मनाच्याही मनातले
6) मागणे
वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी आयुष्याचा ताळेबंद मांडताना
कधीकधी तीव्रतेने वाटते की
ते परमेश्वर नावाचे प्रकरण मला एकदा भेटावेच !!!!
त्याला गदागदा हलवून ,खडसावूंन विचारायचे आहे.
का? का?? का रे बाबा का???
का तू मला असे सर्वच बाबतीत मध्यम .....सर्वसाधारण...बरे... या पातळीवरच ठेवलेस?
एखाद्या बाबतीत तरी उत्तम या टोकाचे गुण मला द्यायला काय हरकत होती?.एखाद्या बाबतीत तरी..........?
मला आवडले असते कि ते ...
ईश्वरी सौंदर्य-मधुबालासारखे..
मोहकता माधुरीसारखी...
परमोच्च मधुर आवाज लतादीदींसारखा...
खेळातील अफाट कौशल्य सुनील,सचिन सारखे...
अभिनय दिलीपकुमार सारखा...
नृत्य कौशल्य गोपी सारखे....
विनोदी लेखनाची अलौकिक प्रतिभा पु. ल. सारखी...
काव्यामध्ये तर किती नावे घ्यावीत?.
नेतृत्व वाजपेयी सारखे ,नरेंद्रांसारखे....
कर्तृत्व धीरूभाई सारखे....
श्रीमंती लक्ष्मी मित्तलासारखी....
समाजसेवा आमटेंसारखी.....
राषट्रभक्ती सावरकरांसारखी............
छे छे यापैकी काहीच माझ्याकडे नाही.चमकदार, अलौकिक, असामान्य असे काहीच नाही.
सर्वच बाबतीत मी आपली बरी !!! साधारण!!! ठीक ठीक!!!! मध्यम!!!
माझी झोळी देवाने अर्धी रितीच ठेवली.
तमाम मध्यमवर्गीयांची ब्रँड अँबॅसिडर सारखी मी आपली मध्येच ....मधल्या सीमारेखेवरच उभी .....
का? का??
या साऱ्या उत्तम लोकांचे अतुलनीय कार्य बघताना,कलांचा आस्वाद घेताना आत कुठेतरी सलत राहतेच, हे
मी का करूशकत नाही??? त्या जागी मी का नाही???
हे असे काहीतरी उत्तम, अलौकिक झाल्यावर काय वाटत असेल माणसाला? काय भावना असतील?
तुकोबा म्हणतात .....
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण .....
असू दे. त्या यातनांसह ते मोठेपण मी हसत स्वीकारले असते.
मला हवा होता तो अनुभव.... याच जीवनात!!!
चौदा विद्या,चौसष्ठ कला,हजारॊ प्रकाराचे खेळ, शारीरिक गुण वैशिष्ठ्ये,कल्पकता, सृजनशीलता,उद्यमशीलता,तांत्रिक कौशल्य, राष्ट्रप्रेम, समाजकार्य,.........अगणित गुण...
कितीतरी मोठा span ईश्वरासमोर होता.पण त्या पैकी एखाद्या गुणासंदर्भात अलौकिक या बिंदूवर मला न्यावे असे काही त्याला वाटले नाही......दिव्यत्वाचा परिसस्पर्श मला झालाच नाही ... माझे नशीब ....
लाखो तारे आसमानमे, एक मगर ढुंढे ना मिला.......अशी माझी अवस्था .
कदाचित त्याला लागणारी आत्यन्तिक प्रेरणा, जिद्द,कष्ट, उद्दिष्टाला वाहून घेण्याची तयारी,धडाडी, धडपड,हिम्मत,कर्तृत्व,धाडस ...यापैकी कोणतेच गुण पुरेशा प्रमाणात माझ्यात नाहीत.
खरी गोची तिथेच आहे ...माझे गाऱ्हाणे मुळात तेच आहे. हे सर्व गुण
देवाने मला पुरेसे दिलेच नाहीत. त्यावर कडी म्हणजे बलवत्तर नशीबही नाही.
