणी

7अधुरी एक कहाणी 

आटपाट नगर होत 
चंदेरी......सोनेरी ... लखलखतं... 

साऱ्यांच्या स्वप्नातलं ते गाव होत
ताऱ्यांचे त्यावर नाव होत 
चमचमाट...झगझगाट.... डोळे दिपवणारा होता.
अप्सरांचा तिथे वावर होता ..गंधर्व ,यक्षांचा  वास होता... 
तिथे प्रतिभा खुलत होती 
तिथे कला फुलत होती 
मोहक त्यांची फळे होती.
युगामागून युगे सरत होती 
कला तिथे  बहरतच  होती 
स्वर्गीय संगीत होते,  मधुर गीते  होती ...
भावपूर्ण कथा होत्या.
लाजवाब त्यांचा अभिनय होता,
अवघे जग त्यावर होते फिदा.
कलियुग आले आणि नक्षत्रांच्या त्या गावाला कोणा नतद्रष्टाची नजर लागली.
कलेचा बाजार सुरु झाला,देहाचा व्यापार तिथे होऊ लागला
नशेचा सुळसुळाट झाला.गुंडांचा तो अड्डा झाला. 
तळवे चाटू चमच्यांना ऊत आला 
राजपुत्राच्या मुखवट्याआड श्वापदांचा वावर सुरु झाला.
म्हणाले ही सगळी आमचीच  जागीर.
कोणाच्या बापाची नाही आम्हाला फिकीर 
त्यांनी केले संगनमत 
मिळून रचला एक कट 
त्यांनी एक टोळी केली.
उपऱ्याना यायला मनाई केली  
कोण येतो बघूच इथं आम्ही
 त्याची हिम्मत करू खच्ची
टोचे मारून करू आम्ही घायाळ
गिधाडांचे आम्ही वारसदार.
इथे चालेल फक्त आमचा कायदा. मागचे सारे आता  विसरा
आम्ही करू तेवढेच बघा.... त्यालाच आता "कला" म्हणा 
तिथे एक तरुण खेडूत आला. देखणा.. उमदा... भोळाभाबडा 
डोळ्यात हजार  स्वप्ने त्याच्या,
म्हणाला मी पण होईन राजपुत्र ...
माझ्यामधेही आहे प्रतिभेचे अंग.
पहा तर माझ्या कलेचा आविष्कार
मलाही द्या फुलण्याचा अधिकार..
 हा   हा    हा   
श्वापदांनी विकट हास्य केले.
तुझ्यासारखे आम्ही खूप पचवले 
त्याला मध्य रिंगणात  घेरले.
रानकुत्र्यासारखा केला त्यावर हल्ला.
बेसावध बिचारा घायाळ  झाला.
जखमी, अर्धमेला  तडफडू लागला.
मदतीला नाही कोणी  त्याच्या.
स्वप्ने राहिली अर्धीच ...म्हणाला ही जिंदगी  नाही खरी.
ईश्वरा ती तुझी तुलाच भली.
बुद्धिमान त्याला हे कळलेच नाही.
आपल्यासारख्यानी यायची ही जागाच नाही
त्याच्या नावात होती शांती....हृदयात मात्र अशांती 
हृदयात  माजली वादळे अनावर 
 निसटत्या क्षणी  त्याने जीवन केलं अर्पण 
नावातील शांतता आणखीनच  गूढगर्भ झाली........
त्याला हे कळायला हवे होते ....
या बगळ्यामध्ये होता तो राजहंस
गिधाडांमधला तो वैनतेय .......
अजाणता काही घडून  गेले,डोळ्यांमधले  स्वप्न विरून गेले.
 अविवेक दुराचार उतू गेला.निर्दय कली मातून गेला.
श्वापदे झाली नरभक्षी.... रया गेली नगरीची 
.........
कहाणी राहिली अर्धीच .....असफल  आणि अपूर्ण 
असफल ...... आणि 
अपूर्ण ..........

©नेहा देव 

शुक्रवार, १९ जून, २०२०

मनाच्याही मनातले ...6) मागणे

मनाच्याही मनातले 
6) मागणे

वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी आयुष्याचा ताळेबंद मांडताना 
 कधीकधी तीव्रतेने वाटते की
ते परमेश्वर नावाचे प्रकरण मला  एकदा भेटावेच !!!! 
त्याला गदागदा हलवून ,खडसावूंन विचारायचे आहे. 
का?   का??     का रे बाबा का???
का  तू मला असे सर्वच बाबतीत मध्यम .....सर्वसाधारण...बरे... या पातळीवरच ठेवलेस?
एखाद्या  बाबतीत तरी उत्तम या टोकाचे गुण  मला द्यायला काय हरकत होती?.एखाद्या  बाबतीत तरी..........?
मला आवडले असते कि ते ...   
ईश्वरी सौंदर्य-मधुबालासारखे..  
मोहकता माधुरीसारखी...
परमोच्च मधुर  आवाज लतादीदींसारखा...
खेळातील अफाट कौशल्य सुनील,सचिन सारखे...
अभिनय दिलीपकुमार सारखा...  
नृत्य कौशल्य गोपी सारखे....
विनोदी लेखनाची अलौकिक प्रतिभा पु. ल. सारखी...
काव्यामध्ये तर किती नावे घ्यावीत?.
नेतृत्व वाजपेयी सारखे ,नरेंद्रांसारखे....
कर्तृत्व धीरूभाई सारखे....
श्रीमंती लक्ष्मी मित्तलासारखी....
समाजसेवा आमटेंसारखी.....
राषट्रभक्ती सावरकरांसारखी............
छे छे यापैकी काहीच माझ्याकडे  नाही.चमकदार, अलौकिक, असामान्य असे काहीच नाही.
सर्वच बाबतीत मी आपली  बरी !!! साधारण!!! ठीक ठीक!!!! मध्यम!!!
माझी झोळी  देवाने अर्धी रितीच ठेवली.  
तमाम मध्यमवर्गीयांची  ब्रँड अँबॅसिडर  सारखी मी आपली मध्येच ....मधल्या सीमारेखेवरच  उभी ..... 
का?   का??
या साऱ्या उत्तम लोकांचे  अतुलनीय कार्य बघताना,कलांचा आस्वाद घेताना आत कुठेतरी सलत राहतेच, हे
मी का करूशकत नाही??? त्या जागी मी का नाही???
हे असे काहीतरी उत्तम, अलौकिक झाल्यावर काय वाटत असेल माणसाला? काय भावना असतील?
तुकोबा म्हणतात .....
जया अंगी  मोठेपण  तया यातना  कठीण .....
असू  दे. त्या यातनांसह  ते मोठेपण मी हसत स्वीकारले असते.
मला हवा होता तो अनुभव.... याच जीवनात!!!
चौदा विद्या,चौसष्ठ कला,हजारॊ प्रकाराचे खेळ, शारीरिक गुण वैशिष्ठ्ये,कल्पकता, सृजनशीलता,उद्यमशीलता,तांत्रिक कौशल्य, राष्ट्रप्रेम, समाजकार्य,.........अगणित गुण...
कितीतरी मोठा span ईश्वरासमोर होता.पण त्या पैकी  एखाद्या गुणासंदर्भात अलौकिक या बिंदूवर मला न्यावे असे काही त्याला वाटले नाही......दिव्यत्वाचा परिसस्पर्श मला झालाच नाही ... माझे नशीब ....
लाखो तारे आसमानमे, एक मगर ढुंढे ना  मिला.......अशी माझी अवस्था .
कदाचित त्याला लागणारी आत्यन्तिक प्रेरणा, जिद्द,कष्ट, उद्दिष्टाला वाहून घेण्याची  तयारी,धडाडी, धडपड,हिम्मत,कर्तृत्व,धाडस ...यापैकी कोणतेच गुण पुरेशा प्रमाणात माझ्यात नाहीत.
खरी गोची तिथेच  आहे ...माझे गाऱ्हाणे मुळात तेच आहे. हे सर्व गुण 
देवाने मला  पुरेसे दिलेच नाहीत. त्यावर कडी म्हणजे  बलवत्तर नशीबही नाही. 
 केशवसुत  म्हणून गेले कि---- प्राप्त  काळ हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा......
अरे पण कशी? कशी  खोदा? छिन्नी हातोडा तर चालवता यायला हवा.
हा कंजूषपणा माझ्या बाबतीत त्याने का केला?
रूप बेतास बात -आता पन्नाशीनंतर सुमार या विशेषणाकडे जाणारे....उंची मध्यम...बुद्धिमत्ता थोडीशी बरी.त्यामुळे शिक्षण जरा above average..पण व्यवहारात त्याचे रूपांतर पैशात करण्याची चतुराई नाही. त्यामुळे कमाई मध्यम , अर्थातच श्रीमंती मध्यम, उत्तम  गाउ असे  म्हटले तर आवाज साधारण...  इतर कलांच्या   बाबतीत हाच प्रकार. निसर्ग नियमाने दोन अपत्य झाली. पण त्यांना घडवण्यातही खूप मोठे कर्तृत्व नाहीच.
आजी आजोबांच्या छत्र -छायेखाली  स्वतःच  वाढत गेली बिचारी.
एकूण सर्वच मामला ..... मध्यम,मध्यम,मध्यम........... मध्यम वर्गीयांची ब्रँड अम्बॅसॅडर!!!!!!
याविचाराने क्वचित खिन्न व्हायला होते.  अरेरे.... कसे हे माझे  जीवन? 
जन्माला आले ,जगले  आणि एक दिवस मरून जणार!!!!  . ....ना  कोणाला खंत  ना खेद. 
आपण निघून गेल्यावर मागे काय राहणार? 
काय राहणार मागे ? 
कोणत्याच पाऊलखुणा नाहीत...... कोणतेच ठसे नाहीत......
जन पळभर म्हणतील हाय हाय !!!!! 
नंतर काय ?
कसे हे किडा मुंगी सारखे जगणे ?
ये जिना भी कोई जिना है?
नाही म्हणायला या अन्यायावर उतारा म्हणून दोन गुण देऊन देवाने उ:शाप दिला आहे . 
एक  म्हणजे आत्यंतिक सहनशीलता ( आईकडून आलेला  वारसा हक्क--पण आईपेक्षा हा गुण कमीच )
आणि दुसरा म्हणजे आत्यन्तिक संवेदनशीलता !!!!
सहनशीलतेमुळे वाद कमी होतात.जीवन मध्यममार्गावर,  मध्यम गतीने  चालूच राहते.
पण संवेदना  मात्र वेदनाच देतात .. हा उ:शाप .. का शाप ?
या संवेदनशीलतेमुळे आजू बाजूला घडणारे सर्वच जाणवत राहते, मनात शोषले जाते , आत झिरपत जाते ,खूप काही  खुपत राहते , ठसठसत राहते. या संवेदनांचे करायचे काय?? नटसम्राटांच्या वेदनेसारखीच त्याची अवस्था.त्या संवेदनांना  ना हात ना पाय. केवळ  धड !!!!  केवळ आणि केवळ असहाय्य !!!
या असहाय्यतेच्या जखमेसह जगावेच लागते.......अश्वत्थाम्यासारखे.
करणार काय?.
मग  निरुपायाने  स्वतःलाच  समजवावे  लागते.
ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे मंजूर है !
सामने तेरे  तेरा बंदा बहुत मजबूर है.......
असे  म्हणत मीच मला  जगवत  ठेवते!!!!!!
नाही !!! त्या धडधाकट भिकाऱ्या सारखे रडगाणे गाणाऱ्यातील  नाही मी..... ज्याला रोगी राजाने त्याच्या  अनमोल निरोगी शरीराची किंमत जाणवून दिली होती.....
दूर कुठून तरी कानावर येणाऱ्या सुरात माझ्या मनाच्या कोपऱ्यातील सूर मिसळून जातात.... 
माझे जीवन गाणे.... 
व्यथा असो आनंद असू दे....... 
जे काही ईश्वराने दिले त्याचा चांगला वापर करत मध्यम मार्गावर मध्यम  गतीने जगणे चालूच ठेवणार मी..
अर्ध्या भरलेल्या झोळीच्या शिदोरीवर जीव जगवत आणि जागवत......
ओबडधोबड का होईना जसं  जमेल तसं  माणुसकीच लेणं खोदत राहणारच मी .....  
तेवढे माणुसकीचे धडे मी नक्कीच शिकले आई बाबांकडून  !!!!!

