गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

मनाच्याही मनातले.......

असावी एक मांडी ...

हो....

हवी आहे एक मांडी .....

जिच्यावर हक्काने डोळे मिटून शांत पहुडावे ...

तिने समजून घेऊन थोपटावे ...

तिची मांडी  ...

तीच ती अनादी काळापासून बाळाची हक्काची स्थावर मालमत्ता ..

जी मिळताच लाभते जगावर राज्य केल्याचे समाधान ...

... 

थकल्या भागल्या जीवाला थरथरत्या हाताने शांतवणारी ती ...... तिची मांडी ...

उपेक्षेलेल्या  मनाला शांतपणे समजावणारी . आणि  समजणारीहि ती ... तिचीच मांडी 

 कळवणाऱ्या शरीराच्या वेदनेला  खरबरीत हाताने आणि सहज शांत  शब्दाने लिंपणारी ती ... तिची मांडी 

अपमानित मनाला हळुवार फुंकर घालून रिझवणारी... ती .. तिची मांडी ..

उद्वेगाने जळणाऱ्या बाळाच्या केसातून हळुवार बोटे फिरवत तो दाह शमवणारी तिची मांडी ...हवी आहे..

खूप हवी आहे ....तिची मांडी ...तापलेल्या कपाळावर आपल्या हाताने थंडावा देणारी ती ...

जीवन संघर्षात  उन्मळू पाहणाऱ्या जीवाला कंपित हाताचा भक्कम आधार देणारी ती ...

श्रांत क्लान्त मन ....शिणलेले डोके ...जळजळणारे डोळे ...उशीवर ठेवताच अश्रूंचा बांध फुटतो ....तड्फड्णारे मन  आक्रोशून  उठते ...,कळवळून मागते ,...आई तुझी मांडी ...

पुराच्या संकटात खचलेल्या शिष्याला ...हवा होता केवळ गुरूचा हात पाठीवर ....लढ असे म्हणणारा गुरु .....तो नशीबवान ....त्याला मिळाला तो गुरु ... पाठीवर  हात ठेऊन लढ म्हणणारा ..

मी नाही तितकी नशीबवान ....

मला नाही लाभली तिची मांडी दीर्घकाळ .....

मनाच्या आतल्या गर्भात ....कालवते ...कलकलते ... 

म्हणते आई ....कोठे आहेस तू .....तुझे बाळ ....मागते आर्त हाक....

उत्तर येत नाही .......उत्तर येतच नाही ......

मग मी तिरमिरिने उठते .. टीव्हीच्या वेडसर मालिकांच्या नशेत धुंद  होते ...त्यालाच निद्रा म्हणते ...

आई ....तुलासुद्धा असे झाले होते का गं ???

किती सोसलेस ...किती  भोगलेस ....अंगावर आलेली जीवघेणी संकटे सहज पेललीस ...कधीतरी रात्री ...तुलाही हवी होती का ग तुझ्या आईची मांडी ??

तू ही मारली असशील अशीच आर्त हाक ......क्षणभर झाली असशील अगतिक माझ्या समान ???

तुझ्या सोबत कोणीच नव्हते दीर्घ काळ .....

मी व्हायला पाहिजे होते तुझी आई .....नाही झाले ..

श्रमलेल्या तुझ्या जीवाला द्यायला हवे होते मायेच्या स्पर्शाचे संजीवन .....नाही दिले ......

आजारपणात आई झालेल्या मुलीचा मायेचा सहवास हवा होता का तुला ???....नाही दिला मी......

तू मागितला नाहीस ....तू जपला तुझा स्वाभिमान...

मी मागते तळमळून ....मी वेडी ...मी मागते केवळ मांडी  ...मला मिळत नाहीं ......

मग मीच मला चुचकारते  ...माझाच हात .....माझ्या तळमळणाऱ्या डोक्यावर ठेवते ...थोपटते .....समजावू पाहते ....डोळे मिटते ...

आणि ...त्या जगात ...तिच्या जवळ पोहचण्याचे स्वप्न पाहते ......

© नेहा देव













३ टिप्पण्या: