मनाच्याही मनातले- नाही हे भावत मना.....
स्वातीने ग्रुपवर साड्यांचा व्हिडियो टाकला, आणि मी तो पूर्ण बघितला ........एकदा
नव्हे दोनदा!!!!!........सगळेच मेसेजेस मी वाचतेच असे नाही. पण हा मात्र
काळजीपूर्वक बघितला.......कारण???.....साडी.!!!!!!!.......
साडी!!!!!!! ......माझ्या
वयाच्या कोणत्याही स्त्रीचा विक पॉइंट....... माझाही ........
केंव्हाही नवीन साडी खरेदी
करायची म्हटले की जीव भुरळतो.....डोळे लकाकतात.....मनात काही तरी रेशमी सळसळते
.........
घरात आधीच्या साड्या कितीही
असल्या तरीही नवीन साड्यांची हौस काही फिटत नाही.....अजूनही......
पण lockdownच्या वर्षभरात कित्येक दिवस
साड्यांच्या घड्यांना हातच लावला गेला नाही.
त्या केविलवाण्या पडून
राहिल्या कपाटात .......तशाच........ कित्येक दिवसात उलगडल्या गेल्याच नाहीत.
मग प्रश्न पडला ........ का
करतो आपण इतका साड्यांचा हव्यास???
किती कपडे घ्यायचे?...........किती भरून ठेवायचे?........किती हा सोस??.......न संपणारा........
असे किती कपडे लागतात
माणसाला जगायला?.......एक
दांडीवर एक अंगावर इतक्या अत्यल्प वस्त्रावर पण जन्म काढतात अनेक लोक........मग
आपल्याला का ही अति हाव???
मुळात माणूस कपडे का वापरतो?
कपडे!!!! ......बुद्धिमान
माणसाने स्वत:ला आवरण म्हणून निर्माण केले ........वस्त्र
प्रावरण....
वल्कले...... ते......
जीन्स!!!!! असा मोठ्ठा प्रवास या वस्त्राचा.........मध्ये टप्पा
साड्यांचा......शालू, पैठणी आणि इतर अगणित प्रकारच्या......
पूर्वीच्या शालू, पैठणीची
जागा आता कित्येक नवनवीन विलोभनीय रेशमी, डिझायनर साड्यांनी घेतली आहे. झालरीच्या सुद्धा
साड्या असतात हल्ली ......तरीसुद्धा अजूनही पैठणीत जीव अडकतो माझा..... पण गंमत अशी कि तितकाच जीव
अडकतो शांता शेळके बाईंच्या "पैठणी" कवितेमध्ये सुद्धा............
शांता बाईंच्या पैठणी
कवितेचा उल्लेख केला तरी मंद अत्तराच्या सुगंधाने मन गंधित होते.......
शालू, पैठणी म्हटले कि मला
अजून एक अबोली आठवण येतेच येते!!!
आईने सुटकेसमध्ये पांढऱ्या
कापडात बांधून, जपून ठेवलेला तो फिक्या अबोली रंगाचा शालू नजरेसमोर येतो........
त्यावर सुंदर सोनेरी पिंपळपानाचे बुट्टे होते.
जेंव्हा जेंव्हा ती तो
बाहेर काढायची तेंव्हा जवळ बसून मी तो डोळा भरून निरखून बघायची. ........शिवाय त्यात आई आपले शिकवणीचे पैसे जपून ठेवायची......
अडी-अडचणीला तेच उपयोगी पडायचे.
दोन्ही भावांच्या मुंजीच्या वेळी घेतला होता तो शालू........शालूच्या पारंपारिक रंगांपेक्षा अगदीच वेगळ्या अशा अगदी फिक्कट ... फिक्का......अबोली रंगाचा......फिक्या अबोली रंगात फिका गुलाबी मिसळल्यावर जी छटा होईल तोच त्याचा रंग होता.... आईच्या शांत अबोल स्वभावाप्रमाणेच अबोली रंगाचा .......मला खूप आवडायचा!!!. आईकडे तेवढीच एक भारी ठेवणीतली साडी होती. अनेक विशेष महत्त्वाच्या कार्यामध्ये तोच शालू ती नेसायची.........एकच साडी पुन्हा पुन्हा.... तीच तीच...... जपून सांभाळून ठेवलेली ........ वापरलेलीच .........निरुपाय असला तरी फारशी खंत न बाळगता ......