पण कधीतरी असेही घडते .... माझ्या प्रश्नाचे उत्तर  माझे  मलाच उमजते........मनात चमकून जाते ......
माझे  मलाच.... .....उमगते .....
........उत्तम वक्त्याला दशसहस्त्र श्रोते लागतात,प्रभावी नेत्याला लाखो अनुयायी लागतात, उत्तम अभिनेत्याला शेकडो चाहते  लागतात., प्रतिभावान  लेखकाला असंख्य वाचक लागतात...  .... ते  व्हायचे कोणी? समाजातील बऱ्या वाईटाचा तोल सांभाळायचा  कोणी? समाज स्थिर ठेवायचा कोणी?प्रामाणिकपणे टॅक्स देऊन देश चालवायचा कोणी?श्रीमंत आणि गरीब यामधील दरी सांधायची कोणी?
माझ्यासारख्या मध्यम मार्गी मनुष्यानीच!!!!!!
मग तो  प्रसामान्य संभव वक्र डोळ्यासमोर येतो .त्यात मध्यस्थानी आलेख खूप वरजातो......शिखर गाठतो... एकदम टोकाला जातो.त्या टोकावर आपण सर्व मध्यम वर्गीय असतो. हा मध्य.... मध्यभागी राहून  सर्व पसाऱ्याचा तोल आपल्या शिरावर घेऊन ताटकळत उभा असतो. हीच तर मेख असते. इथे ते टोक मध्यमवर्गीयांनी  गाठलेले  असतें. 

स्वतःच निर्माण केलेल्या अति  उत्तम आणि अति निकृष्ट या दोन टोकांमधले अंतर जुळवून घ्यायला आणि त्याचा तोल सांभाळायला देवालाही अवघड गेले असते आणि म्हणूनच खूप मोठ्या संख्येने माझ्यासारख्या मध्यम मार्गी मनुष्यांची योजना त्यांनी केली असावी.
हा परत आपला माझा मध्यम विचार!!!!!! 
मध्यम बुद्धीला सुचलेला!!!!

आपल्या ब्याऐंशी  वर्षाच्या आयुष्यात लाखो संकटे झेलत हसतमुखाने जगणारी माझी मध्यमवर्गीय आई नेहमी म्हणायची ....याजन्मात आमचे सगळे पूर्वजन्मीचे भोग आम्ही भोगून संपवणार...... पुढचा जन्म 
 आमचा उत्तम असणार!!!
दुर्दम्य आशावाद!!!! 
...आता नक्कीच  ती कुठेतरी जन्मली असणार!!!!!
परमेश्वरा हे एक मागणे तरी पुरे करशील? तिचे म्हणणे खरे करशील?
आणि तिच्याच पोटी पुन्हा जन्म देऊन मला  फक्त एक  उत्तम माणूस करशील? मग मी  मानव्याचे सुंदर शिल्प त्यात खोदेन.... मग  मी मेल्यावर माणसे म्हणतील....... एक उत्तम आयुष्य संपन्न झाले ....
एवढे करशील ?
निदान पुढच्या जन्मी तरी?

