रविवार, १६ मे, २०२१

मनाच्याही मनातले १२) नशा

१२)  नशा

सकाळची आवराआवर झाली कि दुपारी नियमित online lectures. त्यानंतर हौसेने अंगावर ओढवून घेतलेले काहीतरी नवीन शिकण्यासाठीचे online classes किंवा seminars- conferences इ.चे  पुन्हा  online काहीतरी....मग रात्रीचे जेवणखाण, पुन्हा आवराआवर.......... त्यात कोरोनाच्या वातावरणाचा सतत एक अदृश्य ताण ......हे सध्याचे दैनंदिन जीवनचक्र.

पूर्वी (म्हणजे lock down पूर्वी ... जवळ जवळ सव्वा वर्षापूर्वी ) प्रत्यक्ष महविद्यालयात जाणे -येणे  असायचे. तेव्हा जाण्या- येण्याची दगदग व्हायची..........आता ती दगदग नसली तरीही इतर  शारीरिक- मानसिक ताण आहेतच. .... मग त्यावर उतारा अत्यावश्यकच असतो. ......मग हवी असते ती नशा. .......

हल्ली रात्री आठच्या नंतर मी कधीच शुद्धीवर नसते..... नशेतच असते....माझ्या शिणलेल्या मेंदूला आता काहीही करून  नशा हवी असते.......हो!!! नशाच!! ........कोणती?.......दूरदर्शनवरील कार्यक्रमांची .............

रात्रीचे जेवण झाल्यावर मी माझ्या विवक्षित जागेवर दूरदर्शन समोर पहुडते आणि शरीर आणि मन पूर्णपणे सैलावलेल्या अवस्थेत  मराठी मालिका, बातम्या, आततायी चर्चा यांच्या नशेत आकंठ बुडून जाते.

अट्टल दारूबाज जसे शुद्धीत असताना म्हणतो की दारू पिणे वाईट ...पण वेळ झाली कि बरोबर दारूच्या दुकानाकडे त्याचे पाय वळतात .....माझेही तसेच होते... रात्री आठ नंतर माझी पावले आणि डोळे ..दूरदर्शन कडे वळतात.

गेले वर्षभर  मी दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील  विविध मालिका अव्याहतपणे बघत आहे .(त्या आधी हे प्रमाण जरा कमी होते.) वाहिन्या वेगवेगळ्या, मालिका वेगवेगळ्या, कलाकार वेगवेगळे पण कथा सर्वसाधारण सगळ्या मालिकांमध्ये एकच. कोण्यातरी गरीब बिचाऱ्या व्यक्तीवर (बहुधा स्त्रीवर..कोणी गावंढळ, कोणी काळी, कोणी जाड, कोणी अगदी गरीब) घराबाहेरील किंवा घरातीलच काही लोक ...मग तो नवरा, सासू, नणंद, सवत यापैकी कोणीही किंवा त्यांचा एक कंपू सातत्याने  अन्याय करतच राहतात .......करतच राहतात......ती व्यक्ति कोणताही प्रतिकार न करता सहन करतच राहते..... करतच राहते....मी रिकाम्या डोक्याने अक्कल गहाण ठेऊन बघतच राहते........ बघतच.... राहते..... .कथेचा  जीव एवढासा, पण आपल्या पोटापाण्यासाठी, मालिकांचे लेखक ती कथा आडवी- तिडवी कशीही  मनसोक्त ताणतच राहतात आणि आमच्यासारखे नशेचे अधीन तो मूर्खपणा किंवा वेडाचार  बुद्धीवर पडदा घालून  जाणून बुजून उघड्या डोळ्यांनी बघतच राहतात.....

मात्र  हा आठवडा चांगलाच दणदणीत होता .......लेखकाला आपण अतीच ताणले आहे याची किंचित जाणीव झाली असावी......किती काळ या गरीब बिचाऱ्यानी (म्हणजे आमच्या सारख्या दर्शकांनी ) अन्याय सहन करायचा??? असे काहीतरी  guilty वाटले असावे. हा आठवडा सणसणीत थोबाडीत मारण्याने गाजला.

अरुंधतीने संजनाला, माईनी सोनालीला , शंतनुने आयुष रणदिवेला,शर्वरीच्या आईने ऐश्वर्याला सणसणीत थोबाडीत  लगावल्या. दीपा कार्तिकला पुढच्या आठवड्यात मारणार आहे. बायाबापड्या नक्कीच खुश झाल्या असाव्यात...... 