आणि आत्ता????
आता प्रत्येक इव्हेटला एक
नवीन...... शक्य असेल तेवढे अधिक किमतीचे........भारी .......महाग ......भरमसाठ किमतिचे वस्त्र घेतले जाते ..........वस्त्र अशासाठी
म्हटले कारण आपल्याकडचे अनेक सण-वार रूढी- परंपरा आता केवळ इव्हेट म्हणून घडतात......घडवले
जातात ....तशी फॅशनच आहे.... आणि त्यासाठी प्रचलित फॅशनची वस्त्रे घातली जातात......... फोटो सेशनच्या फ़ैरी घडतात.
आणि मग लगेच ते वस्त्र बाजूला पडते.......... कुचकामी होते......कारण काही
दिवसांनी त्याची फॅशन जाते.....
मग तो वरील प्रश्न पुन्हा
पडतो........... माणूस कपडे का घालतो?
लज्जा रक्षणासाठी?
...शरीर संरक्षणासाठी?....सुंदर,ऐटबाज
दिसण्यासाठी?.....आपण समाजातीलच एक आहोत..... वेगळे नाही....
हे दर्शवण्यासाठी?......श्रीमंतीचे प्रदर्शन
करण्यासाठी ?.....कपड्याच्या व्यापाऱ्यांचा धंदा चालावा म्हणून ?? कि केवळ फॅशन साठी???
या प्रश्नाला माझ्या पुढील
पिढीचे अनिवार्य उत्तर हेच की कपडे घालावे केवळ आणि केवळ फॅशनसाठीच!!!!!
ही फॅशन म्हणजे .....एक
गम्मतच आहे.....जादू आहे......भूलभुलय्या आहे ......
तमाम बॉलीवूडची ती जान आहे.......मॉडेल विश्वाचा ती श्वास आहे.....
भयंकर पॉवरफुल आहे हे प्रकरण!!!!.
ही फॅशन काय करू शकत
नाही?
हिने पाहता पाहता हिंदू
पोरींच्या कपाळावरील कुंकू पार पुसून टाकले....... हातातल्या बांगड्या काढून
घेतल्या ........पायातले पैंजण ओढून घेतले........ केसातले गजरे काढून
घेतले..........
माझी पिढी सोडली तर पुढील
पिढीमधील कोणतीही तरुण मुलगी कुंकू किंवा टिकली नेमाने लावत नाही...... गजरा घालायची त्यांना
लाज वाटते.......बांगड्या घालणे हे काकुबाईचे लक्षण वाटते. .....
खर तर कुंकू, टिळा ही आपल्या धर्माची
निशाणी......पण आपला
धर्म आपण इतका हलक्यात घेतो की अनेक गोष्टी आपण सहज हवेत उडवून दिल्या.........
इतर धर्म आपली कोणतीच गोष्ट इतक्या सहजपणे सोडत नाही. आणि आपण आपली कोणतीच गोष्ट
जीवापाड धरून ठेवत नाही.
.................काही जण
सोडतच नाहीत................आपण धरून ठेवतच नाही.
खरे
तर माणसाच्या सर्व राहणीमानाचा पाया तेथील स्थानिक- भौगोलिक परिस्थिती
असते.....त्यावरच कालांतराने संस्कृतीची बांधणी होते आणि मग ती आपली ओळख
बनते........पण आज अशी स्थानिक ओळख पुसली जात आहे आणि एक जागतिक ग्लोबल- संस्कृती
उदयाला आलेली आहे ...... आणि या ग्लोबल संस्कृतीचा
परवलीचा शब्द आहे फॅशन......या फॅशनच्या पायात साडी गेली....... पंजाबी सुट पण गेला आणि आता आल्या जीन्स
आणि शर्ट.....मुलामुलींचा एकच पेहेराव.....भेदभाव नाही...... पुढारलेपणाचे लक्षण.. स्त्री पुरुष समानतेचे
लक्षण म्हणजे स्त्रीने मुलाप्रमाणे कपडे घालायचे... शिवराळ भाषा बोलायची आणि
राजरोस व्यसने करायची.......... ही फॅशन आहे.