©नेहा देव 
 


बुधवार, ३ जून, २०२०

मनाच्याही मनातले... 5) बावीस

मनाच्याही मनातले....
         5)   बावीस
           बावीस हा  दिसताक्षणी आवडेल असा काही आकर्षक आकडा नाही.
 बावीस हा काही माझा लकी नंबरही नाही. माझा जन्मदिनांकही नाही. आमच्या पैकीं कोणाचाच नाही. किंवा तो काही खास पासवर्ड किंवा कोडवर्डही नाही.एखाद्या  कमनीय ललनेच्या मापाशीही हा संबंधित नाही.
पण या  नम्बरचे आमच्या लहानपणाशी बरेच काही बंधअनुबंध जुळलेले आहेत.
आमच्या चारही भावंडांच्या लहानपणातील आयुष्याचा बावीसच नव्हे  तर चव्वेचाळीस टक्के भाग या बावीस नंबरने व्यापला होता.
           लोकमान्यनगरमध्ये आमच्या बिल्डिंगचा नंबर होता नऊ आणि आमच्या समोरची बिल्डिंग सोडून दोन बिल्डिंगच्या नंतर एका   छोट्याश्या  चौकांच्या पुढे  होती ....बिल्डिंग  नंबर  बावीस.... 
आता इथल्या बिल्डींग्जना कोणत्या क्रमाने असे नंबर दिले होते, हा एक मोठा संशोधनाचा विषय  ठरू  शकतो.
          उच्च शिक्षण घेताना संशोधन या विषयाशी  ओळख झाली आणि त्यात random--यादृच्छिक  ही नवी संकल्पना कानावर पडली. random -यादृच्छिक म्हणजे नेमके काय याचा प्रत्यक्ष अनुभव लोकमान्यनगरच्या बिल्डिंगना  दिलेले नंबर  ज्या क्रमाने  दिले आहेत त्यावरून कोणालाही पटकन समजेल. 
          कोणताही ठराविक नियम न पाळता अक्षरशः मनाला वाटतील त्या पद्धतीने या बिल्डींग्सना नंबर दिलेले होते. नवागतास पुरेपूर गोंधळात टाकून वांच्छित पत्याचा पत्ता लागू द्यायचाच नाही असा बहुधा बिल्डरने  चंग बांधला  असावा .
          तर बिल्डिंग नंबर  बावीस.... या मध्ये आमची मावशी तिच्या तीन मुलींबरोबर रहायची. परिस्थितीची गरज म्हणून मावशी नोकरीला जायची. मग दिवसभर त्या तीन मावसबहिणीसह तो बावीस नंबर मधील तीन खोल्यांचा आख्खा ब्लॉक आमच्या  ताब्यात असायचा . तो म्हणजे आमच्या सर्व भावंडांचा मुक्त पणे खेळायचा अड्डा असायचा.
          त्या बावीस नंबरने  वेगवेगळ्या प्रकारे आमचे लहानपण समृद्ध केले. .
          मावशीचा स्वयंपाक मस्त मसालेदार असायचा. तिच्या हातच्या  आमटीची , वांग्याच्या भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आमच्याकडे  घरी आज्जी, बाबा यांच्या सततच्या आजारपणाने पथ्याचाच  स्वयंपाक  असायचा. मला पहिल्यापासून मसालेदार चमचमित जेवणाची आवड. पण आई ते काही करू शकत नसे. आमच्याकडे तेलाची इतकी टोकाची काटकसर असायची की जास्त तेल एकावेळेस आणले तर आई भराभर जास्त वापरून संपवेल म्हणून अक्षरशः दर  दोन- तीन दिवसांनी अर्धा - पाव किलो तेल आम्ही मुलेच आणायचो. (माझी ही मसालेदार तेलकट खाण्याची आवड आईने मनात ठेवली होती आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही याची खंतही.... माझे लग्न झाल्यानंतर एक दिवस आईकडून डबा घेवून जायची वेळ आली होती. कॉलेज मध्ये गेल्यावर डबा उघडला आणि पाहिले तर भाजी तेलाने आणि पोळी तुपाने ओथंबली होती.. ...आणि माझे डोळे पाण्याने....... )
          तर या बावीस नंबर मध्ये मावशीच्या हाताचा चमचमीत स्वयंपाक हे एक आकर्षण होतेच.
दुसरे म्हणजे,मावशीने वाचनालय लावले होते. तिच्या घरी मासिके, कादंबऱ्या असायच्या.
त्या काळात कोणताही लेखी चिठोरा लेखकाने माझ्यासाठीच लिहिला आहे आणि तो न वाचला तर पाप लागेल अशा   भावनेने  मी अक्षरश:जे मिळेल ते वाचत सुटायचे. त्या अर्धवट वयात जे वाचायला हवे ते आणि नको असेही. त्यामुळे जरा लवकरच शहाणपण आले होते. बाकीचे सर्व खेळात रमलेले असताना मी मात्र अनेक वेळा पुस्तकात डोके खुपसून बसलेली असायची.
      तर माझ्यासाठी ते एक मोठे आकर्षण होते .पुस्तके,मासिके,वर्तमानपत्रे असा बराच खजिना.
परीक्षेच्या काळात अभ्यास आम्ही इथेच करायचो. रिकामपणाचे खेळ आणि इतर छंदही  आम्ही इथेच जोपासले.तिथेच आमचे पत्ते,कैरम,सागरगोटे, भातुकली, लपाछपी असे तमाम खेळ चालायचे. तेव्हा दूरदर्शन (आपला T .V ) नुकतेच  अस्तित्वात आले होते.  आमच्या आधी मावशीकडे T .V .आला होता. तेव्हाही श्वेतांबरा,छायागीत बघण्यासाठी आम्ही तिच्याकडे तळ ठोकून  असायचो ,असे स्मरते . 