केशवसुत म्हणून गेले कि---- प्राप्त काळ हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा......
अरे पण कशी? कशी खोदा? छिन्नी हातोडा तर चालवता यायला हवा.
हा कंजूषपणा माझ्या बाबतीत त्याने का केला?
रूप बेतास बात -आता पन्नाशीनंतर सुमार या विशेषणाकडे जाणारे....उंची मध्यम...बुद्धिमत्ता थोडीशी बरी.त्यामुळे शिक्षण जरा above average..पण व्यवहारात त्याचे रूपांतर पैशात करण्याची चतुराई नाही. त्यामुळे कमाई मध्यम , अर्थातच श्रीमंती मध्यम, उत्तम गाउ असे म्हटले तर आवाज साधारण... इतर कलांच्या बाबतीत हाच प्रकार. निसर्ग नियमाने दोन अपत्य झाली. पण त्यांना घडवण्यातही खूप मोठे कर्तृत्व नाहीच.
आजी आजोबांच्या छत्र -छायेखाली स्वतःच वाढत गेली बिचारी.
एकूण सर्वच मामला ..... मध्यम,मध्यम,मध्यम........... मध्यम वर्गीयांची ब्रँड अम्बॅसॅडर!!!!!!
याविचाराने क्वचित खिन्न व्हायला होते. अरेरे.... कसे हे माझे जीवन?
जन्माला आले ,जगले आणि एक दिवस मरून जणार!!!! . ....ना कोणाला खंत ना खेद.
आपण निघून गेल्यावर मागे काय राहणार?
काय राहणार मागे ?
कोणत्याच पाऊलखुणा नाहीत...... कोणतेच ठसे नाहीत......
जन पळभर म्हणतील हाय हाय !!!!!
नंतर काय ?
कसे हे किडा मुंगी सारखे जगणे ?
ये जिना भी कोई जिना है?
नाही म्हणायला या अन्यायावर उतारा म्हणून दोन गुण देऊन देवाने उ:शाप दिला आहे .
एक म्हणजे आत्यंतिक सहनशीलता ( आईकडून आलेला वारसा हक्क--पण आईपेक्षा हा गुण कमीच )
आणि दुसरा म्हणजे आत्यन्तिक संवेदनशीलता !!!!
सहनशीलतेमुळे वाद कमी होतात.जीवन मध्यममार्गावर, मध्यम गतीने चालूच राहते.
पण संवेदना मात्र वेदनाच देतात .. हा उ:शाप .. का शाप ?
या संवेदनशीलतेमुळे आजू बाजूला घडणारे सर्वच जाणवत राहते, मनात शोषले जाते , आत झिरपत जाते ,खूप काही खुपत राहते , ठसठसत राहते. या संवेदनांचे करायचे काय?? नटसम्राटांच्या वेदनेसारखीच त्याची अवस्था.त्या संवेदनांना ना हात ना पाय. केवळ धड !!!! केवळ आणि केवळ असहाय्य !!!
या असहाय्यतेच्या जखमेसह जगावेच लागते.......अश्वत्थाम्यासारखे.
करणार काय?.
मग निरुपायाने स्वतःलाच समजवावे लागते.
ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे मंजूर है !
सामने तेरे तेरा बंदा बहुत मजबूर है.......
असे म्हणत मीच मला जगवत ठेवते!!!!!!
नाही !!! त्या धडधाकट भिकाऱ्या सारखे रडगाणे गाणाऱ्यातील नाही मी..... ज्याला रोगी राजाने त्याच्या अनमोल निरोगी शरीराची किंमत जाणवून दिली होती.....
दूर कुठून तरी कानावर येणाऱ्या सुरात माझ्या मनाच्या कोपऱ्यातील सूर मिसळून जातात....
माझे जीवन गाणे....
व्यथा असो आनंद असू दे.......
जे काही ईश्वराने दिले त्याचा चांगला वापर करत मध्यम मार्गावर मध्यम गतीने जगणे चालूच ठेवणार मी..
अर्ध्या भरलेल्या झोळीच्या शिदोरीवर जीव जगवत आणि जागवत......
ओबडधोबड का होईना जसं जमेल तसं माणुसकीच लेणं खोदत राहणारच मी .....
तेवढे माणुसकीचे धडे मी नक्कीच शिकले आई बाबांकडून !!!!!
पण कधीतरी असेही घडते .... माझ्या प्रश्नाचे उत्तर माझे मलाच उमजते........मनात चमकून जाते ......
माझे मलाच.... .....उमगते .....
........उत्तम वक्त्याला दशसहस्त्र श्रोते लागतात,प्रभावी नेत्याला लाखो अनुयायी लागतात, उत्तम अभिनेत्याला शेकडो चाहते लागतात., प्रतिभावान लेखकाला असंख्य वाचक लागतात... .... ते व्हायचे कोणी? समाजातील बऱ्या वाईटाचा तोल सांभाळायचा कोणी? समाज स्थिर ठेवायचा कोणी?प्रामाणिकपणे टॅक्स देऊन देश चालवायचा कोणी?श्रीमंत आणि गरीब यामधील दरी सांधायची कोणी?
माझ्यासारख्या मध्यम मार्गी मनुष्यानीच!!!!!!
मग तो प्रसामान्य संभव वक्र डोळ्यासमोर येतो .त्यात मध्यस्थानी आलेख खूप वरजातो......शिखर गाठतो... एकदम टोकाला जातो.त्या टोकावर आपण सर्व मध्यम वर्गीय असतो. हा मध्य.... मध्यभागी राहून सर्व पसाऱ्याचा तोल आपल्या शिरावर घेऊन ताटकळत उभा असतो. हीच तर मेख असते. इथे ते टोक मध्यमवर्गीयांनी गाठलेले असतें.
स्वतःच निर्माण केलेल्या अति उत्तम आणि अति निकृष्ट या दोन टोकांमधले अंतर जुळवून घ्यायला आणि त्याचा तोल सांभाळायला देवालाही अवघड गेले असते आणि म्हणूनच खूप मोठ्या संख्येने माझ्यासारख्या मध्यम मार्गी मनुष्यांची योजना त्यांनी केली असावी.
हा परत आपला माझा मध्यम विचार!!!!!!
मध्यम बुद्धीला सुचलेला!!!!
आपल्या ब्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात लाखो संकटे झेलत हसतमुखाने जगणारी माझी मध्यमवर्गीय आई नेहमी म्हणायची ....याजन्मात आमचे सगळे पूर्वजन्मीचे भोग आम्ही भोगून संपवणार...... पुढचा जन्म
आमचा उत्तम असणार!!!
दुर्दम्य आशावाद!!!!
...आता नक्कीच ती कुठेतरी जन्मली असणार!!!!!
परमेश्वरा हे एक मागणे तरी पुरे करशील? तिचे म्हणणे खरे करशील?
आणि तिच्याच पोटी पुन्हा जन्म देऊन मला फक्त एक उत्तम माणूस करशील? मग मी मानव्याचे सुंदर शिल्प त्यात खोदेन.... मग मी मेल्यावर माणसे म्हणतील....... एक उत्तम आयुष्य संपन्न झाले ....
एवढे करशील ?
निदान पुढच्या जन्मी तरी?
©नेहा देव
Khup chan ani marmik vichar mandlet madam👌👌
उत्तर द्याहटवाVachlyaver vatale ki mazya manatale ch lihile ki kay, khup mast pudhachahi blog vachayala awadel
उत्तर द्याहटवाGood work attya keep it up
उत्तर द्याहटवाGood to read
उत्तर द्याहटवाSarika Rathod