मला वाटते  सगळ्या मालिकांचे लेखन एकाच लेखकाकडून केले जात असावे....कारण बहुतेक मालिकांमध्ये समांतर प्रसंग घडत राहतात.......मालिकेतील पात्र प्रेग्नंट राहणे, लग्न/साखरपुडा, ,मंगळागौर साजरी करणेआणि आता सांगितले त्याप्रमाणे थोबाडीत मारणे असे समांतर प्रसंग विविध मालिकांमध्ये एकाचवेळी घडतात. 

सुरुवातीला काही नवीन विषय म्हणून काही मालिका बऱ्या वाटतात पण हळू हळू त्या इतरांच्याच प्रमाणे तर्कहीन कृत्रिम, अवास्तव होत  जातात. कोणतेही लॉजिक, वास्तवतेचा स्पर्श नसलेल्या, अतिरंजित, कल्पनाशक्तीचे दारिद्र्य दर्शवणाऱ्या या बाळबोध  मालिकांचा हा  बाजार ....त्यामधील जाहिरातींच्या अत्याचारासकट आम्ही का बघतो?.... माणसे दारू का पितात?  दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकच...

मी  एकाच वेळी वेगवेगळ्या वाहिन्या  आलटून पालटून लावत  त्यातही काही वैविध्य मिळते का हे शोधण्याचा  केविलवाणा प्रयत्न करत राहते. अधून मधून तोंडी लावायला तार सप्तकात किंचाळून किंचाळून केलेल्या चर्चा रुपी गोंधळ  किंवा  एकमेकांवरील चिखलफेकी मधून  काही बरा बौद्धिक युक्तिवाद ऐकायला मिळतो का हे शोधण्याचा प्रयत्न करते. पण बहुसंख्य वेळेला पदरी निराशाच पडते.

कधी  कधी मात्र एखादा उत्तम कथेचा अथवा चित्रपटाचा खजिना आकस्मिक.... अनपेक्षितपणे हाताला लागतो. 

माझी नशा खाडकन उतरते आणि मी सावध होऊन बघू लागते.

त्यादिवशी असेच घडले, या वाहिनी वरून त्या वाहिनीवर उड्या  मारता मारता अचानकच चित्रपटाचे शीर्षक दिसले...." निळकंठ मास्तर"...... नशेतल्या बेहोष मेंदूला जाणीव झाली .......हे काहीतरी वेगळे आहे.....

मी सरसावून बघू लागले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वसामान्य व्यक्तींनी स्वातंत्र्य संग्रामात आपल्या  सर्वस्वाच्या दिलेल्या आहुतीची ही असामान्य, अलौकिक कथा. सर्व तरुण टवटवीत कलाकारानी साकार केलेली . मला फार कौतुक वाटले त्या सर्वच पोरांच्या धाडसाचे. स्वातंत्र्य समर हा विषय? आताच्या काळात ??.... मोठेच धाडस.........

नायकाचे नाव माहित नव्हते , पण नायिका ओळखीची होती.... पूजा सावंत ,जोडीला नेहा महाजन .किशोर कदम, विक्रम गोखले आणि आदिनाथ कोठारे असे नवे आणि जुने दिग्गज कलाकार. मी  पूर्ण शुद्धीत, मंत्रमुग्ध होऊन पूर्ण चित्रपट बघितला.

कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शन सर्वच  उत्तम. त्यातून स्वातंत्र्यपूर्व काळ हुबे हूब डोळ्यापुढे उभा केला होता. निळकंठ मास्तर नावाची मुख्य व्यक्तिरेखा .......पेशाने शिक्षक असलेला हा माणूस स्वत:ला स्वातंत्र्य लढ्यात  झोकून देतो........त्याच्या आयुष्याची  तर होळी होतेच पण त्याच्या घरच्या सर्व माणसांचीपण पूर्ण वाताहत होते.

त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या बाल मैत्रिणीला तो राष्ट्रकार्य करायचे म्हणून स्वीकारत नाही. तिचा स्वार्थी मामा वेड्या इनामदाराबरोबर तिचे लग्न लावून देतो. तिचे सासरे पण क्रांतिकारीच असतात. पुढे योगायोगाने तिच्याच वाड्यात  तो नाव बदलून पुढचे कार्य करण्यासाठी येतो. तिच्या आशा पुन्हा पल्लवित होतात. पण तो निग्रहाने तिला आवरतो.

इंग्रजांना त्याचा पत्ता लागताच ते वाड्यावर धाड घालतात. त्यांना पुरावा मिळू नये म्हणून त्याची ही पूर्वाश्रमीची  प्रेमिका ...वाड्याची मालकीण... इनामदारांची सून ..... वाड्याला  आग लावते आणि  त्याच्या प्रेमाचा दाह उराशी बाळगत  खऱ्या आगीत जळून भस्म होते.

 निळकंठ मास्तर लढ्यात मारल्या गेलेल्या आपल्या  मित्राच्या पत्नीला  बरोबर घेऊन लपत् छपत क्रांतिकार्य करीत पुढे जातो. काही काळाने इंग्रजांच्या जाळ्यात सापडतो. तुरुंगवास भोगतो. तुरुंगातून बाहेर पडताना देशाला स्वातंत्र्य  मिळालेले असते. मित्राच्या विधवे बरोबर लग्न करायची त्याची इच्छा असते ....पण ती नाही म्हणते. तिचे कार्य हेच तिचे जीवन असते....

........निळकंठ मास्तरच्या हातात काय राहते ? ........एक मोठे शून्य..............देशासाठी मनमुरादपणे दोन्ही हातानी आयुष्य उधळून दिलेल्या या माणसाची ओंजळ रिकामीच राहते.......

 इंग्रजांच्या  पदरी काम करणारी एक व्यक्ती जमेल तेवढी मदत करत  निळकंठ मास्तरांना  वरचेवर  विचारत राहते ........."हे तू का करतोस? यातून तुला काय मिळणार आहे?" .........   निळकंठ मास्तर म्हणतात ...... "हे माझ्यासाठी मी करतच नाही. ......माझा देश स्वतंत्र व्हावा... केवळ आणि केवळ  यासाठीच मी हे कार्य करतो .... मला काही मिळावे म्हणून नाहीच"..........

असे अनेक निस्वार्थ जीव आगीत होरपळले.......त्यांचे सोने झाले........

बिना खड्ग .. बिना ढाल मिळालेले नाही आपल्याला हे स्वातंत्र्य.........

आपले सर्वस्व ओवाळून टाकले अशा अनेक निळकंठ मास्तरांनी.... प्रसंगी शस्त्र उचलले आणि त्याची  फार फार मोठी किंमत सुद्धा मोजली.......... ......असंख्य आयुष्य अक्षरश: मातीत मिळाली....  झिजली.... कष्टली......गाडली गेली ......त्यांच्या बलिदानांवर हे स्वातंत्र्य उभे राहिले.. केवळ स्वत:च्याच  नव्हे  तर जोडीला आपल्या कुटुंबाच्या, जीवाभावाच्या अनेकांच्या  आयुष्याची अक्षरश: होळी केली  अशा अगणित लोकांनी ...... बदल्यात त्यांना काय मिळाले???? .....एक जीवघेणी उपेक्षा!!!!!!.........

अशा असंख्य  अनामवीरांसाठी न कोणी लावली पणती ......न कोणी उभारला स्तंभ............त्यांच्या साठी हळहळ व्यक्त करायालापण कोणी मागे उरलेच नाही.......  स्वातंत्र्याची जबर किमत मोजली अशा अनेक अनामिकांनी.

आणि ...आपण?????...........फुकटात मिळाले आपल्याला  हे स्वातंत्र्य !!!!!.....त्याची किती जाणीव ठेवतो आपण?????..........

जन्माला येताच श्वासासारखे आपसूक  मिळाले  आपल्याला हे स्वातंत्र्य........ त्याचे  किती मोल आपण जाणतो????? त्याची किती किम्मत ठेवतो????.

भ्रष्टाचार, कामचुकारपणा, नियमांचे जमेल....पचेल तेवढे उल्लंघन, अत्यंत स्वार्थी, सत्तेला हपापलेले  राजकारणी, ...त्यांनी केलेले राजकारणाचे गुन्हेगारीकरण..अधिकच घट्ट बनलेल्या जातिजातीमधील भिंती .........राष्ट्रप्रेम  नावाचे मूल्य हळूहळू विसरत जातोय आपण.....राष्ट्रप्रेम हळूहळू चेष्टेच विषय ठरू लागला आहे..........शिवी ठरू लागली आहे........

पाश्चात्य  संस्कृतीच्या आहारी गेलेली... व्यसंनाधीन,कणाहीन, प्रेरणाहीन होत चाललेली तरुणाई.....त्यांना वाटते जगायचे कशासाठी ? तर  फक्त चैनीसाठी........

हे सर्व पाहिले कि मन खंतावते......मला खूप वेळा आतून वाटत राहते...आपण खूप उशिरा जन्माला आलो......

त्या स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलो असतो तर असेच राष्ट्रप्रेमाने भारलेले .....अर्थपूर्ण आयुष्य जगलो असतो.......अजून एक देह  मातृभूमीसाठी, राष्ट्रकार्यासाठी कांमी आला असता....... 

"तुजसाठी मरण ते जनन ....  तुजवीण जनन ते मरण"..........

असेच देशासाठी मरण पत्करून मी जगले असते...... 

सावरकारांनी अनुभवलेल्या या ओळी मी पण प्रत्यक्ष अनुभवल्या असत्या ............

कशी होती ही माणसं!!!!!.....कसे त्यांचे राष्ट्र्पेम!!! ...मी नुसत्या विचारानेच स्तब्ध होते........अंतर्मुख  होते .......

तीही एक नशाच.........पण केवढी विधायक !!!!!......   नरदेहाचा नाश नव्हे तर सार्थक करणारी..........ती झिंग ......ती नशा......ती धुंदी.......हा चित्रपट साकारणाऱ्या त्या सर्व मुलांनी ती निश्चितच अनुभवली असणार........हा चित्रपट करताना त्यानाही काही जाणवलेच असणार ....राष्ट्रप्रेमाचे  एक त्स्फुल्लिंग आत तेवत असणार.....जे आपल्यापैकी अनेकांना जाणवत असणार ........जे मला जाणवले...... ..जाणवत राहते......आत आत खोल खोल अस्वस्थ करते.......अशा जाणिवांची मने पुन्हा एकदा एकत्र गुंफली जावीत . निळकंठ मास्तरांसारख्या अनेकानेक क्रांतिकारकांनी  दिलेल्या स्वराज्याच्या देणगीचा  त्यांनी आदर करावा ...स्वराज्याचे  सुराज्य करण्यासाठी पुन्हा एकदा अनुभवावी.......... तीच राष्ट्रप्रेमाची बेफाम नशा !!!!!!!

©नेहा देव 

१२ टिप्पण्या:

  1. खूप छान...खरच आता गरज आहे राष्ट्रप्रेमाच्या नशेची आणि त्याप्रती समाजबांधवांबद्दल मानवता जागवण्याची.

    उत्तर द्याहटवा
  2. स्व आणि स्वार्थ याच्या नशेतून आणि झिंगलेल्या मनस्थितीतून झटक्या सरशी वास्तवाची जाण देणारा लेख.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर मॅडम, तुमच्या लेखाने एक जाणवले आपल्या नशिबात खरेच तो अनुभव नाही आला. ती उणीव राहिली.. स्वातंत्र्य पूर्वी चा काळ .. आणि ती नशा....वेगळी च असणार..राष्ट्र प्रेमाची नशा च वेगळी... नीळकंठ मास्टर न सारखे अनेक राष्ट्र भक्त असतील ते काळाच्या ओघात आपल्या पर्यंत पोहोचले च नाही.. आजची राष्ट्र प्रेमाची नशा राहिलीय किंवा दिसते ती फक्त १५ऑगस्ट व २६ जानेवारी दिवशी..अशी नशा अनुभव न्या साठी आता रोज च स्वातंत्र्य दिन हवा का असा मला पण प्रश्न पडला.. कारण आज स्वातंत्र्य अनुभवतोय पण राष्ट्र प्रेम त्या बद्दल बांधिलकी v त्याची नशा कोठे आहे.. अश्या नशे साठी च नीलकंठ मास्तर..असे movie तयार होतात.. आणि आपल्या सारखी माणसे त्या नशेची अनुभूती घेतो...
    खूप सुंदर पोस्ट आहे madam.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान लेखन मॅम.
    अगणित लोकांनी केलेया सर्वस्वाच्या आहुतीमुळे आपणास स्वातंत्र्य लाभले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
    धन्यवाद मॅडम.
    आपल्या अशाच लेखनाची आम्ही वाट पाहू.

    उत्तर द्याहटवा
  5. Mastach ,sahaj ani sundar lekhan ahe,
    Navin pidhisathi atishay upyukta goshti mandlya ahet.

    उत्तर द्याहटवा
  6. समाजात हिंसाचार, अविवेकीपणा, नैतिकतेचे अधःपतन वाढत चाललंय, जगण्यातला रुबाबदारपणा काय असतो यासाठी सुंदर व दिशादर्शक...

    उत्तर द्याहटवा