आमची आई अतिशय मवाळ.ती चुकूनही कोणाला आवाज चढवून  रागावलेली मला  आठवत नाही.
त्या मानाने मावशी भलतीच कडक ! फटकन रागे भरायची!!
 तिची जरा भीती वाटायची पण ती नसताना आम्ही तिच्या घरात मुक्तपणे वावरायचो.
तीच ही नंबर बावीस.......
आमच्याकडे नऊ नंबरच्या अडीच खोल्यामध्ये मूळची सात ,अधिक  दीर्घ काळ राहावयास आलेला चुलत भाऊ ,अधिक काहीनाकाही निमित्ताने येणारे काका, आत्या, इतर नातेवाईक असे एकावेळेस दहा- बारा लोक  सहज असायचे. मग साहजिकच अडचण ही असायचीच. तेव्हाही हे मावशीचे घर म्हणजे आमची आधाराची गोष्ट असायची. आमच्या घरच्या  अडीअडचणीच्या वेळी रात्री झोपायला जाण्याचीहि ती हक्काची जागा होती.
आई आणि मावशी दोघीही बहिणी भिन्न स्वभावाच्या असल्या, तरी त्यांच्यात खूप सख्यं होते . अडीअडचणीला दोघीही एकमेकींना मदत करायला, सावरायला तत्पर असायच्या.
तीच ही नंबर बावीस......आमच्या शारीरिक,  मानसिक ,भावनिक  भरण पोषणात यानंबरने बराच काही हातभार लावला आहे. त्या नकळत्या वयात   कळत  नकळत आम्ही मावशीला त्रासही दिलेला असावा.पण मावशीने कधी त्याची जाणीव करून दिली नाही.
कोणी तरी असे म्हटले आहे कि माय मरो आणि मावशी जगो.
छे छे ... हे मला  अजिबातच पटत नाही.
मला वाटते,
माय जगो आणि  मावशीही भरपूर जगो. दोघीही हव्यातच!!!
   .........  आज आई या जगात नाही .....मावशीही दुसऱ्या जागी स्थलांतरित झाली आहे.आईशिवाय ते  घर याची कल्पनाच मला करवत नही. पक्षी उडून गेलेल्या घरट्यासारखी ती दोनही घरे सुनी सुनी झाली आहेत.
वयाची बावीस वर्ष जिथे मुक्तपणे वावरण्यात घालवली तो परिसर आज मला परका,अनोळखी भासतो आहे. मला म्हणतो आहे ---------
----तेरा यहाँ  कोई नही...... के तेरा यहाँ  कोई.... नही.!!!!!!!
पण या दोघी बहिणींच्या  आयुष्याचा साक्षीदार  असणारा तो चौक अजूनही तसाच आहे !!!!.स्थितप्रज्ञासारखा
निर्विकार !!!!!.नऊ आणि बावीस नम्बरमधील दोन कुटुंबाना जोडणारा तो दुवा.....भूत आणि वर्तमानाचा  तोल सांभाळत उभा आहे!!!!!.........आमच्या भावंडांच्या हृदयातील बावीस टक्के भाग व्यापून!!!!!!
©नेहा देव 

मंगळवार, १२ मे, २०२०

मनाच्याही मनातले...4) ऋणानुबंध

मनाच्याही मनातले

 4)    ऋणानुबंध
@नेहा देव 

          एका मे महिन्याच्या संध्याकाळी ती आमच्याकडे आली. माझ्या सक्त विरोधाला न जुमानता धाकटीने तिला आमच्याकडे हट्टाने आणलेच. धाकटी अशीच आहे. बेधडक, बेपर्वा. माझ्या अगदी विरुध्द!  अर्थात तिच्या वडिलांचाही तिला छुपा पाठिंबा होताच. 
          माझ्या विरोधाला कारणही तितकेच सबळ होते. मुका बिचारा जीव! खाण्या पिण्यासाठी  पूर्णपणे आपल्यावर अवलंबून राहातो. त्यामुळे  सर्वाना एकदम घराबाहेर जाता येत नाही. कोणालातरी  घरात अडकून पडावे लागते. घरात एका माणसाचे काम वाढते!!!!! आणि सर्वात  महत्त्वाचे म्हणजे तरुणपणी आपल्याला खूप  जीव लावणारे हे जीव एक दिवस जिव्हारीं खोल जखम करून निघून जातात. एकदा मी अनुभवले होते ते!!!!
          मुलीने जरी जोरात सांगितले; मी  करीन सगळे तिचे!....  तरी ते अजिबात विश्वासार्ह नाही आणि शेवटी सगळी जबाबदारी माझ्याच गळ्यात पडणार, ह्याची मला खात्री होती.
          असो. मी अगदी थंडे  स्वागत केले तिचे. दोन महिन्याची  होती वाटते तेव्हा ती. धड गोंडस पिलू नाही अन पूर्ण वाढही झालेली नाही अशी.  गाढवासारखे मोठे कांन अन चेहेऱ्यावर  बावळट भाव!!!
          सुरवातीला निग्रहाने तिच्याकडे दुर्लक्ष केले मी. पण घरापाठोपाठ माझ्याही  नकळत माझ्या मनात घुसून तिने केव्हा आपले घर केले हे मलाही कळले नाही. तद्दन हिंदी फिल्मसारखेच! आधी विरोध आणि मग chemistry जुळते, नंतर आकंठ प्रेमचं प्रेम!!!
          ती म्हणजे आमची ल्युसि!!! माझ्या ५३ वर्षाच्या आयुष्यातील हे दुसरे श्वान!
          सहवासाने निर्जीव वस्तूमध्येही जीव गुंततो बायकांचा. हे तर हाडामासाचे जिवंत प्रकरण.
          ल्युसि,लुस्मानिया, लुसमानखान,लुसोलिनी,लुसोबा(मसाबाच्या धर्तीवर) अशा फिरंगी नावांपासून  ते लुशे-घुशे, घोडे ,ढोले,बावळे, गाढवे,नकटे  अशा ग्राम्य भाषेतल्या कोणत्याही नावाने तिला पुकारायला  तिची हरकत  नसते. फारच चांगला मूड असेल तर मीनाक्षी ,राणी अशीही हाक मारली जाते. पण खरंतर माधुरी नाव तिला फारच खुलले असते. अशी सुबक ठेंगणी तरुण झाली आहे ती. डौलदार शरीर.काळी पाठ, पाठीवर  रुळणारी ऐटबाज शेपूट.काळ्या बुबुळाभोवती मधाळ रंगाचे वर्तुळ. , पण....... गाढवासारखे कांन!!! हे एकच वैगुण्य!! .... मला भासणारे. आणिक एक म्हणजे I.Q जरा कमीच!!! आमचा चिनू फारच हुशार होता. हिच्यापेक्षा!!!
           आमच्याकडे येताना आधीच्या कुटुंबातील नाव घेऊनच ती आली होती.  त्यामुळे मराठी नाव ठेवण्याची  माझी इच्छा फलद्रुप झाली नाही. (आमच्या आईकडच्या  कुत्र्याचे नाव मी चिनु ठेवले होते आणि शेजारी आलेल्या पिलाला मी हरिप्रसाद म्हणत होते..... स्वदेशीचा पुरस्कार! )
          ती घरात आली . सुरवातीचे कौतुकाचे दिवस  गेले. ती घरात  रुळली.  तिला कोणतीही शिस्त लावायची ना कोणी तोशीस घेतली कि ट्रेन करण्यासाठी कोणी कष्ट घेतले .शेवटी  आपले अधिकार आणि आपली कर्तव्ये तिची  तिनेच ठरवून घेतली.घराच्या आजूबाजूला कोणीही आले तरी भुंकून आकांत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि मांजरासारख्या चिल्लर प्राण्याला भुंकून धाक दाखविणे हा आपला  अधिकार आहे  हे ठरवून ती कामाला लागली. कधी कोणी दारासमोर आले आणि आपल्याला बोलायचे असते तेंव्हा भुंकू नको म्हटले तर  ती अजिबात ऐकत  नाही.माझ्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकून ती जणू म्हणते, " ए बाई माझे काम करू दे मला. हा माझा प्रांत आहे. तू नको ढवळाढवळ करुस." .....   मी मग माघार घेते.
         अशीच एकदा पहाटे मी व्यायामासाठी बाहेर पडले, तर समोरून रस्त्यावरचे भटके कुत्रे आडवे गेले. ल्युसीचा पारा अस्मानात गेला.   भुंकून भुंकून  सगळी गल्ली  दणाणून सोडली तिने. तेव्हापासून दररोज सकाळी न चुकता ती गेटपाशी थांबते. मी कोपऱ्यावरून वळून दिसेनाशी होईपर्यंत दक्ष राहून भुंकत राहते..... ....माझ्या बाईंना कोणीही त्रास दिलेला मला खपणार नाही असे जणू ती आपल्या भाईबंदांना बजावत राहते. तिचे हे संरक्षक कवच मला खूप सुखावते. असे protection  केवळ आईकडूनच  आपल्याला मिळत असते.
          ल्युसि  इतकी प्रेमळ आहे कि आम्ही काही खायला  दिले तर आम्हाला स्वतःचा दात लागू नये म्हणून ती आटोकाट काळजी घेते, अलवारपणे ती वस्तू पकडण्याचा प्रयत्न करते
          तिला मी कधीही मारलेले नाही, मारतही नाही  (पार्श्व भागावर कधीतरी एक दोन चापट्या सोडून). पण मी नुसते  "काठी!!!" असे म्हणताच ती कांन पाडून आपल्या गटांण्या डोळ्यात सखाराम गटणे  पेक्षाही  ओशाळवाणे  भाव आणून ... .. माझे चुकलेच...  असे सुचवत निघून जाते.
          माझ्या धाकट्या मुलीची आणि नातीची ती खेळगडी आहे. त्यांच्याशी खेळताना  गरीब गाईहूनही गरीबपणाने ती वागते. तेंव्हा वाटते गायीच्या ऐवजी चुकून कुत्र्याच्या जन्माला आली ती. आतापर्यंत कोणालाही ती कधीच चावलेली नाही. जणू आपल्या दातांचे दुसऱ्याला चावणे  हे काम ती विसरूनच गेली आहे.
          दिवसभर घरात, बागेत घुरु घुरु फिरल्या नंतर  रात्री  दहाच्या सुमारास मात्र मी "चला !!!!" असे म्हणताच इच्छा नसतानाही घर राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी ती धडपडत उठून बाहेर निघून जाते!!!  मला भरून येते.!!!
          असे कसे हे प्राणी असतात? काय त्यांची psychology  असते? काय त्यांची mentality  असते?केवळ दोन वेळचे पोट भरेल इतके अन्न , सहवास आणि थोडेसे प्रेम याव्यतिरिक्त  चौथी  काहीही मागणी  नसते त्यांची. या अत्यल्प मागणीच्या मोबदल्यात ते त्यांचे आख्खे आयुष्य अक्षरश: आपल्या पायावर कुर्बान करतात.  
          कधीतरी कोण्या लेखकाचे एक वाक्य मी वहीत नोंदवून ठेवले होतें. ते आता माझ्या मनावर कोरले गेले आहे. पुन्हा पुन्हा मला ते  appeal   होत राहाते ,"The More I see Men ,The More I Like Dogs!".
          इतका खरेपणा,इतकी नितळ प्रेम भावना,  इतके ईमान, इतकी माया, इतकी एकनिष्ठता, इतके unconditional  प्रेम माणसात आढळते? .... ....असेल पण  अभावानेच !  बहिणाबाई उगीच नाही म्हणत.. "पाहुनिया माणसाचे व्यवहार खोटे नाटे ,तेव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे."
          तिच्याशी जुळलेल्या या अनामिक भावबंधाच्या ऋणातून मी कधीच उतराई नाही होऊ शकत. तिची पण ती अपेक्षा नाहीच. आम्ही दोघीही अशाच एकमेकांशी बांधलेल्या!!! ऋणानुबंधाच्या घट्ट मारलेल्या गाठीने.
    .......टेढी है पर मेरी है !!!!