फॅशन कसलीही असते ......केशभूषा,
वेशभूषा, राहणीमान, भाषा
...कसलीही........
पण जास्त करून फॅशन हा शब्द आपण कपड्यासाठीच वापरतो.
खरतर वस्त्र प्रावरणातील
फॅशन म्हणजे सौंदर्य, कलात्मकता, सृजनशीलता यांचा सुरेख संगम असावा अशीच आपली अपेक्षा असते.
पण सध्या फॅशनच्या नावाखाली
जे काही माथी मारले जात आहे आणि फॅशन च्या नावाखाली जे काही घातले जात आहे, त्यातील काही गोष्टी कोणत्याही अंगाने सुंदर, भारी, ऐटबाज वाटतच नाही......पुढून खाली, मागून वर किंवा पुढून वर
आणि मागून खाली गेलेला कुर्ता, डावीबाजू वर आणि उजवी
खाली किंवा उजवी बाजू वर आणि डावी बाजू खाली असलेला कुर्ता..........कुर्त्याची
पुढची बाजू वेगळी.. मागची वेगळी ....डावी बाजू आणि उजवी बाजू वेगवेगळ्या रंगाची किंवा
डिझाईनची सुद्धा. मुलींच्या कुर्त्याला खांद्यावर रुपयाच्या आकारापासून ते खूप मोठे भोकसांड वाटेल
इतके मोठे भोक......आणि सर्वात वाईट म्हणजे फाटक्या आणि फेडेड जीन्स...........
जीन्स हे सध्याच्या
ग्लोबल संस्कृतीचे - तरुण पिढीचे लोकप्रिय वस्त्र आहे.
या जीन्स मध्ये गेली सहा
सात वर्षे एक फॅशन सध्या फारच जोरात आहे.. ती म्हणजे........फाटक्या आणि फेडेड जीन्स.
बीभत्स, ओंगाळवाण्या.......सौंदर्याचे नव्हे तर कल्पनादारिद्र्याचे प्रदर्शन घडवणाऱ्या........कितीही पटवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला तरी ही फॅशन काही मनास येतच नाही......
परत तोच प्रश्न पडतो माणूस
कपडे कां घालतो?
"रेशमी सलवार कुर्ता
जालिका ....रूप कहा नही जाए
नखरेवालिका" ...या गीतामधील जाळीदार कुर्ता सुंदर
ललनेवर निश्चितच खुलतो पण मुद्दामहून गुडघ्यावर फाडलेल्या किंवा फेडेड पॅन्टस मला कधीच सुंदर दिसत
नाहीत..... याआधी मधल्या काळात low-waist नावाची अशीच एक
अत्यंत ओंगळवाणी फॅशन आली
होती. त्या मधून अंतर्वस्त्र दिसतील अशी सोय व्हायची ...कदाचित तोच त्यांचा हेतू
होता..
थोडक्यात सध्याच्या या काही फॅशन्स मध्ये दिसते ती केवळ विसंगती, असमतोल, विचित्रपणा, कल्पना दारिद्र्य, बिभत्सता,कुरूपता,ओंगळवाणेपणा...आणि......आपल्या कल्पना
दारिद्र्यातून केलेल्या विद्रूप कृतीला कलाकृती म्हणण्याचा केविलवाणा खटाटोप!!!!!