@नेहा देव

शुक्रवार, ८ मे, २०२०

मनाच्याही मनातले...3) ग्रहण


3)  ग्रहण


         नेहा देव
 कोविड १९ च्या lock down चे सुरवातीचे दिवस. अचानकच अंगावर चालून आलेले घळघळीत रिकामपण. उद्दीष्टहीन चाललेला मोबाईलवरचा चाळा. you tube चे व्हिडिओ नजरेसमोरून घरंगळत जात होते. नजर एका नाटकाच्या शीर्षकावर स्थिरावली. नकळतच मी व्हिडिओ on  केला.  नाटक होते "काचेचा चंद्र" कलाकार शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर. मंतरल्याप्रमाणे   पूर्ण नाटक एका जागी खिळून ,एका बैठकीतच बघून घेतले . नाटक संपले! मन विषणण ,उदास झाले. संताप,क्रोध,द्वेष,तिरस्कार,खेद,शिसारी,घृणा.
 तमाम नकारात्मक भावनांनी मन ओथंबून उतू गेले.
          हे अक्षर अन अक्षर असेच घडले होते, जेंव्हा मी ते नाटक प्रथम बघितले होते.
          ती रविवारची सैलावलेली निवांत दुपार होती.कामाचा नियोजित कोटा समाधानकारक रित्या उरकून T.V.  समोर लवंडण्याचा प्लॅन  होता. रिमोट हातात घेऊन सहजच चॅनेल्स फिरवली.  तेव्हाही असाच अचानकपणे तो "काचेचा चन्द्र" समोर आला होता अन तेव्हाही विश्रान्ती सोडून एका बैठकीत तो बघितला होता.
असेच मन विषणण,उदास झाले होते. तोच संताप,तोच क्रोध,तोच द्वेष, तोच तिरस्कार, तोच खेद,तीच शिसारी आणि तीच घृणा.
उस्फूर्त  भावनांचा हा कल्लोळ  हे त्या साहित्यकृतीचे यश मानायचे कि अशी कथा हे माणुसकीचे अपयश समजायचे?
त्या नाटकांमागोमाग अनिवार्यपणे येणाऱ्या  अनावर भावनांच्या ज्वाळा.  हे सगळे असेच घडणार हे माहित असूनही दुसऱ्यांदा ते  नाटक मी का बघितले?प्रश्न अनुत्तरित राहणार हे माहित असूनही  हा प्रश्न मी स्वतः:ला विचारलाच.

काय आहे या नाटकात?
         कथेचा प्लॉट असा. ---गरीब ब्राह्मण  कुटुंबातील सोज्वळ साधी- भोळी मुलगी. संयोगाने, शाळेच्या मास्तरांच्या शिफारसीमुळे  नाटक सिनेमाक्षेत्रात प्रवेशते. तिच्या साथीला (खर तर  राशीला) असतो एक  नाकर्ता, सावत्र भाऊ. तिचे शक्य त्या सर्व प्रकारचे शोषण तो करत राहतो.
तिची वाताहत होत राहते. ती उध्वस्त होत राहाते . कोसळतच जाते. ..... मन शत शत विदीर्ण करणारी ही  शोकांतिका. 
           तोच अनुत्तरित करणारा प्रश्न-- मी ते नाटक परत का बघितले?
काय अनुभवण्यासाठी? माणूस पैशासाठी असंही  करू शकतो हे बघण्यासाठी??
जगात असं घडू शकत? पैसा पैसा पैसा!!!! हा पैसा ही  काय चीज आहे? हे काय गौडबंगाल आहे?
असेल!!!! अस घडतही असेल!!! या जगात काहीही घडू शकते!!!  
         वास्तवातून प्रेरणा घेऊन साहित्य घडते. साहित्यातून प्रेरणा घेऊन वर्तन घडते.
वास्तव-कल्पना-भावना-प्रेरणा-वर्तन आणि त्यातून उदयाला येणारे अपरिहार्य वास्तव.  बिंब आणि प्रतिबिंब.
वास्तवापासून सुरु होऊन वास्तवापर्यंत येऊन ठेपणारे  भास आभासाचे हे  वर्तुळ.
आणि अपरिहार्यपणे त्या भोवऱ्यात गरगरणारे आपण क्षुद्र जीव जंतू. 
  तो तिचा भाऊ (सावत्र ) असा का वागला?
  ठीक आहे असा प्रसंग होऊ शकतो ,असेही घडू शकते पण लेखकाने ते साहित्यात उतरवलेच का?
  ठीक आहे नाटककाराने  ते लिहिले पण कलाकारांनी ते स्टेज वर आणलेच का? ते ही  शरद पोंक्षेनि? त्यांच्या
  सारख्या बाप माणूस  कलाकाराने व्हिलन साकारलाच  का?
  ठीक आहे त्यांनी नाटक  केले पण मी ते पाहिले तरी का ?
  एकदा पाहिले  ते पाहिले.  पण मग दुसऱ्यांदा पाहिले तरी का? का??
 या विकृत भावनाचेही एक आकर्षण असते का? कि आपण असे वागायचे नाही असे स्वतःलाच बजावण्यासाठी आपण ते बघतो?
कि एक केवळ साहित्य कृती म्हणून ते बघतो? कि तो अनुभव घेतल्यावर आपल्या मनातील वाईट भावनांचा   आपण निचरा करून घेतो?कि आपल्या चांगुलपणावर आपणच शिक्कामोर्तब करून घेतो?
कोणते उत्तर बरोबर? कि सर्वच उत्तरे बरोबर ? कि कोणतेच उत्तर बरोबर नाही?
अनुत्तरित प्रश्न......
तुम्हाला उत्तर सापडल्यास मला द्याल??????
   ©नेहा देव 