विसंगतीमध्ये सुद्धा
सौंदर्य असू शकते...... free hand drawing नही का सुंदर दिसते !!! ...... पण कुर्त्याला एकच बाही
असणे आणि एक हात उघडा असणे यात खूप सौंदर्य आहे किंवा सृजन आहे असे मला तरी वाटत
नाही. यापुढे कदाचित एका पायातच पॅन्ट आणि दुसरा पाय उघडा अशी पण फॅशन येईल.......... किंवा पुढचा
भाग झाकलेला आणि मागचा पूर्ण उघडा....अशी सुद्धा!!!!!!
नाविन्य आणि कुरूपता या दोन भिन्न
गोष्टी आहेत.....नाविन्याच्या हव्यासासाठी बिभत्सता, कुरूपता
मिरवायची का?
अर्थातच हा ज्याचा त्याचा
अत्यंत खाजगी प्रश्न आहे.
शेवटी आपण काय घालायचे, कसे राहायचे हा
प्रत्येकाचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे. मी कशाला त्यावर इतका विचार करायचा???
तरीही लहानपणी ऐकलेली एक
गोष्ट आठवते. ......
..........एका राजाला अतिशय उत्तम नाविन्यपूर्ण, अतितलम, वजनाला हलके पण भारी वस्त्र हवे असते......एक लबाड शिंपी त्याच्याकडून भरपूर बिदागी घेऊन खरेखुरे कपडे शिवतच नाही... तर खोटेच सांगतो की मी तुमच्या अंगवर अती तलम कपडे घातले आहेत ते तुम्हाला आरशात दिसणार नाहीत पण आम्हाला दिसते आहे. .......आणि ते तुमच्यावर अगदी खुलून दिसत आहे!......... तो मूर्ख राजा नग्नपणेच मिरवणुकीला निघतो ..... आपण खूप सुंदर वस्त्र घातले आहे अशा भ्रमात मिरवत जात असतो....... सर्व प्रजा मनातल्या मनात हसत असते पण राजाच्या दंडुकेशाहीला घाबरून वरवर त्याची वाहवा करत असते.
एक लहान मुलगा मात्र बाल- सुलभ निडरपणे, निर्भयपणे
सहज बोलून जातो....”अरे ... बघा ..बघा ......राजा उघडाच आहे!!!”.............
आज ग्राहक-राजाला फॅशनच्या नावाखाली लबाड कंपन्या अशाच लुबाडत आहे. फॅशनला शरणागत लोक भ्रमामध्ये राहून एखादी ओंगळवाणी फॅशन सुद्धा मोठ्या शेखीने मिरवत आहेत...पण माझ्या मनामध्ये मात्र तो निरागस, स्पष्ट बोलणारा छोटा मुलगा डोकावतो आहे.
पूर्वी एका शालूमध्ये..... पैठणीमध्ये आयुष्याचा अख्खा पट सुबक, नीटस बांधलेला असायचा...त्याच्या पदरात व्यक्तिमत्व, नातेबंध आणि हो.. संस्कृतीसुद्धा घट्ट बांधलेली असायची....... आज ढीगभर कपडे
असून सुद्धा आयुष्य आणि नाते बंध बांधले जातच नाहीयेत..........फाटके झाले आहेत!!! विसविशीत झाले आहेत....का जाणून बुजून
केले आहेत???? ....फाटक्या जीन्स सारखे????
©नेहा देव
छान अभिव्यक्ती
उत्तर द्याहटवाछान!
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन
उत्तर द्याहटवावस्त्र ही एक कल्पना घेवून तिला विविध विचारांचा सुंदर साज चढवला आहे. छानच!
उत्तर द्याहटवाछान आहे
उत्तर द्याहटवाछान शब्दबध्द केलय.
उत्तर द्याहटवाजुन्या आठवणी आणि वास्तवतेच चित्रण,
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन.
जुन्या आठवणी आणि वास्तवतेच चित्रण
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन.
खूप छान लेखन.खरंच व्यक्ती आठवणीत हरवून आणि हरखून जातो.आणि फॅशनच्या निमित्ताने जाहिरात या प्रसारमाध्यमाचं महक्त्व अधोरेखित होते.
उत्तर द्याहटवा