मनाच्याही मनातले ...2) मनाच्याही मनातले ..

2) मनाच्याही मनातले .. 



मनाच्याही मनातले...
थंडकाळ्या गाभ्यातले...
खोल काही गुंतलेले...
खूप काही गाडलेले...
नकळताच दाबलेले...
ते उसासे! ते उमाळे!
अमूर्त ते! नि;शब्द तें !
कोंब ते जाणिवांचे
अस्फुटश्या भावनांचे
अव्यक्त त्या संवेदनांचे 
शब्दांच्या आवरणातून ...
उमटण्यास उत्सुकलेले ...
उमलण्यास आसुसलेले
बहरण्यास आतुरलेले...
मनाच्याही  मनातले ...
मनाच्याही मनातले .......
©नेहा देव 

गुरुवार, ७ मे, २०२०

मनाच्याही मनातले...1). जाळीखालचा खजिना

मनाच्याही मनातले.

नेहा देव 

१. जाळीखालचा खजिना

               वय किती होते माझे? स्पष्ट आठवत नाही.पण मनाची माती तेंव्हा चांगलीच ओली असावी.म्हणूनच या प्रसंगाचा,त्या भावनेचा खोल ठसा अजूनही लख्ख लोलकासारखा  प्रकाशतो आहे.
               आमच्या लोकमान्य नगरच्या कोपऱ्यावरच्या  बिल्डिंगच्या टोकाला एक उघडी, उजाड बाग होती.त्या फ्लॅटमधले रहिवासी येऊन अजून स्थिरावले नव्हते. त्यामुळे उघडी बोडकी ती बाग अर्धवट स्थितीमध्ये बिचारी पडून होती. भिंतीच्या बाजूला जमिनीवर जाळीचे कंम्पाउंड होते, उभारले जाण्याच्या प्रतीक्षेत उताणे पडले  होते.
                तेंव्हा मुलांना रिकामा वेळही बराच असायचा. ( कसे काय? मला हे कोडे अजूनही उमगले नाहीये. तेंव्हा तास, मिनिटे यांचा span   खरंच जास्त होता का? तेंव्हा मिळणारा  तो leisure time  गेला तरी  कुठे?)
               तर त्या रिकाम्या वेळेत इकडे तिकडे मनसोक्त  हुंदडण्याची मुभा होती. त्या जमिनीवर पडलेल्या जाळीच्या खाली डोकावून बघण्याची अकारणच बालसुलभ हुक्की आली. त्यात डोकावून बघताच माझे डोळे लकाकले. मला  काहीतरी अद्भुत तिथे गवसले . गुलाबाच्या नाजूक रोपट्यावर एक इवलीशी कळी  जाळी आडून मला खुणावत होती.
ती इवलीशी लाल गुलाबी अर्धोन्मीलित कळी!!!!!
अरे!!!!
गुलाबाचे रोप!
त्यावर गुलाबी कळी !!!
ती उदयाला उमलणार!!!!
आणि हे फक्त मला आणि मलाच ठाऊक आहे!!!
तो फक्त माझा खजिना आहे.!!!!!
तो अद्भुत आनंद, ते अप्रूप
अजूनही अजूनही स्मरते--- भासते तितकेच रम्य,सुरम्य ! तितकेच रम्य.सुरम्य !!!!
...............आणि आज.....आता?
आता शम्भर/दोनशे/चारशे रुपये देऊन मी भरपूर रोपे आणू  शकते,तितकीच फुलेंही सहज आणू शकते. खरी खरी आणि  खऱ्यासारखी भासणारी खोटी!खूप  महागडी सुद्धा!! बागेसाठी भरमसाठ खर्चही करू शकते.
पण त्या दिवशीचा ,त्या क्षणाचा तो बालसुलभ, निर्व्याज, निष्पाप, निखळ आंनद ?
बिन पैशाचा . पण लाखमोलाचा! --- नव्हे  अनमोल. तो अनमोल खजिना गेला कोठे ?
कोण देईल परत आणून?

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन !!!!

©नेहा देव 

.